Maharashtra Breaking News LIVE 19 September 2024 : धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर धमाने फाट्याजवळ दोन एसटींचा अपघात

| Updated on: Sep 19, 2024 | 9:57 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 19 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 19 September 2024 : धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर धमाने फाट्याजवळ दोन एसटींचा अपघात
Follow us on

Maharashtra News Live : महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने सुरु आहेत. त्यातच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महायुतीत जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरुन राजकारण सुरु झाले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने बैठकीत ‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता यावरुन विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. तसेच येत्या शनिवारी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशी यांचा शपथविधी पार पडणार आहे. अतिशी यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत विविध घडामोडी घडत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 19 Sep 2024 07:39 PM (IST)

    दिल्ली येथे होणार्‍या 98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून निवड

    दिल्ली येथे होणार्‍या 98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची राज ठाकरे यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. पुण्यातील लोणी काळभोर येथील प्रसाद गवळी यांच्या बोधचिन्हाची अंतिम निवड करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजमुद्रा आणि साहित्याची पारंपारिक लेखणीचा बोधचिन्हात समावेश करण्यात आला आहे. साहित्य संमेलनाची राष्ट्रीय पातळीची बोधचिन्ह निवड स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत 100हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.  बोधचिन्ह निवडण्याची जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

  • 19 Sep 2024 06:55 PM (IST)

    विरोधी पक्ष नेत्यांना तोंडार पडावा लागलं- देवेंद्र फडणवीस

    विरोधी पक्ष नेत्यांनी अभ्यास करून बोललं पाहिजे बातमी आली म्हणून लगेच माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची हे आता बंद केल पाहिजे. आज अक्षरशः विरोधी पक्ष नेत्यांना तोंडार पडावा लागलं. उद्योग बाहेर गेला नाही असं त्यां कंपनीने खुलासा केला. महाराष्ट्रात कमिटमेंट केलं तो उद्योग उभारणारच, त्याव्यतिरिक्त उद्योग आणणार असल्याचा खुलासा कंपनीने केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


  • 19 Sep 2024 06:30 PM (IST)

    वसई विरार महापालिकेच्या अनाधिकृत पथकाकडून फेरीवाल्यांवर धडक कारवाई

    वसई विरार महापालिकेच्या प्रभाग समिती डी च्या अनाधिकृत पथकाकडून आज फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. प्रभाग समिती ‘डी’ चे प्रभारी सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाही झाली आहे.

    नालासोपारा पूर्व लिंक रोड, डी मार्ट, अग्रवाल नाका, गालानगर या सर्व ठिकाणी ही तोडक कारवाई करण्यात आली असून फेरीवाल्यांच्या दादागिरीचे कंबरडे मोडले आहे.

    या करवाहित मुजोरगिरी करणाऱ्या सर्व्हे नंबर 6 मधील 2 हजार स्क्वेअर फुटाचे पत्र्याचे शेड, आणि 130 फेरीवाल्यांच्या हातगाड्या, पानटपरी तोडून टाकण्यात आल्या आहेत.

     

  • 19 Sep 2024 06:19 PM (IST)

    अपघातात 14 जण किरकोळ जखमी

    धुळ्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर धमाने फाट्याजवळ दोन एसटींचा अपघात झाला आहे. धुळ्याहून शिरपूरकडे जाणाऱ्या एसटी बसणे शहादाकडे जाणाऱ्या एसटीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी करण्यात आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

     

  • 19 Sep 2024 06:15 PM (IST)

    अहमनगरमधील कोपरगाव शहरामध्ये गोळीबार

    अहमनगरमधील कोपरगाव शहरामध्ये गोळीबाराची घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोपरगावमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ हा गोळीबार झाला आहे.

  • 19 Sep 2024 05:55 PM (IST)

    पाच किंवा सहा ऑक्टोबरला पक्षप्रवेशाची शक्यता

    आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. पितृपक्ष पंधरवडा संपल्यानंतर पाच किंवा सहा ऑक्टोबर रोजी पक्षप्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

  • 19 Sep 2024 05:27 PM (IST)

    सिडकोच्या माध्यमातून ४० हजार घरे बांधण्यासाठी प्रयत्न करणार

    संजय शिरसाठ यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारताच मोठी घोषणा केली आहे. शिरसाठ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिरसाठ यांनी या दरम्यान काही घोषणा केल्या. सिडकोच्या माध्यमातून ४० हजार घरे बांधण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं. तसेच लवकरच 10 दिवसांत सिडकोची लॉटरी काढणार असल्याची घोषणा शिरसाठ यांनी केली. सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचा शब्दही शिरसाठ यांनी दिला. तसेच सर्वसामान्यांसाठी काम करणार , चुका असतील तर दुरूस्त करू, असंही त्यांनी सांगितलं.

  • 19 Sep 2024 04:52 PM (IST)

    एक देश, एक निवडणूक हे मोठे षड्यंत्र- अखिलेश यादव

    सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एक देश, एक निवडणूक हे मोठे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. भाजप निवडणूक आयोगच रद्द करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एक देश, एक निवडणूक यानंतर निवडणूक आयोगाचे काम काय असेल?

  • 19 Sep 2024 04:37 PM (IST)

    आसिफ ख्वाजाच्या वक्तव्यावर अब्दुल्ला संतापले

    पाकचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांच्या वक्तव्यावर फारुख अब्दुल्ला संतापले. ख्वाजा यांच्या वक्तव्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, पाकिस्तान काय म्हणतो याने मला काही फरक पडत नाही. मी पाकिस्तानी नाही. मी भारतीय आहे. कलम 370 वर पाकिस्तान सरकार आणि नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युती एकत्र असल्याचे ख्वाजा म्हणाले होते.

  • 19 Sep 2024 04:25 PM (IST)

    वन नेशन वन इलेक्शनचा निर्णय ऐतिहासिक – मुख्यमंत्री धामी

    वन नेशन वन इलेक्शन बाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की वन नेशन वन इलेक्शन ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे आणि हा एक ऐतिहासिक निर्णय आह. त्याच्या अंमलबजावणीनंतर बराच वेळ आणि पैसा नक्कीच वाचेल आणि त्याचा वापर विकास कामांमध्ये केला जाईल. .

  • 19 Sep 2024 04:12 PM (IST)

    भाजपचा जाहीरनामा हा कॉपी पेस्ट – भूपेंद्र सिंह हुड्डा

    हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यावर भूपेंद्र सिंह हुड्डा म्हणाले की, भाजपचा जाहीरनामा हा आमचा कॉपी-पेस्ट आहे. आम्हाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे.

  • 19 Sep 2024 03:58 PM (IST)

    खासदार भास्कर भगरेंची जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

    नाशिक जिल्हा रुग्णालयात खा. भास्कर भगरे यांनी अचानक भेट दिली. रुग्णालयाचा प्रशासन आढावा घेत आहे. जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे उपस्थितीत होते. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांकडून खासदार भगरेंनी माहिती घेतली.

  • 19 Sep 2024 03:55 PM (IST)

    दौंड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताना उमेदवारी द्या- शरद पवारांना खास पत्र

    दौंड विधानसभा मतदारसंघात निष्ठावंताना उमेदवारी द्या. साहेब तुम्ही आयराम गायाराम नेत्यांना आपली दारे उघडी ठेवू नका. निष्ठावंत कार्यकर्त्यांने शरद पवार यांना लिहलेलं पत्र व्हायरल झाले आहेत.पोस्ट कार्डच्या माध्यमातून दौंडमधील उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांनी शरद पवारांना सल्ला दिला आहे. पत्राच्या माध्यमातून रमेश थोरातांच्या उमेदवारीला शरद पवार गटाचा अप्रत्यक्ष विरोध दिसून आला.

  • 19 Sep 2024 03:40 PM (IST)

    लाडक्या बहि‍णींना देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

    सर्व लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी मार्च महिन्यापर्यंत बजेट करुन ठेवले आहे. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

  • 19 Sep 2024 03:30 PM (IST)

    दंगल रोखली, त्या अधिकाऱ्याची बदली का? – जितेंद्र आव्हाड

    ज्या पोलिसांनी दंगल थांबवली त्याची बदली का करण्यात आली? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भिवंडीत गणपती विसर्जनाच्या आधी दंगल होण्याची शक्यता होती, मात्र पोलिसांनी योग्य वेळी लाठीचार्ज करून परिस्थिती नियंत्रणात आणली. काही लोकांना हा लाठीचार्ज पटला नाही, ज्यामुळे सरकारने डीसीपीला बदली केली अशी टीका त्यांनी केली.

     

  • 19 Sep 2024 03:21 PM (IST)

    अजित पवार यांचा विरोधकांवर हल्लाबोल

    लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी यांनी केला. राज्यात जातीय सलोखा राहिला पाहिजे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. विधानसभेला धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केलं.

