नुसतं साप हे नाव जरी ऐकलं तरी अंगावर काटा येतो. साप जर आपल्या घरामध्ये किंवा परिसरात निघाला तर मग विचारूच नका, आपण सापला घाबरतो कारण सापांबाबत आपल्या मनात अनेक गैरसमज आहेत. भारतामध्ये शेकडो प्रजातीचे साप आढळतात, मात्र त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती या विषारी आहेत. ज्यामध्ये नाग ज्याला आपण इंडियन कोब्रा असं म्हणतो त्याचसोबत मण्यार, फुरसे आणि घोणस या जातींच्या सापांचा समावेश हा विषारी प्रजातीमध्ये होतो. साप कुठेही आणि कधीही निघू शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, साप आपल्याला कधीही मुद्दाम चावत नाही, त्याला धोका जाणवला तरच तो आपल्याला चावतो. सर्पदंश झाला की लगेचच ताबडतोब संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे, त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू करावेत त्यामुळे त्याचा जीव वाचू शकतो.
जंगलामध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये थंडी आणि पावसाळ्यामध्ये साप निघण्याचं प्रमाण वाढतं. याच काळात संर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येत देखील वाढ होते. सापाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी याच काळात आदिवासी समुदाय आपल्या घराच्या परिसरामध्ये काही खास प्रकारच्या वनस्पती लावतात. ज्यामुळे साप घराकडे फिरकत देखील नाही, आणि समजा सापाने जर घरात प्रवेश केलाच तर त्याला घरातून हुसकवण्यासाठी पारंपरिक साधनांचा उपयोग केला जातो.
पलामू जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आदिवासी समाजातील उमेश सिंह यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की, आम्ही घराच्या परिसरात साप न येण्यासाठी वेखंडाचं झाडं लावतो. ज्यामुळे साप घरात प्रवेश करत नाहीत. वेखंडाच्या वनस्पतीमधून येणारा तीव्र वास सापाला दूर ठेवतो.ही वनस्पती सापांसाठी लक्ष्मण रेखाचं काम करते. त्यानंतर घरात तुम्हाला कधीही साप दिसणार नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले की जर समजा तुमच्या घरात साप निघालाच तर जिथे साप निघाला आहे, त्या घरामध्ये महुआ वृक्षाच्या सालीपासून निघणारं तेल जर जाळलं तर त्याच्या वासाने साप घरातून निघून जातो. रॉकेलचा उपयोग करून देखील तुम्ही तुमच्या घरातून सापाला पळून लावू शकता.
टीप वरील माहिती ही आदिवासी समाजाच्या पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर दिलेली आहे. यातील कोणत्याही माहितीची पुष्टी टीव्ही 9 करत नाही, तुमच्या घरात जर साप निघाला तर त्याची माहिती तातडीनं त्या परिसरात असलेल्या सर्पमित्रांना द्यावी.