मुंबई | 29 ऑक्टोंबर 2023 : 1980 साली निवडणूक झाल्या आणि माझ्यासोबत असलेले 59 आमदार निवडून आले. मी काही कारणाने बाहेर गेलो तेव्हा त्यातील 54 जण सोडून गेले. फक्त पाच लोक सोबत होते. नंतर निवडणूक झाली. त्यात केवळ दोनच निवडून आले. बाकी सगळे पडले. लोकांनी सगळ्यांना धडा शिकवला. लोकांना आपण जे काही करत असतो ते आवडत नाही. ती भूमिका लोकांना आवडत नाही. त्यावेळी ते गप्प बसतात. पण निवडणूक आली की जिथे बटन दाबायचे तिथेच ते दाबतात. लोक निकाल योग्य पद्धतीने लावत असतात, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा गटाला लगावला. अनेकांना बरेच दुरुस्त करायचे आहे. मग ते शेजारचे असतील किंवा आपले असतील, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.
आज जालना जिल्ह्यात मराठा समाजाचे उपोषण सुरु आहे. मी स्वतः जरांगे पाटील यांना भेटलो आहे. त्यांचे म्हणणे काय ते समजून घेतले. त्यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार विनिमय केला. दुर्दैवाने राज्य आणि केंद्र संदर्भात काही निर्णय देण्याची आवश्यकता होती ती त्यांनी घेतली नाही. त्याचा परिणाम महाराष्ट्रात वणवा पेटला. जरांगे पाटील यांची भूमिका स्वच्छ आहे आणि पक्ष म्हणून आमचीही भूमिका स्वच्छ आहे. पाटील यांची जय काही मागण्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता केंद्र आणि राज्य सरकारने केली पाहिजे.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी काय आहे? ते दुसऱ्याच्या कोणाच्या ताटातलं मागून घेत नाहीत. त्यांच्या ताटातले जे हे ते तिथेच राहायला पाहिजे. ते तिथेच ठेवून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. आज जी काय मराठा समाजाने मागणी केली आहे. त्यावर योग्य पद्धतीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. जर गाव रस्त्यावर येऊ लागले. मराठा समाजाचे संबंध आयुष्य सार्वजनिक जीवन असेल, शैक्षणिक क्षेत्र उध्वस्त होण्याची शक्यता दिसतं असेल आणि ते जर टाळायचं असेल तर राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने निर्णय घेतले पाहिजेत हा आग्रह सर्वांचा आहे. हाच निरोप घेऊन जयंत पाटील राजभवन येथे गेले आहेत असे शरद पवार म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती व्यवस्थित राहावी. त्यांना परमेश्वराने आणखी आयुष्य द्यावं. राज्याची परिस्थिती सुधारण्यासारखी एक स्थिती निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. आज राज्य आणि केंद्रात वेगवेगळ्या लोकांची सत्ता आहे. सत्ता बदलत रहाते. सर्व हिंदुस्तानचा नकाशा नजरेसमोर ठेवा राज्याराज्यात काय परिस्थिती आहे? असे सांगत त्यांनी देशभरातील राज्यांची स्थिती सांगितली.
केरळमध्ये भाजप आहे का? कर्नाटकमध्ये भाजप नाही. आंध्रमध्ये भाजप नाही, तेलंगणात भाजप नाही. महाराष्ट्रातही नव्हते पण खोटेपणा करून सत्ता आणली. गोव्यातही काँग्रेसचं राज्य होतं. पण माणसं फोडली आणि ते राज्य हातात आणले. मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ सरकार होते. तिथेही माणसं फोडली गेली. राज्यस्थानमध्ये भाजप नाही. हरियाणात नाही, दिल्लीत नाही. पंजाबमध्ये नाही, झारखंडमध्ये नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. सबंध देशाची यादी बघितली तर भाजपची सत्ता नाही हे नाहीचे बहुमत जास्त आहे. त्यांच्या हातातून सत्ता घेतली असाच याचा अर्थ आहे. लोकांना बदल हवाय तो बदल हवा असताना त्या बदलाला शक्ती देणारे सेवाभावीवृत्तीने साथ देणारे साथ देणारे कार्यकर्ते अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली.