मुंबई: चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना (Police) जमिनीवर राहून काम करावे लागते, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले. पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो. त्यामुळे पोलिसांनी प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधान बाळगणेही गरजेचे असते, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. (CM Uddhav Thackeray at convocation ceremony of Police academy in Nashik)
ते मंगळवारी नाशिकच्या पोलीस प्रबोधिनीतील 118 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस उप निरीक्षक पदाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. या तेरा महिन्यांच्या प्रशिक्षणातून तुम्ही सुदृढ शरीर कमावलेच आहे. पण निरोगी आणि निकोप मनही या सेवेसाठी आवश्यक ठरते. कारण सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नव्या पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुकही केले.
कोरोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे. त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे. तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे. गुन्हेगारी क्षेत्राचे हे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढू लागले आहे. बँकींगमधील ऑनलाईन गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले, तरीही त्या गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत.
खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. पण बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल. प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाला असा विश्वासही मला आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या या परिवारात तुमचे स्वागत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल, अशी अपेक्षा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा :
पोलीस दलाला जनतेच्या मनातून उतरवणाऱ्यांची गय करणार नाही, अजित पवारांचा थेट इशारा
‘त्या’ लेटरबॉम्बमुळे अजितदादांनाही राजीनामा द्यावा लागला होता; वाचा, काय होतं प्रकरण?
परवानगी दिली तर फोन टॅपिंग होतं, अजितदादा संतापले, रश्मी शुक्लांची चौकशी अटळ?
(CM Uddhav Thackeray at convocation ceremony of Police academy in Nashik)