तुळजापूरः देशात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF7 संक्रमित झाला असल्याने शासनाकडून आता खबरदारीचा इशारा म्हणून दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता तुळजाभवानी मंदिर संस्थानानेही इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नियमानुसार महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक, भक्त, महंत, पुजारी आणि कर्मचाऱ्यांना मंदिर परिसरात मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सध्या भारतात कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएन्ट BF-7 संक्रमित झाला आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये येणाऱ्या प्रत्येकानी कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मंदिर संस्थांनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत आदेश काढले आहेत. कोरोना BF 7 व्हेरियंटच्या अनुषंगाने उपाय योजना केल्या जात आहेत.
त्यामुळे मंदिर आणि परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क असल्याशिवाय प्रवेश देऊ नये अशा सूचना मंदिर प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव 30 डिसेंबर पासून घटस्थापनाने सुरुवात होत आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच व्हेरिएन्ट बीएफ सेव्हन संक्रमित होत असल्याने शासनाकडून आता नियम कडक केले जात आहेत.
तुळजाभवानी मंदिराबरोबरच राज्यातील अनेक मंदिरामध्येही मास्क सक्ती केली जात आहे. त्यामुळे दर्शन घेणाऱ्या भाविकांनी आता मास्क असल्याशिवाय बाहे पडू नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत, त्यामध्ये मंदिर व मंदिर परिसरात सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचबरोबर सुरक्षित आंतर ठेवण्यासही सांगण्यात आले आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकाऱ्यांकडून कळविण्यात आले आहे.