नाशिक : कर्तव्य कठोर आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde) यांची ओळख आहे. नियमांचे पालन न केल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश देऊन शिस्त लावण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे तुकाराम मुंडे यांची आठवण नाशिककरांना (Nashik News) आली आहे. नुकतीच एक कारवाई नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) वतिने करण्यात आल्याने तुकाराम मुंडे यांच्याही एका निर्णयाची चर्चा होऊ लागली आहे. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी शहरातील कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकतांना विलगीकरण करूनच टाकावा असं आवाहन केलं होतं. पालिकेच्या सुचनांचं जे पालन करणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती.
प्लॅस्टिक पिशवीतून कचरा टाकू नये, ओला आणि सुका कचरा विलगीकरण करूनच टाकावा अशा सूचना नाशिककरांना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी काही वर्षांपूर्वी दिले होते.
तुकाराम मुंडे यांच्याकडून नियमांचे पालन जे करणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार कारवाई देखील केली जात होती, त्यामुळे मुंडे यांचा धसका घेऊन नागरिक कचरा विलगीकरण करत होते.
मात्र, तुकाराम मुंडे यांची बदली झाल्यानंतर नागरिकांना लागलेली शिस्त हळूहळू मोडत गेली आणि पालिकेचे अधिकारी, कर्मचारीही दुर्लक्ष करू लागले होते, मात्र, पालिकेने पुन्हा ही मोहीम हाती घेतली आहे.
घनकचरा विभागाचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांच्या आदेशावरून कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत टाकण्याचे आवाहन केले जात आहे, ज्या नागरिकांकडून किंवा सोसायटीकडून पालन होत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
नाशिकच्या तपोवन रोड येथील कर्मा कॉलनी या सोसायटीला पालिकेने 18 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. वारंवार सूचना करूनही कचरा वर्गीकरण होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाट, स्वच्छता मुकादम गौतम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली असून या कारवाईची संपूर्ण शहरात चर्चा होऊ लागली आहे. येत्या काळात ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.
नाशिक महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या काळात ही मोहीम राबविण्यात आली होती, त्यामुळे संपूर्ण शहरातील नागरिक कचऱ्याचे वर्गीकरण करत होते, नंतर ही शिस्त मोडली होती.
तुकाराम मुंडे स्वतः यासाठी आग्रही असल्याने अधिकारी देखील कारवाई करत होते, आणि नागरिकही शिस्तीने कचरा टाकत होते. यामुळे कचऱ्याचं व्यवस्थापन करतांना सोईचे होत असल्याचे समोर आले आहे.