गडचिरोली : जिल्ह्यात अनेक आंदोलनानंतर 1993 मध्ये दारूबंदी कायदा लागू करण्यात आला. मात्र, आता सलग 27 वर्ष लागू असलेल्या दारूबंदी कायद्याला धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील 1 हजार 2 गावं दारूबंदीच्या समर्थनात उभी राहिली आहेत. इतकंच नाही तर या गावांनी या ऐतिहासिक दारूबंदीची अंमलबजावनी करा, अशी पत्रं थेट मुख्यमंत्र्यांना लिहिली आहेत. जिल्हा दारूमुक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने ही पत्रं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहेत. सोबत 838 गावांचे प्रस्तावही पाठवण्यात आले (Thousands of Village support Alcohol Ban Law in Gadchiroli).
“दारूमुळे आदिवासींचे, मजुरांचे होणारे शोषण व महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी व विविध गावांनी एकत्र येऊन दारूमुक्त जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. दारूबंदीसाठी 1987-93 या कालावधीत जिल्हाव्यापी आंदोलनं झाली. आंदोलनाची दखल घेऊन शासनाने 1993 मध्ये शासकीय दारूबंदी लागू केली. 1993 पासून 2015 पर्यंत गावा-गावात दारूबंदी लागू झाली. आताच्या घडीला ही ऐतिहासिक दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली सुरु आहेत,” असं मत जिल्हा दारुबंदी संघटनेने व्यक्त केलंय.
दारुबंदी हटवण्याच्या निर्णयाची कुणकुण लागताच पुन्हा एकदा शेकडो गावांनी आंदोलन उभारण्याची तयारी दर्शविली आहे. जिल्हा दारुमुक्ती संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभय बंग यांच्या पत्रासह 838 गावांची निवेदने संघटनेचे उपाध्यक्ष आणि आदिवासी नेते देवाजी तोफा, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता यांच्या उपस्थितीत जिल्ह्याधिकारी यांना सादर करण्यात आले आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातील 1 हजार 2 एवढ्या गावांनी ठराव घेऊन दारूबंदीला समर्थन दर्शविले आहे.
जिल्ह्यात 27 वर्षांपासून टिकून असलेली दारूबंदी उठविल्यास व्यसनामुळे संसाराची धूळधाण होईल. घरात वाद-विवाद वाढतील. दारिद्र्यपणा येईल, शांतता भंग होईल, सुखी संपन्नता नष्ट होईल. आर्थिक बाजू कमकुवत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील दारूबंदी मुळीच हटवू नये. दारूबंदीची अंमलबजावणी अधिक प्रबळ करून नियम भंग करणाऱ्यास देण्यात येणाऱ्या शिक्षेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी दारुबंदी संघटनेकडून करण्यात आली. जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 2 गावे दारूबंदी कायम ठेवण्यासाठी पुढे आली आहेत. गावा-गावात ठराव घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून दारूबंदीची अंमलबजावणी करा, अशी विनंती केली जात आहे.
दारूबंदी कायम ठेवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या गावांमध्ये अहेरी तालुक्यातील 62, आरमोरी 49, भामरागड 82, चामोर्शी 96, देसाईगंज 28, धानोरा 122, एटापल्ली 118, गडचिरोली 101, कोरची 92, कुरखेडा 89, मुलचेरा 62, सिरोंचा 101. या गावांचा समावेश आहे. असे एकूण 1 हजार 2 गावे दारूबंदीच्या समर्थनात उभी आहेत.
संबंधित बातम्या :
BLOG: लोकलढा दारूमुक्तीचा : ‘दारू’कारण
सरकारला कोरोनापेक्षा दारूबंदी मोठी आपत्ती वाटते का? ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अभय बंग यांचा सवाल
व्हिडीओ पाहा :
Thousands of Village support Alcohol Ban Law in Gadchiroli