  • 19 Sep 2024 03:10 PM (IST)

    खडसे यांनी अश्लील भाषणं केली-चंद्रकांत पाटील

    मी एकनाथ खडसे यांच्याकडे बघतच नाही. आता त्यांचं शिल्लक राहिलं काय? त्यांच्याकडे बघायची स्थिती राहिलेली नाही. खडसे म्हणतायेत राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे. मला खडसेंना सांगायचं आहे की खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरला आहे. सार्वजनिक भाषणामध्ये अश्लील भाषणे तुम्ही केले. खडसेंचा माझ्यासाठी विषय संपलेला आहे. निवडणुका समोर आहे, येऊ द्या मी त्यांना उत्तर देईल, असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • 19 Sep 2024 03:00 PM (IST)

    लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा

    सरकारने मनोज जरांगे याच्या दबावाला बळी पडून हैद्राबाद गॅझेट लागू करू नये. मुळात सरकार लागू करत असलेले हैद्राबाद गॅझेट हे स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे त्यामुळे ते बेकायदेशीर ठरेल. सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू केल्यास ओबीसी समाज शांत बसणार नाही, असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे.

  • 19 Sep 2024 02:49 PM (IST)

    नाशिक – भाजप, शिंदे गटाच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन

    भाजप, तसेच शिंदे गटाच्या निषेधासाठी नाशिकमध्येही काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे. भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस कडून निषेध करण्यात येत आहे. नवनीत बिट्टू, संजय गायकवाड, अनिल बोंडे यांच्या निषेधार्थ हे आंदोलन असून भाजप नेत्यांच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी देखील केली जात आहे.

  • 19 Sep 2024 02:40 PM (IST)

    भाईंदर – नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं आंदोलन सुरु

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे पक्षातील कार्यकर्ते नाराज आहेत. त्या निषेधार्थ भाईंदर येथे नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून कार्यकर्ते अतिशय आक्रमक झाले आहेत.

  • 19 Sep 2024 01:57 PM (IST)

    आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न

    राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयाबाहेर आत्मदहन आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. राष्ट्रीय महामार्गाच्या सहाय्यक अभियंतांच्या कार्यालयाबाहेर आंदोलकांनी अंगावर डिझेल टाकले. सटाणा शहरातील महामार्ग 752 वर झालेल्या अतिक्रमण काढण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

  • 19 Sep 2024 01:41 PM (IST)

    शिवसेनेच्या महिला सेनेचे सुनील केदार विरोधात आंदोलन

    शिवसेनेच्या महिला सेनेचे सुनील केदार विरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करण्याच्या केलेल्या वक्तव्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

  • 19 Sep 2024 01:29 PM (IST)

    नाशिकमध्ये काँग्रेसचे आंदोलन

    नाशिकमध्ये काँग्रेसचे राहुल गांधींच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांच्याबाबत भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

  • 19 Sep 2024 01:06 PM (IST)

    नेवासा फाटा येथे धनगर समाजाचे उपोषण

    धनगर समाजाकडून राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. अहमदनगर जिल्हयातील नेवासा फाटा येथे देखील सहा धनगर बांधवांनी उपोषणास सुरूवात केली आहे. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, एसटीच्या सर्व सवलती लागू कराव्या या मागण्यांसाठी उपोषण केले जात आहे.

  • 19 Sep 2024 12:59 PM (IST)

    पंढरपूर- उपोषणकर्ते गणेश केसकर यांची अचानक तब्येत बिघडली

    पंढरपूर- उपोषणकर्ते गणेश केसकर यांची अचानक तब्येत बिघडली आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झाल्याने उपोषणकर्ते गणेश केसकर यांना त्रास झाल्याची माहिती समोर येत आहे. धनगर समाजाला एससी आरक्षणातून अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज अकरावा दिवस आहे. उपोषणकर्ते गणेश केसकर यांना खाजगी रुग्णालयात दाखल केलंय.

  • 19 Sep 2024 12:50 PM (IST)

    बच्चू कडू यांची 25 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार

    बच्चू कडू यांची 25 तारखेला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. “18 मागण्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला, अजून काही त्यावर उत्तर आलं नाही. त्यांची मानसिकता दिसत नाही. जर प्रश्न सुटला नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढवणार,” असं ते म्हणाले.

