भिवंडी : भिवंडीत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. भिवंडीतील वलपाडा येथे एक तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याचं वृत्त आहे. मात्र, इमारतीखाली 60 ते 70 लोक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. अग्निशम दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदत कार्यास सुरुवात केली आहे. इमारतीचा ढिगारा उपसला जात असून त्याखालून लोकांना काढलं जात आहे. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. ही इमारत जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.
आज दुपारी 12 वाजता ही दुर्देवी घटना घडली. भिवंडीच्या वलपाडा येथे वर्धमान नावाची इमारत आहे. ही तळमजला अधिक तीन मजली इमारत आहे. या इमारतीच्या खाली गोडाऊन होता. तर इमारतीच्या वरच्या तिन्ही मजल्यावर लोक राहत होते. या गोदामात 30 ते 35 लोक काम करत असल्याची माहिती मिळते. दुपारी अचानक इमारती कोसळली आणि हे सर्व कामगार इमारतीखाली गाडले गेल्याचं सांगितलं जातं. तसेच इमारतीतील इतर रहिवासीही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत.
इमारत पडल्यानंतर धडाम धडाम असा आवाज आला. लोकांना वाटलं कसला तरी आवाज असेल. त्यानंतर पुन्हा एकदा मोठ्याने धडाम असा आवाज आला आणि अचानक धुराळा उडाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात धूळच धूळ झाली. त्यामुळे लोक सावध झाले आणि आवाजाच्या दिशेने धावले. तोपर्यंत ही संपूर्ण इमारत पत्त्यासारखी कोसळून जमीनदोस्त झाली होती. इमारत कोसळल्यानंतर एकच हाहाकार उडाला. आक्रोश आणि मातम सुरू झाला. काही लोक वाचवा वाचवा म्हणून मदत मागत होते. तर काही लोकांना जबर मार लागल्याचं दिसत होतं. स्थानिकांनी तात्काळ इमारतीचा ढिगारा उचलण्यास सुरुवात केली आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली.
या इमारतीतील गोदामातच 30 ते 35 लोक दबलेले होते. तर अनेक लोक घरात काम करत होते. त्यामुळे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे 60 ते 70 लोक दबल्याचं सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं जात आहे. आतापर्यंत किती जखमी झाले? या दुर्घटनेत किती दगावले? याची माहिती मिळू शकली नाही. मात्र, अग्निशमन दलाने आपलं काम युद्धपातळीवर सुरू केलं आहे.
या इमारतीतील गोदामात काम करणाऱ्या कामगाराने इमारत दुर्घटनेची माहिती दिली. आम्ही काही लोक जेवणासाठी गोदामात थांबलो होतो. त्यावेळी अचानक पडझड होत असल्याचा आवाज आला. त्यामुळे आम्ही गोदामाच्या बाहेर पळालो म्हणून आम्ही वाचलो. काही लोक आतच आहेत, ढिगाऱ्याखाली दबले आहेत, असं प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितलं.