येवलाः ही आहे पुरुषात दडलेल्या एका सुंदर आईपणाची गोष्ट. अशा घटना दुर्मिळ असतात. त्या म्हणल्या तर खूप साध्या आणि तशा पाहिल्या, तर एका अर्थाने खूप मोठ्या असतात. अशाच एका निरागस आणि आगळ्यावेगळ्या प्रेमाची ही खरीखुरी कहानी. नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यातल्या थळकर वस्तीवर घडली. तुम्हाला ती नक्की आवडेल. मराठीतले एक अतिशय प्रसिद्ध कवी फ. मु. शिंदे यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता आहे आई. त्यात ते म्हणतात…
आई घरात नाही
मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई?
आई खरंच काय असते,
लंगड्याचा पाय असते,
वासराची गाय असते
दुधावरची साय असते,
लेकराची माय असते
हे आईपण कुणाच्याही आत असू शकते. त्यासाठी ती स्त्रीच असावी असे नाही. त्यामुळेच त्या तरुणाच्या ह्रद्याला गोठ्यात हंबरणाऱ्या वासराचा आवाज ऐकू आला. मग त्याने काय केले माहितय. आपल्या नववधूला दाराबाहेर ताटकळत उभे केले आणि आधी त्या वासराला गाईकडे नेले. उत्सुकता लागली ना…
त्याचे झाले असे की, येवला शहराजवळील थळकर वस्ती येथील रामेश्वर थळकर यांचे लग्न श्रीरामपूर येथील पूजा कुऱ्हे यांच्यासोबत झाले. मात्र, या सोहळ्याच्या समारोपाला बराच उशीर झाला. नववधूला घेऊन घरी यायला रामेश्वर यांना सायंकाळचे सात वाजले. तोपर्यंत घरातल्या गाईची धार कोणीही काढलेली नव्हती. कारण ही गाय फक्त रामेश्वर यांनाच धार काढू द्यायची. गाईच्या वासराने भुकेमुळे हंबरणे सुरू केलेले. ते सारखे गाईकडे ओढ घ्यायचे. हे कासावीस करणारे दृश्य नववधूसह दारात आलेल्या रामेश्वर यांना दिसले.
गाय सुद्धा वासराकडे ओढा घेत होती. हे पाहून रामेश्वर यांचे काळीज हेलावले. त्यांनी आपली नववधू पूजा यांना दारातच थांबवले. त्यांनाही गोठ्यातले हे दृश्य दिसलेले. त्यांचे गावही खेडेगाव. त्यामुळे त्यांना रामेश्वर यांच्या मनातला कोलाहल न सांगतात जाणवला. रामेश्वर यांनी घरातून दुसऱ्याला धारेचे भांडे आणायला लावले. त्यांनी वासराला पाजायला सोडले. त्यानंतर धार काढली. आणि शेवटी घरात नववधूसह प्रवेश केला. शेतकऱ्याचा सगळा जीव शेतीबाडी, बैल बारदाणा आणि गाय-वासरात गुंतलेला असतो. या आगळ्यावेगळ्या मुक्या प्रेमाची प्रचितीच इथे आली.
नाशिक जिल्ह्यात 6 नगरपंचायतीसाठी 402 अर्ज; देवळा येथे 4, निफाड 3, कळवणला 2 प्रभागांमधील निवडणूक रद्द