नांदेड: गेल्या काही महिन्यांपासून हिमायतनगर तालुक्यात (Himayatnagar Nanded) चोरट्यांचा उच्छाद थांबला असताना पुन्हा गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी चोरट्यांनी 28 च्या मध्यरात्रीलाच चोरीला सुरुवात केली आहे. अज्ञात चोरट्यांनी काळे- पांढरे कपडे परिधान करून तोंडाला रुमाल बांधून सिरंजनी (Siranjani) येथील हनुमान मंदिराचे गेटमधून प्रवेश केला. त्यांनंतर त्यांनी मारोतीरायाच्या मंदिराच्या दानपेटीचे कुलूप फोडून (Theft in the temple) अंदाजे अर्धा किलो सोने-चांदी, व 25 हजारांची रोकड लंपास करण्यात आली आहे. या चोरीबरोबरच गावातील तीन ते चार घरांना लक्ष्य करून त्या ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या चोरट्यांच्या टोळीला पकडण्याचे आवाहन हिमायतनगर पोलिसांसमोर उभा राहिले आहे. हिमायतनगर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुक्यातील सर्वात मोठं गाव म्हणून सिरंजनी गाव प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या काळात या गावात कधीही चोरी झाली नसल्याचे नागरिक सांगतात.
चोर देवालाही आता घाबरत नाहीत…अख्खी दानपेटीच केलेय लंपास#nanded #siranjani #tepletheft @NandedPolice @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @AshokChavanINC pic.twitter.com/QToHALfIKz
— Mahadev Parvti Ramchandra (@mahadevpr) August 28, 2022
गावामध्ये आगामी काळात होणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी करत असतानाच 28 च्या मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातांनी मारोतीरायाच्या मंदिरातील मुख्य गेटमधून आत प्रवेश करुन दानपेटी फोडून त्यातील सोने, चांदी आणि रोख रक्कमही लंपास केली आहे.
चोरीचा हा सर्व प्रकार मंदिर प्रशासनाने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, चोरट्यांनी तोंडाला पांढरा रुमाल बांधला असल्याने त्यांचे चेहरे झाकले गेले असल्याचे दिसत आहे.
त्यानंतर चोरट्यानी आपला मोर्चा गावातील तीन ते चार घराकडे वळविला त्यामध्ये बाबुराव गड्डमवार यांच्या घरात शिरून आलमारी फोडून नासधूस केली असून त्यांच्या घरातील व्यक्ती जागी होताच चोरट्यांनी पलायन केले.
तसेच चोरटयांनी रामकिशन भाटे यांच्या घराचे दार काढून एकाने आत प्रवेश केला होता मात्र दुसरा चोरटा बाहेर असतानाच काहीजण जागे झाल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी तिथूनही पलायन केले. त्यानंतर या चोरट्यानी गावातीलच संसंतोष आंचेटवाड यांच्या घरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यांच्या घरातील अलमारीची तोडफोड करून नासधूस केली, मात्र चोरट्याना येथे काहीच मिळून आले नाही. सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.