औरंगाबाद: राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असताना आता मराठा नेते विनोद पाटील यांनी एक महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. मराठा समाजाचा ओबीसींमध्ये (OBC) समावेश झाल्यास आम्हाला आनंदच होईल. त्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाही, असा दावा विनोद पाटील यांनी केला. विनोद पाटील यांच्या या भूमिकेमुळे आता मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाला नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (There is no harm in including Maratha community into OBC says Vinod Patil)
विनोद पाटील यांनी मंगळवारी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात भाष्य केले. मराठा समाज हा पूर्वीपासूनच कुणबी म्हणून ओबीसीमध्ये समाविष्ट आहे. विदर्भ, खानदेश आणि कोकणात मराठा कुणबी समाजाचा ओबीसीत समावेश झाला आहे. त्यामुळे इतर मराठा समाजाचाही सरकार जर ओबीसीत समावेश करणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यामुळे कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत. किंबहुना तसे होऊ न देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे विनोद पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असे मत राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आले आहे. ओबीसी महासंघाने यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता ओबीसीमध्ये मराठ्यांना सामावून घेण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत हे करू नका. ओबीसी समाजाची तात्काळ जनगणना करा. अनेक ठिकाणी 19 टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण मिळत आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने पाहावे. अन्यथा ओबीसी समाजही रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महांसघाने दिला आहे.
संबंधित बातम्या:
‘ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अन्यथा गंभीर परिणाम होतील’
‘प्रियांका, कंगनाला भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अवमान’
(There is no harm in including Maratha community into OBC says Vinod Patil)