  • 19 Sep 2024 12:40 PM (IST)

    ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आठवड्याभरात निर्णय घ्या- हायकोर्ट

    अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आठवड्याभरात निर्णय घ्या, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सेन्सॉर बोर्डाला दिले आहेत. सेन्सॉर बोर्डानं ‘हो’ किंवा ‘नाही’ ते ठरवायलाच हवं. प्रदर्शनाची परवानगी देणार नसाल तर, 25 सप्टेंबरच्या सुनावणीत कारणांसह स्पष्टीकरण सादर करा, असेही आदेश कोर्टाने दिले आहेत.

  • 19 Sep 2024 12:30 PM (IST)

    हरियाणामध्येही भाजपकडून लाडकी बहीण योजना

    हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. हरियाणामध्येही भाजपकडून लाडकी बहीण योजना राबवली जाणार. महिलांना दर महिन्याला 2000 रुपये दिले जाणार. अग्नीवीर युवकांना सरकारी नोकरीची गॅरंटी आणि 50 हजार स्थानिक तरुणांना नोकरी देण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यातून देण्यात आलंय.

  • 19 Sep 2024 12:20 PM (IST)

    हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध

    नवी दिल्ली- हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. संतांच्या भूमीमधून आम्ही जाहीरनामा प्रसिद्ध करतोय, असं नड्डा यावेळी म्हणाले.

  • 19 Sep 2024 12:10 PM (IST)

    काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक

    कोल्हापूर- काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात कोल्हापुरातील शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन सुरू झालंय.

  • 19 Sep 2024 11:56 AM (IST)

    ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह 6 जणांचे आमरण उपोषण

    ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्यासह 6 जणांचे आमरण उपोषण सुरू. अंतरवाली सराटी गावात सुरूय ओबीसी नेत्याचे आमरण उपोषण. सरकारने कोणत्याही प्रकारचे हैद्राबाद, सातारा किंवा मुंबई गॅझेटीयर लागू करू नये. जर सरकारने कोणतेही गॅझेट लागू केले तर त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहोत असं मंगेश ससाणे यांनी म्हटलं आहे.

  • 19 Sep 2024 11:55 AM (IST)

    रूपाली चाकणकर या बाप बदलणांऱ्या सारख्या आहेत- रोहिणी खडसे

    “रूपाली चाकणकर यांना बाप बदलणं सोपं आहे. आधी पवार साहेबांसोबत होत्या. नंतर सुप्रिया सुळे. ज्या जनतेने सर्व दिलं, त्या जनतेच्या होऊ शकत नाहीत, त्या आपल्या काय होतील?” असं रोहिणी खडसे यांनी म्हटलं आहे. ‘माझ्या वडिलांचा वारशावर मी सध्या काम करते, याचा मला अभिमान आहे’ असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

     

  • 19 Sep 2024 11:19 AM (IST)

    भिवंडी दगडफेक प्रकरणात पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची बदली

    भिवंडीत गणपती विसर्जन आणि ईद-मिलादुन्नबी मिरवणुकीदरम्यान झालेली दगडफेक, मारहाण व गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी भिवंडीचे पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. मोहन दहिकर यांची नियुक्ती झाली आहे.

  • 19 Sep 2024 11:16 AM (IST)

    अलिगढ विद्यापीठात SC/ST आरक्षणच नाही – अनिल बोंडे

    “लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा प्रत्येकाला आधिकार आहे. पण का आंदोलन करत आहात ते तर सांगा ना. अमेरिकेत जाऊन यु टर्न मारायचा ही यांची पद्धत. अलिगढ आणि तर काही विद्यापीठात SC/ST आरक्षणच नाही. यांना फक्त अल्पसंख्याक समाजाचं हित पाहायचं आहे. यांना फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचं हित बघायचं आहे. खरा गुन्हा राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झाला पाहिजे. राहुल गांधी यांनी माफी मागितली पाहिजे” अशी मागणी अनिल बोंडे यांनी केली.

     

  • 19 Sep 2024 10:59 AM (IST)

    अंधेरीत लोखंडवाला परिसरात बंगल्याला आग

    अंधेरीत लोखंडवाला परिसरात बंगल्याला आग , आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली ते कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • 19 Sep 2024 10:57 AM (IST)

    रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड बंदची हाक

    महायुतीच्या नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे.  माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी आज सिल्लोड बंदची हाक दिली.  दानवे यांच्या निषेधार्थ आज मोर्चा देखील काढण्यात येणार आहे.

