LOKSABHA ELECTION : देशातील हे खास 10 चेहरे ठरवणार लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा, महाराष्टातून कोण?

| Updated on: Mar 17, 2024 | 6:50 PM

आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे अनेक तगडे वक्ते आणि नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसतील. तर, काही नेते पडद्याआड राहून पक्षाच्या विजयासाठी रणनीती तयार करतील. त्यामुळे वक्ते आणि पडद्याआडचे अशा सर्वच प्रमुख नेत्यांकडे, रणनीतीकारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

LOKSABHA ELECTION : देशातील हे खास 10 चेहरे ठरवणार लोकसभा निवडणुकीची दशा आणि दिशा, महाराष्टातून कोण?
INDIA AGHADI
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 17 मार्च 2024 : देशात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरु झाला आहे. पक्षांचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होईल. आरोप – प्रत्यारोप होतील. जाहीर टीका केली जाईल. आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारे अनेक तगडे वक्ते आणि नेते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले दिसतील. तर, काही नेते पडद्याआड राहून पक्षाच्या विजयासाठी रणनीती तयार करतील. त्यामुळे वक्ते आणि पडद्याआडचे अशा सर्वच प्रमुख नेत्यांकडे, रणनीतीकारांकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणेच देशात 10 असे प्रमुख नेते आहेत की जे निवडणुकीचे वातावरण एका हाती बदलू शकतात. त्यांचे निवडणुकीचे भाषण हे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाकडे वाटचाल करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी केवळ निवडणूक जिंकायची नाही तर पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाचीही बरोबरी करायची आहे. ‘मोदीची हमी’ आणि ‘विकसित भारत’ याभोवती निवडणूक प्रचार करणार आहेत. 73 वर्षीय मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याच्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात आहेत.

अमित शहा

केंद्रीय मंत्रिमंडळातील अघोषित ‘नंबर 2’ आणि भाजपचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे अमित शहा पुन्हा एकदा पक्ष रणनीतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. कलम 370 रद्द करणे असो किंवा नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक कठीण परिस्थिती हाताळल्या आहेत. 59 वर्षीय शाह पुन्हा एकदा निवडणुकीच्या रणांगणात कमांडरच्या भूमिकेत दिसणार आहेत.

राहुल गांधी

काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे ‘वैचारिक केंद्र’ म्हटले आहे. कन्याकुमारी ते काश्मीर ‘भारत जोडो यात्रे’मुळे त्यांची प्रतिमा बदलली. पण, पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्यांचा प्रवास किती परिणामकारक होता यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. ‘भारत जोडो न्याय यात्रे’द्वारे 53 वर्षीय राहुल गांधी जनतेला ‘न्याय’ मिळवून देण्याच्या उद्देशाने पुन्हा लोकांसमोर आले आहेत.

मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस कार्यकर्त्यापासून सुरुवात करून अध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले मल्लिकार्जुन खर्गे यांना सक्रिय राजकारणाचा पाच दशकांचा अनुभव आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी पक्षाची सूत्रे स्वीकारली. 81 वर्षीय खर्गे काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.

ममता बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी, जागावाटपावरून ‘इंडिया आघाडी’ सोबत बराच काळ वाद सुरू होता. 69 वर्षीय बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये भाजपला कडवी झुंज देतील. तर, संदेश खली प्रकरणावरून भाजप त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. विरोधी पक्षांसोबत न जाता त्यांनी ‘एकला चलो’ ही भूमिका घेतली असली तरी भाजप हाच त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असेल.

नितीश कुमार

सतत आघाडी, युती बदलण्यासाठी देशात प्रसिद्ध असलेले नितीशकुमार यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा बाजू बदलली. 73 वर्षीय नेत्याचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) जाणे हे ‘भारत’ आघाडीसाठी मोठा धक्का ठरला. भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे बिहारमध्ये भाजपला निवडणूक सोपी जाईल असे मानले जात असले तरी ‘स्विचिंग साइड्स’वर जनता काय निकाल देणार हे पाहणे मनोरंजक असेल.

शरद पवार

भारतीय राजकारणातील दिग्गजांमध्ये शरद पवार यांची गणना होते. 83 वर्षीय मराठा नेते, स्वतःचे पुतणे अजित पवार यांच्याकडून त्रासले आहेत. सर्वात कठीण लढाई ते या वयात लढत आहेत. लढाऊ बाण्याचे शरद पवार हे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपसाठी एक प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या पुढाकारानेच महाराष्ट्रात महाविकास आघाडी अस्तित्वात आली आहे.

एमके स्टॅलिन

डीएमके सुप्रिमो एमके स्टॅलिन यांनी तामिळनाडूमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले आहे. दक्षिणेकडील राज्यात भाजपच्या विरोधातली ही एक प्रमुख विरोधी शक्ती आहे. तामिळनाडूमध्ये एमके स्टॅलिन हे इंडिया आघाडीला महत्वाची आघाडी मिळवून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. 71 वर्षीय स्टॅलिन हे गांधी कुटुंबाचे कट्टर समर्थक आहेत.

तेजस्वी यादव

माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांच्यामुळे बिहारमध्ये भाजप आणि नितीशकुमार यांना धोका निर्माण होऊ शकतो. तेजस्वी यादव यांनी उत्साहाने बिहारमधील विरोधी गटाचे नेतृत्व हाती घेतले आहे. पण, एनडीएचे गणित ते बिघडवू शकतील की नाही याची चाचपणी लोकसभा निवडणुकीत होणार आहे.

असदुद्दीन ओवेसी

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे प्रमुख यांनी अनेकदा विधानसभा निवडणुकीत विरोधी आघाडीसाठी ‘स्पॉयलर’ची भूमिका बजावली आहे. काही नेत्यांनी त्यांना भाजपची ‘बी-टीम’ म्हणून संबोधले आहे. 54 वर्षीय ओवेसी हे तेलंगणाव्यतिरिक्त देशाच्या विविध भागांमध्ये त्यांच्या पक्षाच्या वाढीच्या आणि निवडणूक लढवण्याच्या अधिकारावर ठाम आहेत.