मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे यांनी यामधील तरुणाच्या श्रीमुखात लगावत शिवीगाळ केल्याचे यामध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून काही सवालही उपस्थित केले आहे. त्यांच्यावर कारवाईचा संदर्भ देत आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. दरम्यान, मंत्री दादा भुसे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कारवाईची मागणी होत आहे. दादा भुसे यांचा हा पहिलाच व्हिडिओ व्हायरल झाला असे नाही, यापूर्वी देखील दादा भुसे यांचे दोन व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते.
मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे.
मालेगावमधील लाखोंची गर्दी पाहून काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला होता, त्यावरून दोघां संशयितांना पोलिसांनी पकडले होते.
यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते, मात्र पुन्हा तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते.
यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकच्या श्रीमुखातही भडकवली असल्याचे व्हायरल व्हिडिओ दिसून आले आहे.
मंत्री दादा भूसे फटकावतात .
शिव्या देतात
मुख्यमंत्री साहेब
कुठला गुन्हा पोलिस घेणार
पोलिसां समोर मारले
माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर बसवलत #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत supreme court मध्ये
रात्री त्या विकृत बरोबर आपली बैठक
आता बोला .. pic.twitter.com/EGsJmvApfI— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 26, 2022
विशेष म्हणजे यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते, यापूर्वी देखील दादा भुसे यांचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते.
दादा भुसे यांनी एका दरोडेखोराला पकडले होते, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांवर टीका होऊ लागली होती.
त्यापूर्वी काही महीने अगोदर दादा भुसे यांच्याकडे नागरिकांनी अवैध धंद्याच्याबाबत तक्रारी केल्या होत्या, त्यावरून पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करत दादा भुसे यांनी स्वतः धाड टाकली होती, त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मंत्री दादा भुसे यांचे व्हायरल व्हिडिओ बघता दादा भुसे आक्रमक का होतात? पोलीसांच्या कामगिरीवर भुसे समाधानी नाहीत का? दादा भुसे यांना दबंगगिरी करायची असते का? अशी चर्चा आता नाशिक जिल्ह्यात दबक्या आवाजात सुरू आहे.