    सिल्लोड पाकिस्तान आहे का ? जनतेने रहावे की नाही असं व्यक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं. त्या निषेधार्थ आज  सिल्लोड शहर कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

  • 19 Sep 2024 10:46 AM (IST)

    भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली

    भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे.  भिवंडी पोलीस उपायुक्त म्हणून आता डॉ. मोहन दहिकर यांची नियुक्ती झाली आहे.  गणपती मिरवणूक आणि मुस्लिम जुलूसातील घटनांमुळे  बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

  • 19 Sep 2024 10:34 AM (IST)

    अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा ?

    अजित पवार गटाकडून मराठवाड्यातील 5 जागांवर दावा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  पाथरी, जालना शहर, घनसावंगी , गंगापूर आणि धाराशिव कळंब या मतदारसंघावर अजित पवार गटाकडून दावा केला जाणार आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.  दावा केल्या जाणाऱ्या या मतदार संघात अजित पवार गटाचा एकही आमदार नाही.

  • 19 Sep 2024 10:24 AM (IST)

    मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं ? संजय राऊत यांचा खोचक सवाल

    मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं ?  ते अर्थमंत्री कधी झाले? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला.

    याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत, त्यांनी नवीन घटना लिहू नये अशी टीकाही राऊत यांनी केली.

  • 19 Sep 2024 10:20 AM (IST)

    संविधानातील मार्गदर्शक तत्वं बदलत आहेत – संजय राऊत

    संविधानातील मार्गदर्शक तत्वं बदलली जात आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केला.

    आमचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णतः विरोध आहे. देशाच्या विरोधात असणारी ही कृती आहे. देशाच्या दृष्टीने याचा काहीही फायदा नाही, असे ते म्हणाले.

  • 19 Sep 2024 10:19 AM (IST)

    नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना मिळणार गिफ्ट

    नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईकरांना मिळणार गिफ्ट.  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हे मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्याची शक्यता. तसेच ठाणे रिंग मेट्रोच्या भूमिपूजनाचा नारळ ही फुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरे ते बीकेसी दरम्यानची १० स्थानकं प्रवाशांसाठी खुली होणार

  • 19 Sep 2024 10:11 AM (IST)

    साखर उद्योगातील धोरणात्मक बदलासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू

    साखर उद्योगातील धोरणात्मक बदलासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू,  कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींच्या उपस्थितीत राज्यस्तरीय खांडसरी आणि गुळ पावडर असोसिएशनची बैठक संपन्न.  ऊस उत्पादक, गुळ पावडर प्रकल्पधारकांचं मत विचारातं घ्यावं अशी भूमिका असोसिएशनने मांडली.

  • 19 Sep 2024 09:57 AM (IST)

    जे. पी. नड्डा यांची राहुल गांधींवर टीका

    भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्राला उत्तर दिलं आहे. तुमचे अयशस्वी उत्पादन जनतेने वारंवार नाकारले आहे आणि पुन्हा राजकीय मजबुरीमुळे ते बाजारात आणण्याच्या प्रयत्नात तुम्ही पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. पत्र वाचल्यानंतर मला असं दिसतंय की, तुम्ही वास्तवापासून दूर आहात. तुम्हाला राहुल गांधींसह तुमच्या नेत्यांच्या गैरकृत्यांचा विसर पडला आहे किंवा तुम्ही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे, अस दिसतंय. देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आता आपल्या प्रसिद्ध राजपुत्राच्या दबावाखाली ‘कॉपी पेस्ट’ पक्ष बनला आहे, असं म्हणत जे. पी. नड्डा यांनी राहुल गांधी यांच्यावर पत्रातून टीका केली आहे,

  • 19 Sep 2024 09:45 AM (IST)

    पुण्यात तिघांचा आकस्मित मृत्यू

    पुण्यातील विसर्जन मिरवणुकी दरम्यान तिघांचा आकस्मित मृत्यू झाला आहे. मृत्यू नेमक्या कशामुळे हे शवविच्छेदन अहवालातून समोर येईल. ससून रुग्णालयाने ही माहिती दिली आहे. नयन ढोके वय 27 , विशाल बल्लाळ वय 35 व अन्य एक 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेहांचे ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये त्याचा अहवाल येणार आहे.

  • 19 Sep 2024 09:30 AM (IST)

    60 वर्षांपूर्वीचा हात बॉम्ब आढळला

    अहमदनगर तालुक्यातील नारायण डोह येथे 60 वर्षांपूर्वीचा हात बॉम्ब आढळून आला आहे. 60 वर्षांपूर्वीचा हात बॉम्ब असल्याने थोड्याच वेळात अहमदनगर स्टेशनं बॉम्ब स्कॉड पथकाला करण्यात पाचारण करण्यात आलं आहे. नारायण डोह येथील एका घराजवळ आडळून आला. साधारण तिनं किलो वजनाचा हात बॉम्ब होता. नगर तालुक्यात जास्त आर्मी परिसर असल्याने युद्धावेळी किंवा सरावं करताना या ठिकाणी अनेक वेळा दारू गोळा आढळून आल्याने हा हातबॉम्ब त्यातीलच एक भाग असण्याची शक्यता आहे. या आधी देखील नारायण डोह परीसरा मध्ये दोन ते तिनं वेळा हात बॉम्ब आढळून आला होता.

  • 19 Sep 2024 09:15 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरातील लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार असल्याचा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा सरकारला दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने सहाव्यांदा उपोषणाला बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू, आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही, असं मराठा समाजाने इशारा दिला आहे. 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत. मात्र त्यापूर्वी सकल मराठा समाजाने त्याला आता तीव्र विरोध दर्शवला आहे.

  • 19 Sep 2024 08:17 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यात अजित पवार विरुद्ध शरद पवार लढत, बापू पठारे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

    पुणे – वडगाव शेरी मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट निवडणूक होणार ?

    माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने समीकरणे बदलली

    भाजपचे जगदीश मुळीक पण महायुतीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक

    बापू पठारे यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे

    महायुती विरुद्ध बापू पठारे अशी होणार लढत होण्याची शक्यता !

  • 19 Sep 2024 08:15 AM (IST)

    उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मालगाडीचे डब्बे घसरले, सुदैवाने जीवितहानी नाही

    नवी दिल्ली : उत्तर भारतात रेल्वे मालगाडीला दोन ठिकाणी अपघात

    उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरून घसरले

    मथुरामध्ये तब्बल 25 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले तर बिहारच्या मुजफ्फरपुर मध्ये मालगाडीचे चार डबे घसरले

    दोन्ही घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी नाही

    दोन्ही घटनांमुळे अनेक रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदललं

  • 19 Sep 2024 08:14 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्याची शक्यता

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक

    पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर

    निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींच्या आज दोन जाहीर सभा

    दुपारी बारा वाजता श्रीनगर मध्ये तर तीन वाजता कटरामध्ये मोदींची जाहीर सभा

    मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात

  • 19 Sep 2024 08:12 AM (IST)

    Maharashtra News Live : नंदुरबारमध्ये हेल्थ एटीएम मशीनचा मोठा फायदा, दहा मिनिटात होणार दहा तपासण्या

    – नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याच्या समस्या कमी होणार…..

    – आरोग्याच्या समस्या कमी करण्यासाठी हेल्थ एटीएम मशीन लावण्यात आलेत……

    – दहा मिनिटात दहा तपासण्या करता येतात…..

    – कमी वेळात अधिक तपासण्या होत असल्याने या हेल्थ एटीएम मशीन चा फायदा ग्रामीण भागात होत आहे…..

    – सातपुड्याच्या दुर्गम भागात ६१ मशीन देण्यात आले आहेत…..

    – जिल्हा खाजगी योजना अंतर्गत हे मशीन देण्यात आले आहेत……

    – तीन कोटी ७८ लाख २० हजाराचे ६१ मशीन खरेदी केलेत….

    – हेल्थ एटीएम मशीन मुळे जिल्ह्यातील कमी मनुष्यबळात अधिक तपासण्या होत आहेत….

    – जिल्ह्यात आरोग्याच्या प्रश्न सोबतच रिक्त पदांच्या मोठा प्रश्न आहे….

    – एका व्यक्तीकडून या मशीनला हाताळण्यात येत असतं….

     

  • 19 Sep 2024 08:09 AM (IST)

    Maharashtra News Live : नंदुरबार शहराला एक दिवसाआड होणार पाणीपुरवठा

    नंदुरबार – २५ सप्टेंबर पासून नंदुरबार शहराला एक दिवसाआड होणार पाणीपुरवठा

    – नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोघी धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा झाल्याने निर्णय

    – आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची माहिती

  • 19 Sep 2024 08:08 AM (IST)

    Maharashtra News Live : गोंदियात तलवारीने केक कापून हवेत गोळीबार करत वाढदिवसाचे सेलिब्रेशन, तीन जणांना अटक

    गोंदिया – तलवारीने केक कापून हवेत गोळीबार करणाऱ्या तिघांना अटक

    भारतीय हत्यार कायद्यान्वये तिघांविरूध्द गुन्हा दाखल

    गोंदियाच्या घीवारी येथील घटना