मुंबई : आजी, आजोबा आणि नात किंवा नातू हे नाते विलक्षण वेगळे असते. नातवाचे पहिले मित्र हे आजी आजोबाच असतात. नात्याची खरी जडण घडण तिथूनच होत असते. आजी आजोबांच्या या घट्ट नात्याची ओळख नातवांशी होणे हे आजच्या काळात महत्वपूर्ण आहे. पाल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हे नाते गरजेचे आणि प्रेरणादायी आहे यासाठी शिंदे फडणवीस सरकारने एक नवा निर्णय घेतला आहे. दरवर्षीं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येणारा ‘आजी आजोबा’ दिवस आता राज्यातील शाळांमध्ये साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यासंदर्भात सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.
१० सप्टेंबर २०२३ रोजी ‘आजी आजोबा’ दिवस आहे. या दिवशी राज्यस्तर, जिल्हास्तर व शाळास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. त्यांनतर प्रत्येक वर्षी हा दिवस साजरा करण्यात यावा. या दिवशी शासकीय सुट्टी आल्यास त्याच्या पुढच्या कार्यालयीन दिवशी ह्या दिवसाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. तसेच, प्रस्तावित दिवशी कार्यक्रम घेता आला नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस ‘आजी आजोबा’ दिवस साजरा करावा असा निर्णय सरकारने घेतला आहे.
शाळेतील अनुभव यासह आजी आजोबांचे अनुभव, त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती पाल्यांना मिळणे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद, खेळ व गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून ओळख करून देणे, शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्याची दृढता होण्यासाठी ‘आजी आजोबा’ दिवस साजरा होणे आवश्यक आहे असे या शासन निर्णयात म्हटले आहे.