मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा आधीच्या सत्ताधाऱ्यांचा डाव होता, असा खळबळजनक दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. परमबीर सिंग यांच्या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्टी दिली आहे. मी सहकारी असताना मलाही अडकवण्याचा डाव होता, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री एकनात शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. परमबीर सिंग यांच्या आरोपात तथ्य आहे. मी सहकारी असून मला देखील अडकवण्याचा तेव्हा प्रयत्न झाला होता, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मात्र, शिंदे यांनी कुण्याही एका व्यक्तीचं नाव न घेतलं नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीच्या काळात मला अडकवण्याचा प्रयत्न झाला. पण यावर मी योग्यवेळी बोलणार आहे, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
लाडकी बहीण योजनेचे पैसे शनिवारी दिले जाणार आहेत. त्यावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टीका केली आहे. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही या योजनेवर मागील काही महिन्यांपासून काम करत होतो. अचानक योजना आणली नाही. लाडकी बहीण योजना आणल्याने अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. दीड हजार रुपये बहिणीला देणार आहोत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री झालेलं पचत नाही
मातोश्रीवर झालेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांना संताजी, धनाजींसारखा सारखा मीच दिसतो. मी मुख्यमंत्री झालोय हे त्यांना अजूनही पचत नाहीये. आमचे सरकार पाडणार असल्याचं रोजच बोललं जात आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
तेव्हा आले नाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलावण्याची सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याचं शरद पवार म्हणाले होते. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. जेव्हा आम्ही सर्व पक्षीय बैठक बोलावली तेव्हा आले नाहीत. येणार येणार म्हणत असताना आले नाहीत. निवडणुका येतात जातात, पण असं वातावरण असणं योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पोलिसांचा मोठा बंदोबस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड – हिंगोली दौऱ्यावर आहेत. नांदेड विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर पोलीस त्यांना मानवंदना देणार आहेत. नांदेड विमानतळावरून मुख्यमंत्री वाहनाने हिंगोलीकडे रवाना होणार आहेत. हिंगोलीत आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा ते वाहनाने नांदेड विमानतळावर येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मराठा आंदोलकाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.