Maharashtra Political News Headlines 14 August 2024 : राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा

| Updated on: Aug 14, 2024 | 9:52 PM

TV9 Marathi, Maharashtra Political News Live 14 August 2024 : आज 14 ऑगस्ट 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News Headlines 14 August 2024 : राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा
Follow us on

“यंदाच्या निवडणुकीत जर तुम्ही आम्हाला भरभरुन आशीर्वाद दिलात तर या 1500 रुपयांचे 3000 रुपये होतील. पण जर हे आशीर्वाद दिले नाही तर मी पण तुमचा भाऊ आहे, हे 1500 रुपये परत घेईन”, असे वादग्रस्त वक्तव्य बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केले. यावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरु करा आणि कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकात थांबा द्या, या मागणीसाठी दिव्यात रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन सुरु आहे. तसेच यंदाचा गणेशोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 14 Aug 2024 09:49 PM (IST)

    लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता अनेक महिलांच्या बँक खात्यात जमा

    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये जमा झाल्याचा लाभार्थ्यांना मोबाईलवर मॅसेज आला आहे. पैसे जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाऊबीजपूर्वी अनेक महिलांच्या खात्यात ३ हजार जमा झाले आहेत. वर्धा जिल्ह्यात योजनेत २ लाख २ हजार ३०४ महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी १ लाख ९७ हजार ९८९ अर्ज मंजूर झाले आहेत.

  • 14 Aug 2024 06:59 PM (IST)

    राहुल नवीन यांची ईडीचे डायरेक्टर म्हणून नियुक्ती

    राहुल नवीन यांची ईडीचे डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.


  • 14 Aug 2024 05:52 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाने बन्सुरी स्वराज यांच्याकडून उत्तर मागितले

    आम आदमी पक्षाचे नेते आणि नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने भाजप खासदार बन्सुरी स्वराज यांच्याकडून 30 दिवसांत उत्तर मागितले आहे.

  • 14 Aug 2024 05:37 PM (IST)

    नोएडा निठारी हत्याकांड: सीबीआयच्या अपीलवर सुप्रीम कोर्टाने सुरेंद्र कोली यांना नोटीस बजावली

    नोएडाच्या निठारी हत्याकांडप्रकरणी सीबीआयच्या आणखी एका अपीलवर सुप्रीम कोर्टाने सुरेंद्र कोली यांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका इतर जुन्या याचिकांशी जोडली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने कोली यांची अन्य एका प्रकरणात निर्दोष मुक्तता केली होती. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात ही सुनावणी झाली.

  • 14 Aug 2024 05:25 PM (IST)

    केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही, 23 ऑगस्टला पुढील सुनावणी

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. सीबीआय प्रकरणात त्यांना जामीन मिळालेला नाही. पुढील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीस पाठवली आहे.

  • 14 Aug 2024 05:10 PM (IST)

    संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप, थायलंडचे पंतप्रधान पदावरून बडतर्फ

    थायलंडच्या न्यायालयाने बुधवारी पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांची पदावरून हकालपट्टी केली. त्यांच्यावर संविधानाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी तुरुंगात गेलेल्या एका व्यक्तीचा समावेश केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. गेल्या 16 वर्षांतील चौथे थायलंडचे पंतप्रधान आहेत ज्यांना न्यायालयाने पदावरून हटवले आहे.

  • 14 Aug 2024 04:53 PM (IST)

    गणपती काळात रात्री रेल्वे-बस सेवा सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक

    मोठी बातमी समोर आली आहे. सर्व गणपती मंडळांना अग्निशमन सेवा मोफत मिळणार आहे. याआधी या सेवेसाठी लाखो रुपये मंडळांना मोजावे लागायचे. तर गणपती काळात रात्री रेल्वे सेवा आणि बस सेवा सुरू ठेवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असल्याची ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गणपती मंडळांच्या कार्यलयाला आतापर्यंत कमर्शियल टॅक्स लागत होता आता तो रेसिडेन्सएल टॅक्स लागणार आहे.

  • 14 Aug 2024 04:07 PM (IST)

    शासनाची ‘एक राज्य एक गणेवश’योजना फसली

    धुळ्यातील 78 हजार विद्यार्थी अर्धा ऑगस्ट महिना संपत आला तरीही गणवेशाच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शासनाची एक राज्य एक गणेवश’योजना फसली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत गणवेश दिला जातो. त्यानुसार धुळ्यात 89 हजार 720 लाभार्थी विद्यार्थी आहेत. मात्र त्यापैकी फक्त 11 हजार विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळाला आहे. विद्यार्थ्यांना यंदा महिला बाल विकास विभागाच्यावतीने बचत गटाकडून गणवेश होऊन दिले जाणार होते. मात्र अद्यापही गणवेश न मिळाल्याने पालक वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

  • 14 Aug 2024 02:57 PM (IST)

    ‘तो’ पवार यांचा कौटुंबिक विषय आहे मी बोलणार नाही – प्रफुल पटेल

    अजित पवार यांनी बहिणीच्या विरोधात माझ्या पत्नीला निवडणूकीला उभं केलं ही मोठी चूक केली असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी ‘तो’ पवार यांचा कौटुंबिक मामला असल्याचे सांगत बोलणे टाळले आहे.

  • 14 Aug 2024 02:43 PM (IST)

    कोकणातील सर्व 74 जागा महायुती म्हणून आम्ही लढणार – उदय सामंत

    कोकणात 74 च्या 74 जागा आम्ही महायुती म्हणून लढणार असून त्याचा स्ट्राईक रेट 85 टक्के असेल असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

  • 14 Aug 2024 02:33 PM (IST)

    गुजरातला घाबरून महाराष्ट्राचे सरकार चालवण्याचं काम आमचं त्रिकूट करतंय – जयंत पाटील

    गुजरातला घाबरून महाराष्ट्राचे सरकार चालवण्याचं काम आमचं त्रिकूट करतंय, महाराष्ट्राला पुन्हा नंबर वनवर आणण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

  • 14 Aug 2024 02:18 PM (IST)

    ज्वेलर्सला लुटायला आलेल्या चोरट्यांना नागरिकांनी चोपले

    ठाण्यातील बाळकुम येथे एका ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चौकडीला नागरिकांनी चोप दिल्याचा प्रकार घडला आहे.

  • 14 Aug 2024 01:54 PM (IST)

    लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारच्या सांगण्यावरून शरद पवारांवर आरोप केले

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांचा आरोप. मनोज जरांगे यांचं आंदोलन हे उत्स्फूर्त आहे. शरद पवार याला हवा देत आहेत असा आरोप आज लक्ष्मण हाके यांनी केला. त्यांनी त्यांची लढाई लढावी मात्र असे छूपे डाव करू नये.

  • 14 Aug 2024 01:42 PM (IST)

    पुण्याच्या लोहियानगर भागात तरूण होते वास्तव्यास

    पोलिसांनी ताब्यात घेतलेले तरुण पुण्यातील लोहियानगर मध्ये होते वास्तव्यास. तरुण वास्तव्यास असलेल्या घराची पुणे पोलिसांनी केली तपासणी. पोलिसांनी क्रॉस व्हेरिफिकेशन साठी हे तरुण राहत असलेल्या घराची केली पाहणी.

  • 14 Aug 2024 01:39 PM (IST)

    लाल किल्ल्यावर उद्या स्वातंत्र्य दिनाचा सोहळा

    पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण उद्या करणार आहेत. सुरक्षेची संपूर्ण काळजी देखील घेण्यात आलीये.

  • 14 Aug 2024 01:08 PM (IST)

    उदय सामंत यांचे मोठे विधान

    लोकसभा निवडणुकीत फेक नेरेटिव्ह तयार केले गेले. महायुती सरकार आणायचे असेल तर आपल्या सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. इथून बाहेर पडलो तर विजय निश्चित म्हणून लोकांपर्यंत पोहचलो पाहिजे, उदय सामंत यांनी म्हटले.

