नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच जानेवारी ते बारा जानेवारी या काळात मंदिर मंदिर बंद राहणार आहे. या आठ दिवसांच्या काळात भाविकांना त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाता येणार नाहीये. भारतीय पुरातत्व विभागाने जाहीर निवेदन केले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील ज्योतिर्लिंगाच्या पिंडीची झीज रोखण्यासाठी वज्रलेप आणि मंदिर देखभाल अशा दोन्ही कामासाठी हे मंदिर बंद ठेवले जाणार आहे. या काळात मात्र मंदिरात नित्याने केली जाणारी त्रिकाल पूजा सुरू राहणार आहे. दरम्यान या काळात मंदिर पूर्णपणे बंद असल्याने भाविकांनी आठ दिवस सहकार्य करावे असं आव्हान त्र्यंबकेश्वर संस्थानच्या वतिने करण्यात आले आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असल्याने हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनसाठी येत असतात. नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करणाऱ्या भाविकांची येथे मोठी रिघ पाहायला मिळत असते. विशेष म्हणजे नाशिकमधील थंडीचा अनुभव घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटक देखील त्र्यंबक राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. याशिवाय श्रावण महिन्यात सुद्धा मोठी गर्दी येथे होत असते.
त्र्यंबकेश्वर मंदिर हे 12 जानेवारी पर्यन्त बंद असणार आहे. या काळात मंदिरातील गर्भगृह पिंडीची आणि पाळची होत असलेली झीज थांबविणे याकरिता वज्रलेप केला जाणार आहे.
याशिवाय महादेवाच्या पिंडीचे संवर्धन भारतीय पुरातत्त्व खात्याच्या माध्यमातून केले जाणार आहे. या दरम्यान भाविकांनी सहकार्य करावे असं आवाहन त्र्यंबकेश्वर संस्थानच्या वतिने केले आहे.
त्र्यंबकेश्वर संस्थानच्या वतिने अनेकदा पिंड संवर्धन आणि मंदिराच्या देखभाली करिता भारतीय पुरातत्व खात्याकडे विनंती करण्यात आली होती, अनेक वर्षानी हे काम पूर्ण होणार असल्याने विश्वस्त मंडळात समाधानाचे वातावरण आहे.