नाशिक : नाशिकमधील शिवसेना (shivsena) पदाधिकारी, माजी नगरसेवक मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहे. नाशिकमधून सकाळच्या वेळेला शिवसेना पदाधिकारी हे मुंबईच्या (Mumbai) दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिदमे ही शिंदे गटात दाखल होताच त्यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. नाशिक हा शिवसेनेचा गड मानला जात असतांना असे पदाधिकारी शिंदे गटात जात असल्याने शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना ग्वाही देण्यासाठी आणि शिवसेनेसोबत आम्ही सर्व आहोत असे वचन देण्यासाठी नाशिकचे पदाधिकारी, माजी नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले आहे.
नाशिकमधील माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश करत त्यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली होती.
तिदमे यांच्या प्रवेशाने शिवसेनेत अस्वस्थता पसरली होती. शिवसेनेतून पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी होत असल्याने नाशिक शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याचे चित्र होते.
मात्र, नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, तो गड उद्धव ठाकरे यांच्याच पाठीशी असल्याचे वचन देण्यासाठी शिवसैनिक मातोश्रीवर जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये नियुक्त्या देत प्रवेश सोहळे करण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेने डॅमेज कंट्रोल करण्याचा हा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नाशिकमधील दोन आमदार आणि एक खासदार ही ताकद शिवसेनेची होती. त्यात हे तिन्हीही शिंदे गटात सहभागी झालेले असतांना पदाधिकारी मात्र ठाकरे यांच्या सोबत होते.
त्याच पदाधिकारी यांनाही आपल्याकडे वळविण्यास शिंदे यांनी सुरुवात केल्याने शिवसेनेत मोठी अस्वस्थता पसरली होती आणि त्याचमुळे शिवसैनिक आता ठाकरेंच्या भेटीला गेले आहेत.
त्यामुळे ठाकरे यांना वचन द्यायला गेलेल्या शिवसैनिकांना मातोश्रीवर उद्धव ठाकरे कसा प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
त्यातच आता दसरा मेळावा घेण्यावरून सुरू असलेले वादंग टोकाला पोहचले असून त्याबाबतही ठाकरे शिवसैनिकांना काही आदेश देतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.