Maharashtra News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच विधानसभेसाठी मुंबईत विशेष रणनीतीही आखणार आहेत. यावेळी ते मुंबईतील विविध आमदार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत आहे. महाविकासआघाडी आणि महायुतीत जागावाटपाच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर काही पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच पुढील पाच दिवस महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहिल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गुजरातमधील चक्रीय स्थितीमुळे राज्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
चिपळूणमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. पावसाचा जोर वाढत आहे.
लोकसभा निवडणुकीत पंकजा ताई उभ्या होत्या याच मतदारसंघाने 75 हजाराची लीड घेतली होती हे विसरणार नाही. आता कोणी कोणाला ही पक्षाला घेत आहे. त्यांना त्यांची लायकी परळी जनता दाखवून देईल. दादा आज काही मागणार नाही. हा मतदारसंघ आम्ही जिंकणारच. महायुतीचे सहाही उमेदवार जिंकून आणणार आहोत. हा संकल्प मंत्री धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सात तारखेला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ निहाय राज ठाकरे बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे इच्छुक उमेदवारांच्याही भेटीगाठी घेणार आहेत. सात तारखेला दिवसभर राज ठाकरे यांच्या मॅरेथॉन बैठका होणार आहेत.
शिगेरू इशिबा यांची जपानचे 102 वे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मोठा धक्का बसला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने समलखाचे उमेदवार धरमसिंह छाउकर यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. धरमसिंह छाउकर यांच्याविरुद्धच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सांगितले की, एकतर तो उद्यापर्यंत आत्मसमर्पण करेल अन्यथा त्याला अटक करण्यात येईल. प्रत्यक्षात काँग्रेस नेते आणि आमदार धरमसिंह छाउकर यांच्यावर अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही कोणतीही कारवाई झालेली नाही.
हरियाणाच्या बहादूरगडमध्ये एका सभेला संबोधित करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की, “जेव्हा आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा सध्या 1,200 रुपयांना विकले जाणारे गॅस सिलिंडर 500 रुपये प्रति सिलिंडरने विकले जाईल. तसेच महिलांना दरमहा 2000 रुपये दिले जातील.’
दिल्ली जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत महिला वकिलांना आरक्षण देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने गुरुवारी सुनावणी घेण्याची मागणी केली असून न्यायालयाच्या निर्देशाअभावी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे म्हटले आहे. त्यावर न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले की, आम्ही या खटल्याची तारीख दिली आहे. हायकोर्ट बार असोसिएशनला प्रस्ताव मांडू द्या. काय करायचे ते बघू, निवडणुका पुढे ढकलताही येतात. ही गोष्ट आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे नाही.
अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या समर्थकांनी घेतली शरद पवारांची भेट
एकनाथ शिंदे गटाने आझाद मैदान आणि बीकेसी या दोघांची चाचपणी केली असली तरी बीकेसीत यंदा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती आहे.
जळगावच्या जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयातील समस्या तसेच एमआयडीसी उद्योगासंदर्भात आंदोलन केल्याने पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याचा शिवसेना उबाठा पक्षाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप. मंत्री गिरीश महाजन व त्यांचे स्वीय सहाय्यक यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक केल्याचा राहुल चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला आरोप.
“देशभरातून लोकं त्यांच्या मुल मुलींना पुण्यात शिक्षणासाठी पाठवतात. पुण्याला चांगलं शहर म्हणून ओळख आहे.ही घटना झालीच कशी? याचा फॉलोअप आम्ही करणारं आहोत. सरकार लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात, पण आज अनेक महिला म्हणतायत आम्हला 1500 नको. आमच्या मुली सुरक्षित ठेवा. याआधी आंदोलन करून सुद्धा कारवाई झाली नव्हती. म्हणून हे परत आंदोलन करतोय” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. पुण्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांनी वाडिया विद्यालयाच्या गेटसमोर आंदोलन केलं.
“मोदीजी म्हणाले की यंत्रमाग कामगारांना आम्ही युनिफॉर्म शिवण्यासाठी देऊ. मात्र मोदीजी यंत्रमाग कामगार हे टॉवेल आणि नॅपकिन तयार करतात युनिफॉर्म नाही. देशाच्या पंतप्रधानांना एवढे देखील माहिती नाही ही शोकांतिका आहे” अशी टीका खासदार प्रणिती शिंदे यांनी केली.
महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात विद्यार्थ्यांच आंदोलन. विद्यालयाचे ट्रस्टी सचिन सानप आणि अशोक चांडक यांच्यावरती गुन्हा दाखल करावा यासाठी करण्यात येतेय आंदोलन. आंदोलनात खासदार विद्यार्थ्यांसोबत सुप्रिया सुळे सहभागी. पुण्यात सोशल मीडियावरून झालेल्या ओळखीतून चार जणांनी महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर अत्याचार केल्याची घडली होती घटना.
छत्रपती संभाजीनगर- मनोज जरांगे पाटील यांच्या आज मॅरेथॉन बैठका होणार आहेत. बीड जिल्ह्यातील नारायण गडावरील दसरा मेळाव्यासाठी जरांगे पाटील यांच्या बैठका होणार आहेत. आज छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात बैठका होणार आहेत. या बैठकीला मोठ्या संख्येने मराठासेवक उपस्थित राहणार आहेत.
“मी गोविंदा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनासाठी राज्य सरकार आणि जनतेच्या वतीने सदिच्छा व्यक्त केल्या. गोविंदा आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण काळात सर्व आवश्यक मदत मिळेल याची खात्री दिली आहे. आमच्या सदिच्छा आणि प्रार्थना त्यांच्यासोबत आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
सोलापूर- एकीकडे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीतर्फे खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात संग्राम मोर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे ऊस बील मिळावं या मागणीसाठी काँग्रेस भवनबाहेर शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मातोश्री कारखान्याचे थकीत ऊस बिल न दिल्याने शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन सुरू आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात संग्राम मोर्चा सुरू असतानाच शेतकऱ्यांचं काँग्रेस भवनबाहेर अर्ध नग्न आंदोलन सुरू आहे.
मुंब्र्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पाण्याच्या मुद्द्यावरून बेमुदत धरणे आंदोलन होत आहे. आंदोलनासाठी अनेक मुंब्रावासीय नागरिक एकवटले आहेत. मुंब्रा, कौसा परिसरात कचरा आणि पाणी पुरवठाबाबत ठाणे महानगर पालिकेकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप आहे. ठाणे पालिकेचे विरोधीपक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.
स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हाती धनुष्यबाण आणि हिंदू धर्म रक्षक सनातन धर्म रक्षक म्हणून ताम्र पत्र देऊन त्यांचा सन्मान केला. “महाराष्ट्रात सनातन संस्कृती जागृत ठेवण्याचं आणि हिंदू धर्म सुरक्षित ठेवण्याचं महत्वाचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हिंदू अस्मिता आणि शिवसैनिकांचे दैवत असलेले हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जातं असल्याचा गर्व आम्हाला आहे,” असं ते म्हणाले.
सोलापूर काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघाला संग्राम मोर्चा… शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्या, सरसकट कर्जमाफी करा, पिक विम्याची भरपाई द्या, पाण्याचे योग्य नियोजन करा.. यासह विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा या मागण्यांसाठी भव्य संग्राम मोर्चा काढण्यात आलाय… सोलापुरातील चार हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा जाणार आहे…
धनगर आरक्षण अहवालाबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या चौकटीत अडकून घेऊ नये. मताच्या राजकारणामुळे तुम्ही स्वतःला अडचणीत आणू नका, ॲट्रोसिटी दाखल होऊ शकतो, असा इशारा आंबेडकर यांनी दिला आहे. त्यांनी कायद्याप्रमाणे वागावे , असेही आंबेडकर यांनी नमूद केलं.
बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हावेत, ठाणे जिल्ह्यातील शाहपूरमध्ये अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे.
अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या गाडीवर गोळीबार झाला आहे. जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोव्हा गाडीवर गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने गोपाल यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. पोलीस तपास सुरू.
फडवणीस याना विनंती आहे, आमचे आरक्षण द्यावे, मग आचारसंहिता लावावी, अशी मागणी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
शहरातील वर्दळीच्या ठिकाणी धारधार शस्त्राने युवकावर हल्ल्याने खळबळ… आकाश धनवटे असं हल्ला झालेल्या युवकाचे नाव, हल्ल्याच कारण मात्र अद्याप अस्पष्ट… हल्ल्यात युवक गंभीर जखमी, पोलीस घटनास्थळी दाखल… सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, पोलीस तपास सुरू
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानला धमकी मिळाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. … करते
राज्यातील कुचकामी नेत्यांमुळे मोदी, शाहांचे दौरे… अमित शाह गल्लीगल्लीमध्ये बैठका घेत आहेत… निवडणुका होईपर्यंत देशाची राजधानी महाराष्ट्रात आणतील… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
धक्कादायक विद्यार्थी बसलेल्या खोलीचा स्लॅब काही भाग कोसळला… सुदैवाने जीवित हानी नाही अंगणवाडी सेविका किरकोळ जखमी… नांदेडच्या हदगाव तालुक्यातील राजवाडी घटना…
जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाने सुद्धा दावा केलेला आहे. चाळीसगाव, जळगाव ग्रामीण , एरंडोल पारोळा, तीन जागा जिंकून देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी तयारीला लागण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलून दिल्या आहेत. यामुळे चाळीसगाव, जळगाव ग्रामीण , एरंडोल- पारोळा, या तीन मतदारसंघांमध्ये जागांबद्दल महाविकास आघाडीमध्ये पेच कायम असून या तीन जागांवरून नवीन वाद होण्याची शक्यता आहे.
