मुंबईः भारतात टोमॅटो फ्लू (Tomato Flu) या आजाराच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होतेय. फक्त केरळमध्ये (Kerala) या आजाराचे 82 रुग्ण आढळले आहेत. केरळनंतर कर्नाटक, तमिळनाडू, ओडिशातही हे रुग्ण आढळून आलेत. विशेषतः लहान मुलं या फ्लूला जास्त बळी पडत आहेत. मुलांमधील हा हँड फुट माउथ डिसीज (Hand Foot Mouth disease) असेही म्हटले जातेय. वारंवार होणारे हवामान बदल आणि पावसाळ्यातील संभाव्य धोके लक्षात घेता, केंद्र सरकारने या आजारासंबंधी एक मार्गदर्शक सूची जारी केली आहे. यात टोमॅटो फ्लूची लक्षणं नेमकी काय आहेत, हा आजार होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची तसेच आजार झाल्यानंतर त्यावर काय उपाय करायचे, आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, यासंबंधीच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमधील महत्त्वाची माहिती काय आहे ते पाहुयात-
टोमटो फ्लू हा व्हायरल आजार असून यात प्रामुख्याने शरीरावर टोमॅटोच्या रंगाचे लाल फोड येतात. आजाराची इतर लक्षणे साधारण व्हायरल इंफेक्शनसारखी असतात. यात ताप, शरीरावर रॅशेस, सांधेदुखी, थकवा, घशात खवखव आदींचा समावेश आहे. आजाराचा संसर्ग झाल्यास आधी थोडा ताप येतो. मग घसा दुखतो. तापेचे दोन-तीन दिवस झाल्यानंतर शरीरावर लाल रंगाचे डॉट्स दिसू लागतात. त्यानंतर त्याचे मोठे फोड होतात. प्रामुख्याने तोंडात, जिभेवर किंवा हिरड्यांवर हे फोड येतात.
– रेस्पिरेटरी सँपल्सद्वारे या आजाराचा संसर्ग कळून येतो. आजाराची लक्षणे जाणवल्यास 48 तासांच्या आतच श्वसनाचे नमूने देता येतील.
– फेसल सँपल्स अर्थात मल नमून्यांद्वारेही या आजाराची तपासणी होते. पण हे सँपल्सदेखील 48 तासांच्या आतच घेणे आवश्यक आहे.
टोमॅटो फ्लू झाल्यास कोणतेही ठराविक औषध दिले जात नाही. व्हायरल आजारांसाठी जी औषधं देतात, तीच सध्या तरी डॉक्टरांमार्फत दिली जात आहेत. आतापर्यंत 10 वर्षांच्या खालील मुलांमध्ये हा आजार सर्वाधिक आढळला आहे. त्यामुळे बालकांच्या सुरक्षेची चिंता सध्या देशाला सतावतेय.
केंद्र सरकारने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो फ्लू होण्यामागील नेमके कारण काय ठरते, यावरही शास्त्रज्ञ रिसर्च करत आहेत. मात्र हे व्हायरल आजाराचेच एक स्वरुप मानले जात आहे. डेंग्यू किंवा चिकनगुनियाचा हा एक साइट इफेक्ट आहे, असे काहींचे मत आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एका विषाणूद्वारे हा आजार पसरतो, मात्र तो विषाणू नेमका काय आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही.