नाशिक : राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी वादग्रस्त विधान केल्या प्रकरणी भाजपकडून (BJP) त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. त्यातच भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे. छगन भुजबळांना थेट अंडासेल दाखविण्याची वेळ आल्याचे भोसले यांनी म्हंटले आहे. इतकंच काय तर भुजबळ ही राष्ट्रवादीचे ओवेसी असल्याचा उल्लेख करत तमाम हिंदूंचा अपमान केला आहे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे विषारी गरळ ओकून हिंदू समाजात तेढ निर्माण करून दंगली घडविण्याचा कट आहे. आणि म्हणून माफी न मागता आपल्या हिंदू विरोधी भूमिकेवर ठाम राहणाऱ्या पवारांच्या हस्तकाला पुन्हा एकदा अंडासेल दाखविण्याची वेळ आता आली आहे, अशी जहरी टीका भुजबळांच्या विरोधात भाजपच्या तुषार भोसले यांनी केली आहे.
भुजबळ यांनी शाळेमध्ये सावित्रीबाई फुलेंचा फोटो लावला पाहिजे. महात्मा फुलेंचा फोटो लावला पाहिजे. शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावा. कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो लावला पाहिजे.
पण, सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो लावतात. ज्या सरस्वतीला आम्ही कधी पाहिलं नाही. जिने आम्हाला काही शिकवलंच नाही.
असेलच शिकवलं तर फक्त तीन टक्के लोकांना शिकवलं आहे आणि आम्हाला दूर ठेवलं तर त्यांची पूजा कशासाठी करायची ? असा सवाल उपस्थित करत भुजबळांनी हे विधान केले होते.
त्यांच्या वादग्रस्त विधानावरून भाजप आक्रमक झाले असून भुजबळ फार्मवर आत्तापर्यंत भाजप युवा मोर्चा, भाजप महिला आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करत सरस्वती पूजन देखील केले आहे.
छगन भुजबळ यांनी माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यालयाच्या बाहेर भाजप आंदोलन करेल आणि माफी मागायला भाग पाडू असा इशारा भाजपच्या उमा खापरे यांनी दिला होता.
त्यातच आता भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष असलेले तुषार भोसले यांनी भुजबळांवर जहरी टीका केली आहे.