मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा अनेकांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत पक्ष कार्याला वाहून घेतले होते. त्याच बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यामुळे तोच मूळ शिवसैनिक पुन्हा पेटून उठला आहे. कलानगर येथे काल असंख्य शिवसैनिकांसमोर येत उद्धव ठाकरे यांनी जीपवर उभे राहून भाषण केले. त्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या त्या भाषणाची आठवण झाली. तर, एका युवतीने थेट आपल्या नोकरीचा राजीनामा देत पुन्हा एकदा त्या शिवसेनेच्या वेडाची आठवण करून दिली आहे. आपल्या तडाखेबंद, बिनधास्त भाषणामुळे ही तरुणी चर्चेत असते. शिवसेना विरोधी असणाऱ्या मोठ्या नेत्यांना आव्हान देण्यासही ही युवती मागे पुढे पहात नाही. एका प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करून तिला काळजी घेण्यास सांगितले होते.
निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर ही तरुणी फारच आक्रमक झाली. ती म्हणते, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवसेना सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेली आहे असं समोर येते. ह्या लोकांना वाटतं की आपण जिंकलो आहोत. सगळ्याच माध्यमांनी जेव्हा सर्व्हे घेतला तेव्हा त्यात निवडणूक आयोगाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल असे स्पष्ट झाले होते. त्यामुळे जो निवडणूक आयोगाने निकाल दिला आहे तो अयोग्यच आहे.
महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उद्धव साहेबांनी काल सांगितले आहे की लढाई आता खरी सुरू झालेली आहे. मला ह्या गद्दार टोळीला सांगायचे आहे की तुमच्या हातामध्ये चिन्ह आणि नावाचे लॉलीपॉप दिला आहे तो तुम्ही एकदा तपासून पाहा. ते लॉलीपॉप ओरिजनल आहे की थोडे दिवस चघळण्यासाठी दिले आहे हे एकदा तपासून पहा, असा टोला तरुणीने लगावला आहे.
शिवसेनेच्या जीवावर हे बाकीचे सगळे लोक मोठे झाले त्यांनी गद्दारी केली. काल संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले असेल की उद्धव ठाकरे यांच्या मागे सामान्य शिवसैनिक उभा आहे. आज मी माझ्या वैयक्तिक लेव्हलवर घोषणा करते की मी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत आहे. आज तुमच्या माध्यमातून मी सर्वाना सांगू इच्छिते की मी माझ्या नोकरीचा राजीनामा देत आहे.
माझ्या पक्षासाठी मला माझे पक्षाचे प्रमुख महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे सांगतील तिथे तिथे जाऊन मी फिरेल. माझ्या पक्षाचा प्रचार करेल. माझ्यासारखे असंख्य तरुण शिवसैनिक आणि ज्येष्ठ शिवसैनिक आज उद्धव ठकरे यांच्यासोबत आहे. लढाई अजून संपलेली आहे आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांचे सगळ्यांचे अस्तित्व आता संपलेले आहे. शिवसेना या चार अक्षरांसाठी आपल्या मल्टीनॅशनल कंपनीच्या नोकरीचा राजीनामा देणारी ही युवा तरुणी आहे शिवसेना सोशल मीडिया राज्य समनव्यक अयोध्या पोळ.