बुलढाणा | 16 जुलै 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकारण संपविण्याचे प्रयत्न आपल्याच परिसरातून झाले असा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. अजित पवार यांच्यामध्ये चांगले गुण आहेत. त्यामुळेच शरद पवार यांनी त्यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवले. अजित दादा हे स्पष्ट वक्ता आहेत. राष्ट्रवादीमध्ये अजित दादा वरचढ ठरत होते. त्यामुळेच शरद पवार यांनी राजीनाम्याचा ड्रामा केला. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष पदही दिले नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले असा दावाही आमदार गायकवाड यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाणून बुजून नक्षलग्रस्त जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. तेव्हा सरकारने त्यांना झेड संरक्षण देण्याचे ठरवलं. मात्र, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह मंत्रालयाला फोन करून एकनाथ शिंदे यांना संरक्षण देऊ नका असे सांगितलं होते. मोताळा येथे एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड बोलत होते.
छत्रपती संभाजी राजे यांच्या घरात बैठक चालू असताना उद्धव ठाकरे यांचा फोन आला आणि एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा द्यायची नाही असा आदेश दिला होता. हा एकप्रकारे शिंदे यांना नक्षल्यांकडून संपवण्याचा कट शिजविण्यात आला होता असे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की बाळासाहेब कधी मरतात याची उद्धव ठाकरे वाट पाहत होते. ज्या बाळासाहेबांना जगातले लोक मानतात. त्या बाळासाहेबांच्या मृत्यूची वाट मातोश्रीमधील लोक पाहत होते. त्याची बातमी आज बाहेर आलीय, असा गौप्यस्फोटही आमदार गायकवाड यांनी यावेळी केला.
मातोश्रीमधून अनेक नेत्यांना हाकलून लावण्यात आले. ज्यांनी शिवसेना वाढविली त्यांनाच त्यांच्या घरातून हाकलले गेले. राज ठाकरे, नारायण राणे, रामदास कदम आणि आता एकनाथ शिंदे यांचाही त्या नेत्यांमध्ये समावेश आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.