नाशिक : नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असून धुकं पडू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिले आहे. शेतकऱ्यांना शेतीपिकावर औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असून पहाटेपासूनच द्राक्ष उत्पादक शेतकरी औषध फवारणी करू लागला आहे. कांद्यावरही मोठ्या प्रमाणात धुकं पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे शेतीपिकावर करपा रोग येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात औषध फवारणी करावी लागते. त्यामुळे अधिकचा खर्च शेतकऱ्यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामान खात्याकडून राज्यातील काही भागात पाऊसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रविवार पासूनच शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दुसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण आणि धुकं असल्याने ऐन थंडीत शेतकऱ्यांना घाम फुटला आहे.
थंडीचा महिना असतांना पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्याने शेतकऱ्यांनी धास्ती बसली असून ढगाळ वातावरण आणि धुकं यामुळे शेतीपिकावर करपा रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ढगाळ वातावरणात करपा रोग येण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून औषध फवारणी करावी लागत आहे, त्याचा अतिरिक्त भार शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
ढगाळ वातावरणात रब्बीच्या पिकांसह कांद्याच्या पिकावर करपा रोग येण्याची शक्यता असते. त्यातच धुकं असल्याने द्राक्षबागाही अडचणीत येतात. पावसाचा अंदाज असल्यानं शेतकरी धास्तावला आहे.
रविवारी अचानक वातावरणात झालेला बदल बघता नागरिकांची लगबग मोठ्या प्रमाणात दिसून आली. यामध्ये पाऊस पडू शकतो अशी स्थिती निर्माण झाल्याने नाशिकमध्ये बळीराजा अडचणीत सापडण्याची स्थिती आहे.