मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या प्रकरणात महत्वाचा आरोपी वाल्मिक कराड पुणे सीआयडींना शरण आला आहे. वाल्मिक कराड या मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा व्यक्ती असल्याने तपासावर प्रभाव येऊ शकत असल्याने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करीत आहे. हा तपास सुरु असेपर्यंत मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. यावर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीला आले असताना प्रसारमाध्यमांना प्रतिक्रीया दिली आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण सीआयडीकडे सोपविल्याने आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही असे मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती.त्यानंतर २२ दिवसांनी मुख्यसूत्रधार वाल्मिक कराड पुणे सीआयडीला शरण आले होते. या प्रकरणात चौघा आरोपींना आधीच अटक झाली आहे तर तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटचे असल्याने तपास पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणात हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. त्यामुळे आपल्या राजीनाम्याची काही गरज नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याची मागणी आपणच विधीमंडळात सर्वप्रथम केली होती असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठ्या आकाला वाचविण्यासाठी छोट्या आकाचा एन्काऊंटर होणार असे वक्तव्य केले आहे. यावर विचारले असताना धनंजय मुंडे म्हणाले की तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत. छोटा आका आणि मोठा आका आणि एन्काऊंटर अशी भाषा मी पहिल्यांदाच तुमच्याकडून ऐकतोय..दिवंगत संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केली आहे. त्यांना फास्ट ट्रॅक खटला चालवून लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे कोणी काय बोलावे, कुणाचा एन्काऊंर होणार यास काही अर्थ नाही असेही मुंडे यावेळी म्हणाले. हे प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये गेले पाहीजे ही मागणी पहिल्यांदा मी केली. नागपूरच्या अधिवेशनात ही मागणी आपण केली होती. या प्रकरणात चार्जशिट दाखल करुन उर्वरित आरोपी अटक करुन फास्ट ट्रॅक खटला चालावा आणि आरोपींना फासी व्हावी असेही मुंडे यांनी सांगितले.
या प्रकरणात मुख्यमंत्र्यांशी आपली चर्चा झालेली नाही असेही मुंडे यांनी सांगितले. विरोधकांनी या प्रकरणात तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे असा सवाल विचारला असताना मुंडे यांनी हा तपास न्यायालयीन होणार आहे. कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून होऊ नये म्हणूनच हे प्रकरण सीआयडीकडे सोपवले आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्याची काही गरज नाही असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले. या प्रकरणात सर्व पक्ष एकत्र झाले होते असे विचारले असता संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्याने सर्व पक्ष एकत्र येणे हे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले.