लोकसभा निवडणुकीतल दोन टप्प्यातील मतदान पार पडले असून आणखी बऱ्याच ठिकाणी मतदान होणं बाकी आहे. लवकरच देशभरात आणि राज्यातही अनेक ठिकाणी मतदान होणार असून अद्याप काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. कल्याण-डोंबिवलीतही निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय घारडा सर्कल सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात असून सोमवार पासून अधिकृत राजकीय पक्षांचे उमेदवार तसेच अपक्ष इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर 6 मे पर्यंत डोंबिवलीतील वाहतुकीत बदल करण्यात आला असून काही ठिकाणचे रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. निवडणूक विभागाचे कार्यालय सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने या काळात या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाईल.
वाहतुकीत बदल, पर्यायी मार्ग कोणता ?
कल्याण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय घारडा सर्कल सावळाराम म्हात्रे क्रीडा संकुलात आहे. प्रमुख राजकीय पक्षाकडून मोठ्या शक्ती प्रदर्शनाची शक्यता असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाकडून या काळात वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या निर्णयानुसार, 6 मे पर्यंत डोंबिवली स्टेशनकडून चार रस्ता टिळक चौक शेलार नाका मार्गे घारडा सर्कलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गात बदल करण्यात याला आहे. घारडा सर्कलच्या दिशने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवम रुग्णालयाकडे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने शिवम रुग्णालयाकडून उजवीकडे वळण घेत जिमखाना रोड सागर्ली मार्गे इच्छित स्थळी जातील.
तर पेंढारकर महाविद्यालय मार्गे घारडा सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना आर आर रुग्णालयाकडे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने आर आर रुग्णालयाकडून डावीकडे वळण घेऊन कावेरी चौक, एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी रवाना होतील. एवढंच नव्हे तर खंबाळपाडा रोड, 90 फूट रस्ता ठाकुर्ली रस्ता येथून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदिश पॅलेस हॉटेलकडे प्रवेश बंद करण्यात आला असून ही वाहने डावीकडे वळून विको नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. तर आजदे गाव आजदे कमान कडून घारडा सर्कलकडून बंदिश पलेस हॉटेल मार्गे जाणाऱ्या वाहनांना आजदे पाडा आजदे गाव येथून डावीकडे वळून शिवम रुग्णालय मार्गे इच्छित स्थळी जाता येईल. निवडणूक विभागाचे कार्यालय सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत सुरु राहणार असल्याने या काळात या अधिसूचनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.