Maharashtra News live : देशात आमच्या 400 पेक्षा अधिक जागा येतील : सुभाष भामरे

| Updated on: Jun 03, 2024 | 8:51 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 3 जून 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News live : देशात आमच्या 400 पेक्षा अधिक जागा येतील : सुभाष भामरे
Follow us on

लोकसभा निवडणुकीसाठी उद्या 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये मतमोजणीसाठी पाचशे पोलिस ऑनड्युटी असून एसआरपीएफ, सीआरपीएफ, पोलिस यांचा तीन स्तरावर बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रासह बाहेरील परिसरात पाचशेहून अधिक सशस्त्र पोलीस तैनात असणार आहे. डॉ राजेश ढेरे यांच्याकडून झालेल्या अपघाताची सहआयुक्त मिलिंद सावंत हे चौकशी करणार. ढेरे यांनी त्यांची गाडी रुबेदा शेख यांच्यावर चढवली होती ज्यात शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात ढेरे यांना अटकही करण्यात आली होती मात्र कोर्टाने त्यांना जामीन दिला. पुण्याच्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा किलो कांद्याला 275 रूपये बाजारभाव मिळाला. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. शेतकऱ्याने उन्हाळी कांदा साठवणूक करण्यास सुरवात केल्याने कांद्याची आवक घटली. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 03 Jun 2024 06:09 PM (IST)

    नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती

    जळगाव : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दत्तात्रय कराळे यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार पाहिला आहे. जळगावचे तत्कालीन पोलीस अधीक्षक असलेल्या दत्तात्रय कराळे यांचे आता नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पदी निवड झाली आहे. नाशिक विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदासाठी दत्तात्रय कराळे यांच्या नावाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. आज विशेष पोलीस महानिरीक्षक पदासाठी अखेर दत्तात्रय कराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. गृह विभागाचे व्यंकटेश भट यांनी दत्तात्रय कराळे यांच्या नियुकिक्तीचे आदेश काढले आहे.

  • 03 Jun 2024 05:41 PM (IST)

    माझा 1 लाख मताधिक्याने विजय होईल : सुभाष भामरे

    देशात आमच्या 400 पेक्षा अधिक जागा येतील, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे यांनी व्यक्त केला आहे. तसेच माझा 1 लाख मताधिक्याने विजय होईल, असंही सुभाष भामरे म्हणाले. सुभाष भामरे हे धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आहेत.


  • 03 Jun 2024 05:18 PM (IST)

    धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर

    निकालापुर्वीच शिवसेना उबाठा उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनर लावण्यात आले आहेत. दुसऱ्यांदा खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असे लावले भले मोठे बॅनर पाहायला मिळत आहेत. याआधी धाराशिव तालुक्यातील जागजी येथे बॅनर लागले होते. गुलालाची उधळण करीत पेढे वाटून शिवसैनिक आजपासूनच सुरु करत आहेत.

  • 03 Jun 2024 04:52 PM (IST)

    दिल्लीतील पाणीटंचाईवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, 5 जूनला होणार बैठक

    दिल्लीतील पाणीटंचाईवर तातडीची बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. 5 जून रोजी बैठक होणार आहे. केंद्र सरकार, हरियाणा सरकार, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली सरकारची तातडीची बैठक होणार आहे. दिल्लीतील पाण्याची समस्या सोडवावी लागेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

  • 03 Jun 2024 04:45 PM (IST)

    4 जूननंतर इंडियाची युती तुटणार आहे: रविशंकर प्रसाद

    भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले की, या भारत आघाडीला दारुण पराभवाला सामोरे जावे लागणार आहे. 4 तारखेनंतर त्याचे विघटन होणार आहे.

  • 03 Jun 2024 04:30 PM (IST)

    एनडीएला कर्नाटकात 25 पेक्षा जास्त जागा मिळतील: एचडी कुमारस्वामी

    एक्झिट पोलवर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, सर्व मीडिया चॅनेल्स आणि खासगी एजन्सींनी आपला कल दिला आहे. एनडीए बहुमताने विजयी होणार आहे. कर्नाटकात भाजप आणि जेडीएस 25 हून अधिक जागा जिंकणार आहेत. या निवडणुकीत जनता कर्नाटक सरकारला नाकारणार आहे.

  • 03 Jun 2024 04:20 PM (IST)

    दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले राजकुमार आनंद यांचा राजीनामा स्वीकारला

    आम आदमी पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप करून पक्षाचा राजीनामा देणारे राजकुमार आनंद यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. राजीनामा स्वीकारण्यापूर्वीच आनंद यांनी बसपमध्ये प्रवेश केला होता.

  • 03 Jun 2024 04:04 PM (IST)

    भाजपने हरियाणातील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले; रणदीप सुरजेवाला

    काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी कर्नालमध्ये भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, भाजपने हरियाणातील तरुणांचे जीवन उद्ध्वस्त केले आहे. पेपरफुटीचा आणि भरती परीक्षेत हेराफेरीचा आरोप करत ते म्हणाले की, किमान 20 लाख तरुणांना याचा फटका बसला आहे. मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी राजीनामा द्यावा.

  • 03 Jun 2024 03:53 PM (IST)

    पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करा… केंद्रीय निवडणुक आयोगाचा राज्य निवडणुक आयोगाच्या पत्रावर शेरा..

    उद्धव ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रावर शेरा. राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परीषद घेतली होती.

  • 03 Jun 2024 03:51 PM (IST)

    सायबर चौकात झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

    कोल्हापुरातील सायबर चौकात झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज आलं समोर. भरधाव वेगातील कार न दुचाकीस्वारांना अक्षरशः चिरडलं. अपघातात तिघांचा मृत्यू. भरधाव कार चालकाचा देखील अपघातात मृत्यू झाल्याची माहिती.

  • 03 Jun 2024 02:56 PM (IST)

    सांगलीत मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त

    लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया उद्या पार पडणार आहे. सांगलीच्या मिरज येथील वेअर हाऊस मध्ये उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सांगलीत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

  • 03 Jun 2024 02:48 PM (IST)

    नवी दिल्ली : धीरज शर्मा शरद गटातून अजिट गटात

    एनसीपी नेते धीरज शर्मा हे शरद पवार गटातून अजित पवार यांच्या पक्षात जाणार आहेत. शर्मा अजित पवार यांच्या नवी दिल्लीतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत.

  • 03 Jun 2024 02:32 PM (IST)

    निकालाच्या आदल्या दिवशीच सुभाष भामरे यांच्या विजयाचे बॅनर

    लोकसभा निकालाच्या आदल्यादिवशीच धुळे शहरात खासदार सुभाष भामरे यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. धुळे शहरातील मिल परिसरात सुभाष भामरे यांच्या लोकसभा निवडणुकीत विजयाबद्दल अभिनंदन करणारे बॅनर लागले आहेत. माजी नगरसेवक अमोल मासुळे यांनी हे बॅनर लावले आहेत.

     

  • 03 Jun 2024 02:26 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड शहरात गोडावूनला भीषण आग

    पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी परिसरात सहा गोडाऊनला भीषण आग लागली आहे. आगीत गोडाऊन मधील संपूर्ण साहित्य पूर्णपणे जळून खास झाला आहे.

     

  • 03 Jun 2024 02:12 PM (IST)

    निकालाआधीच अमरावतीत नवनीत राणांच्या विजयाचे बॅनर

    निकालापूर्वीच अमरावतीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या अभिनंदनाचे बॅनर लागले आहेत. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खाजगी सचिव अविनाश काळे यांनी हे बॅनर अमरावतीच्या राजकमल चौकात लावले आहेत.

  • 03 Jun 2024 01:57 PM (IST)

    Marathi news: भिवंडीत मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

    भिवंडी लोकसभा मतदार संघातील यंत्रणा मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.20 मे रोजी पार पडलेल्या मतदान वेळी एकूण 12 लाख 50 हजार 76 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नोंदवला होता.

  • 03 Jun 2024 01:45 PM (IST)

    Marathi news: म्हाडाच्या जमिनीवर बेकायदा होर्डिंग

    मुंबईतील म्हाडाच्या जमिनीवरील ६२ होर्डिंग्जपैकी ६० होर्डिंग्ज बेकायदा आहेत, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.

  • 03 Jun 2024 01:25 PM (IST)

    Marathi news: आचार संहिता उल्लंघन झाल्याच्या 495 तक्रारी

    देशात आचार संहिता उल्लंघन झाल्याच्या 495 तक्रारी आल्या. त्यापैकी 90% तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.

  • 03 Jun 2024 01:12 PM (IST)

    Marathi news: १३५ स्पेशल ट्रेन निवडणुकीसाठी- निवडणूक आयुक्त

    देशातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत होती. १३५ स्पेशल ट्रेन सातत्याने निवणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करत होते.

  • 03 Jun 2024 01:10 PM (IST)

    Marathi news: मंत्र्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली

    निवडणुकी दरम्यान केंद्रीय मंत्री असो की राज्याचे मंत्री सर्वांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली, असे निवडणूक आयुक्त राजेशकुमार यांनी सांगितले

  • 03 Jun 2024 01:05 PM (IST)

    Marathi news: अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या- निवडणूक आयुक्त

    राजकीय नेत्यांचे जितके नातेवाईक उच्च पदावर होते, त्यांना निवडणूक काम दिले गेले नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितली.

  • 03 Jun 2024 01:03 PM (IST)

    Marathi news: निवडणुकीत कुठेही पैसे वाटप नाही

    लोकसभा निवडणुकीत कुठेही पैसे वाटप किंवा वस्तू वाटप झाले नाही. यासंदर्भात किरकोळ अपवाद वगळता कुठेही तक्रार नाही.

  • 03 Jun 2024 12:44 PM (IST)

    यंदा देशात विक्रमी मतदान- निवडणूक आयुक्त

    यंदा देशात विक्रमी मतदान झाल्याचे मोठे भाष्य निवडणूक आयुक्तांनी केले आहे

  • 03 Jun 2024 12:40 PM (IST)

    निवडणूक आयुक्तांचे मोठे भाष्य

    आपण मतदानाचा विश्वविक्रम मोडला आहे, असे नुकताच निवडणूक आयुक्तांनी म्हटले आहे.

  • 03 Jun 2024 12:31 PM (IST)

    जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन

    बोरिवलीत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जितेंद्र आव्हाडविरोधात आंदोलन. बोरिवली पोलिसांनी आरपीआय कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

     

  • 03 Jun 2024 12:21 PM (IST)

    दिल्लीतल्या पाणीटंचाई बाबत बैठक होणार

    5 जूनला बैठक घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. केंद्र सरकार, दिल्ली हरियाणा हिमाचल सरकारने बैठक घेण्याचे आदेश

     

  • 03 Jun 2024 12:06 PM (IST)

    लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीसमोर पंकजा मुंडे नतमस्तक

    पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन. गोपीनाथ मुंडे यांचं आज दहावं पुण्यस्मरण. गोपीनाथ गडावर संपूर्ण कुटुंबीय दाखल

  • 03 Jun 2024 11:50 AM (IST)

    उद्या गुलाल आमचाच असणार- रविंद्र धंगेकर

    “उद्या गुलाल आमचाच असणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त लीड माझा असणार. एक्झिट पोलमध्ये फक्त अंदाज व्यक्त करण्यात आलय. काल देवदर्शन करून आलो आहे. बॅनर्स लावले म्हणजे खासदार झाले असं नाही. अन्यथा बॅनर्स बनवणारे पेंटर खासदार झाले असते,” अशी प्रतिक्रिया आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली.

  • 03 Jun 2024 11:48 AM (IST)

    कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर

    कोकण पदवीधरसाठी भाजपकडून निरंजन डावखरेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई पदवीधरसाठी भाजपकडून किरण शेलार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवनाथ दराडेंना उमेदवारी जाहीर झाली आहे.

  • 03 Jun 2024 11:40 AM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी

    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली आहे. मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडी तालुक्याच्या काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. पावसामुळे हवेत गारवा पसरला आहे. सकाळी दहा वाजल्यापासून पाऊस सुरू असून हवामान विभागाकडून कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • 03 Jun 2024 11:30 AM (IST)

    जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक

    जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजपची महत्त्वाची बैठक आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. उद्या जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

  • 03 Jun 2024 11:20 AM (IST)

    एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया

    नवी दिल्ली- एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की हा निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल, असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत.

  • 03 Jun 2024 11:09 AM (IST)

    निकालाची धाकधूक असली तरी विजयाची खात्री- राजाभाऊ वाजे

    “निकालाची धाकधूक असली तरी विजयाची खात्री आहे. लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. माझ्या पेहरावावर, भाषेवर आणि ग्रामीण भागातून असल्याबद्दल खूप टीका झाली होती. मात्र लोकांनी भरभरून मतदान केलं. अनेक निवडणुका बघितल्या, अनेक जय-पराजय बघितले. पण यावेळेस मात्र विजयाची खात्री आहे,” अशी प्रतिक्रिया मविआ उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दिली.

  • 03 Jun 2024 10:56 AM (IST)

    Live Update | जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक

    जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी महत्वाची बैठक… केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी दाखल… उद्या होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची चर्चा… बैठकीत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर देखील उपस्थित

  • 03 Jun 2024 10:48 AM (IST)

    Live Update | ‘सी 17 फॉर्म’ आणि मशिनची टॅली केल्यावरच मतमोजणीला सुरुवात व्हावी – विजय वडेट्टीवार

    ‘सी 17 फॉर्म’ आणि मशिनची टॅली केल्यावरच मतमोजणीला सुरुवात व्हावी… EVM हॅक होण्याच्या संशयावरून वडेट्टीवारांची मागणी… मतमोजणीवेळी दक्ष राहण्यासाठी काउंटिंग एजंटना सूचना… असं देखील विजय वडेट्टीवार म्हणाले…

  • 03 Jun 2024 10:37 AM (IST)

    Live Update | पक्ष फोडले, काहींनी गद्दारी केली… – संजोग वाघेरे

    निकालाची काळजी नाही, लोकांनी जे प्रेम दिले यावरून आमचा विजय निश्चित आहे… मावळ लोकसभेत अनेक प्रश्न आहेत. या मतदार संघातील प्रकल्प बाहेर गेला… पक्ष फोडले, काहींनी गद्दारी केली यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे… महागाई, शेतकरी, असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत… असं वक्तव्य संजोग वाघेरे यांनी केलं आहे.

  • 03 Jun 2024 10:20 AM (IST)

    Live Update | आमच्या भूमिका काय आहेत हे आम्ही ठरवू – संजय राऊत

    आमच्या भूमिका काय आहेत हे आम्ही ठरवू, तुम्ही सांगू नका. रवी राणा यांनी केलेल्या दाव्यावरून संजय राऊतांचा पलटवार… मोदींवर फक्त कॅमेऱ्यांचं लक्ष, लोकांचं नाही… असं देखील राऊत म्हणाले.

  • 03 Jun 2024 10:08 AM (IST)

    Live Update | मुंबई पदवीधर जागेसाठी आज अनिल परब अर्ज भरतील – संजय राऊत

    मुंबई पदवीधर जागेसाठी आज अनिल परब अर्ज भरतील… नाशिक शिक्षक मतदारसंघाची जागा ठाकरे गट लढणार… शिक्षक आणि पदवीधरच्या निवडणुका मविआ एकत्र लढवणार… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 03 Jun 2024 09:32 AM (IST)

    Loksabha Election 2024 : बारामती, पुणे, शिरुर, मावळची मतमोजणी कुठे होणार?

    बारामती आणि पुणे लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी कोरेगावपार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये. जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज. शिरुर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये. तर मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती १२४ व शिरुरची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती.

  • 03 Jun 2024 09:30 AM (IST)

    Loksabha Election 2024 : निकालापूर्वी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

    लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक. देशातल्या 541 लोकसभा मतदारसंघांचा निकाल उद्या जाहीर होणार. निकालापूर्वी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. राजधानी दिल्लीत आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला. मतमोजणीसाठी देशभरातील मतमोजणी केंद्र सज्ज. निकालानंतर 18 वी लोकसभा येणार अस्तित्वात. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात.

  • 03 Jun 2024 09:20 AM (IST)

    Maharashtra News : कांदिवली रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी

    कांदिवली रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 वर प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरून ट्रेन बोरिवलीकडे जाते आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरून ट्रेन चर्चगेटकडे जाते. दोन्ही मार्गावर सध्या प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. गाड्या 25 ते 30 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. कोणी ट्रॅक ओलांडत आहे तर कोणी फलाटावर बसलं आहे.

  • 03 Jun 2024 09:18 AM (IST)

    Maharashtra News : बोरिवलीत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड

    बोरिवली स्थानकात तांत्रिक बिघाड. पश्चिम रेल्वेची वाहतूक पाऊण तास उशिराने. बोरिवलीत ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड. फलाट क्रमांक 1 व 2 वरील सेवा ठप्प.

  • 03 Jun 2024 08:55 AM (IST)

    भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज दिल्लीत होणार बैठक

    भाजपच्या सर्व राष्ट्रीय प्रवक्त्यांची आज राजधानी दिल्लीत बैठक होणार आहे. भाजप मुख्यालयात ही बैठक होणार असून विनोद तावडे हे सर्व प्रवक्त्यांशी चर्चा करतील. लोकसभा निवडणूकांदरम्यान वाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व प्रवक्त्यांना या बैठकीत मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.

  • 03 Jun 2024 08:50 AM (IST)

    3 महिन्यांमध्ये देशभरात उष्माघाताने 56 जणांचा मृत्यू

    गेल्या 3 महिन्यांमध्ये देशभरात उष्माघाताने 56 जणांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे महाराष्ट्रात 11 जणांचा बळी गेला. मे महिन्यात देशभरात 46 लोकांनी प्राण गमावले. मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक 14 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

  • 03 Jun 2024 08:41 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगर येथे बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, १ ठार

    छत्रपती संभाजी नगरात बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. जालना मार्गावर कुंभेफळ चौकात बसने मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात १ ठार तर १६ जण जखमी झाल्याचा माहिती समोर आली आहे. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

     

     

  • 03 Jun 2024 08:29 AM (IST)

    पुणे – दंड भरल्यानंतरही तरुणाला पाय दाबायला लावणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार

    पुण्यातील कल्याणीनगर भागात नाका बंदी दरम्यान एका तरुणाला पोलीस अधिकाऱ्याने पाय दाबायला लावले होते.  दंड भरल्यानंतरही तरुणाला पाय दाबायला लावणाऱ्या त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी होणार. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाहतूक विभागाकडून पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

     

  • 03 Jun 2024 08:19 AM (IST)

    तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवली स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने प्लॅटफॉर्म क्र 1 आणि 2 वरील सेवा ठप्प झाली. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटे उशीराने सुरू आहे.