अमरावतीच्या दर्यापूर शहरातील बस स्टँड चौक ते जुन्या नगरपालिकेपर्यंतच्या ब्रिटिश कालीन कडूनिंबाच्या झाड तोडण्यास वृक्षप्रेमींचा विरोध आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सुद्धा दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने मनमानी कारभार वृक्षप्रेमींचा आरोप आहे. अकोटचे भाजपा आमदार प्रकाश भारसाकडे व वृक्षप्रेमी आमने-सामने आले आहेत. शाब्दिक चकमक झाल्यानंतर झाड तोडणी थांबवली आहे. भाजप आमदार प्रकाश भारसाकडे व नगरपालिका प्रशासनाची पोलिसांच्या दालनात चर्चा सुरू आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने झाडे तोडण्यास न्यायालयीन आदेश असल्याचे कबुली दिलीय. न्यायालयीन आदेश दाखवा वृक्षप्रेमींनी रेटून मागणी धरली आहे.
लक्ष्मण हाके यांनी मद्याप्राशन केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला. पण आता लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केलं नसल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी केली होती. प्राथमिक अहवालात त्यांनी दारु पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढलाय. त्यानंतर आणखी खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकिय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेत. त्यांचा अहवाल येण्यासाठी आणखी एक दोन दिवस लागू शकतात.
अभिनेता गोविंदच्या पायाला गोळी लागली आहे. बंदूक साफ करताना गोविंदाला गोळी लागली आहे. गोविंदा आज पहाटे 5 वाजता घरातून निघणार होता. त्यावेळी घरी परवाना असलेली बंदूक साफ करत असताना त्याच्या पायाला गोळी लागली.गोविंदाला क्रिटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांचे समर्थक उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेणार आहेत. उमेश पाटील समर्थकांकडून अजित पवारांना विनंतीसाठी भेट घेणार आहेत. उमेश पाटलांसाठी अजित पवारच दैवत आहेत. त्यामुळे उमेश पाटलांना अंतर देऊ नये अशी समर्थकांची विनंती आहे. दोन दिवसात उमेश पाटील समर्थक अजित पवारांची भेट घेणार आहेत.
ठाणे महापालिकेला हरित लवादाकडून 102 कोटीचा दंडाची नोटीस पाठवण्यात आली आहे. उल्हास नदी आणि खाडीत सोडले विना प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडण्यात आले. देसाई खाडीच्या हद्दीत येत असलेल्या उल्हास नदीच्या पात्रात प्रक्रिया न केलेल्या सांडपाणी सोडल्याने ठाणे महापालिकेला तब्बल 102.4 कोटी नुकसान भरपाई देण्याचे आदेश पुणे हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत. पर्यावरण हानीसाठी ही दंडाची रक्कम ठाणे महापालिकेला भरावी लागणार आहे.
जागा वाटपावरून महायुतीत पुन्हा रस्सीखेच सुरू झालं आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड विधानसभेवर अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. खुद्द अजित पवारांनीच कन्नड विधानसभेवर दावा सांगितला आहे. कन्नड विधानसभेवर दावा सांगतानाचा अजित पवारांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष कोल्हे यांना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.
महायुतीत कन्नडची जागा शिंदे गटाच्या वाट्याला येणार आहे. मात्र अजित पवारांनी कन्नड विधानसभेवर दावा सांगितल्याने पुन्हा एकदा महायुतीत तिढा निर्माण होईल, असे म्हटलं जात आहे.
पुण्यातील कारखान्याच्या काचा फुटून ४ जणांचा मृत्यू झाला होता. आता याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नवी दिल्ली : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणीची तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ही सुनावणी होणार का याकडे राज्याचे लक्ष लागलं आहे. अजित पवारांना घड्याळ चिन्ह देऊ नये, यासाठी शरद पवार गटाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरही आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या घड्याळ चिन्हाबाबत शरद पवार गटाला आक्षेप आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना वेगळे चिन्ह द्या, अशी शरद पवार गटाने याचिकेद्वारे मागणी केली आहे. त्यामुळे या दोन्हीही प्रकरणावर सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.