  • 14 Aug 2024 12:54 PM (IST)

    धाराशिव – खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संजय निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना गटबाजीवरून झापले

    धाराशिव – खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोरच संजय निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना गटबाजीवरून झापलं.  शिव स्वराज्य यात्रेत कार्यकर्त्याकडून होणाऱ्या घोषणाबाजीवरून संजय निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना भाषणातून झापले.

    आपण असे बिभत्सपणाचे दर्शन का दाखवता ? आपल्याला एकदिलाने लढायचं आहे, त्याऐवजी इथे गटबाजी कशाला दाखवता ?  जे काही आपल्याला सांगायचे आहे ते नेतृत्वाकडे जाऊन सांगा इथे कशाला प्रदर्शन करताय, अशा शब्दांत गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना झापलं.

     

     

  • 14 Aug 2024 12:48 PM (IST)

    मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवार यांच्या भेटीसाठी मंत्रालयात

    मनसे नेते बाळा नांदगावकर अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर नांदगावकर हे अजित पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले.

  • 14 Aug 2024 12:37 PM (IST)

    शरद पवारांनी शांतपणे जरांगेंना पडद्यामागून पाठिंबा दिला – लक्ष्मण हाकेंचे आरोप

    शरद पवारांनी शांतपणे जरांगेंना पडद्यामागून पाठिंबा दिला असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला आहे. शरद पवार ओबीसी आरक्षणाकडे संवेदनशील भावनेनं पाहत नाहीत, असंही ते म्हणाले.

  • 14 Aug 2024 12:20 PM (IST)

    चंद्रपूर : गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या मुख्य गेट समोर कामगारांचे कुटुंबीयांसोबत ठिय्या आंदोलन

    चंद्रपूर : गडचांदूर येथील अल्ट्राटेक सिमेंट कारखान्याच्या मुख्य गेट समोर कामगारांचे कुटुंबीयांसोबत ठिय्या आंदोलन सुरू आहे. सुधारित मजुरी दर मिळावेत तसेच अन्य सुविधा मिळाव्यात यासाठी अल्ट्राटेक सिमेंट कारखान्यात लोडींग विभागाच्या कामगारांचे गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे.

    आंदोलन सुरू असतांना कंपनीने या लोडींग विभागाच्या 265 कामगारांना कामावर न घेता बाहेरून कामगार आणून  सिमेंटचे लोडिंग सुरू केले.  त्यामुळे संतप्त कामगारांनी कुटुंबियांसह ठिय्या आंदोलन केलं असून  कंपनी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  • 14 Aug 2024 12:09 PM (IST)

    पुणे – कमला नेहरू रुग्णालयातील संशयिताना फरासखाना पोलिस ठाण्यात आणलं

    पुणे – कमला नेहरू रुग्णालयातील संशयिताना फरासखाना पोलिस ठाण्यात आणलं. ताब्यात घेतलेले संशयित तरूण हे बिहारचे असल्याची माहिती समोर आली आहे. कमला नेहरू रुग्णालयात अतिरेकी शिरल्याची बातमी समोर आली होती, त्यानंतर रुग्णांना रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आलं होतं. अखेर त्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

  • 14 Aug 2024 12:01 PM (IST)

    आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासा मुंबईतील केंद्रावर महिलांची गर्दी

    मुंबईतील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी झाली आहे.  कांदिवली पश्चिम लालजी पाडा येथील आधार कार्ड केंद्रावर मोठ्या संख्येने महिला पोहोचल्या आहेत. या सर्व महिला त्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी किंवा लाडकी बहिण योजनेसाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करण्यासाठी आल्या आहेत.

    लाडकी बहिण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनापूर्वी येणार आहे आणि प्रत्येक महिलेला पहिला हप्ता मिळावा अशी इच्छा आहे, त्यामुळे महिला आधार कार्ड केंद्रावर पोहोचत आहेत.

  • 14 Aug 2024 11:50 AM (IST)

    29 ऑगस्टला अंतिम निर्णय घेणार- जरांगे पाटील

    “सरकार मराठ्यांना फसवत आहे. 12 महिने आम्ही लढतोय, पण सरकार वेळकाढूपणा करतंय. आरक्षण देणार नसाल तर हे सरकार आता पाडावंच लागेल. मविआ आणि महायुती एकमेकांवर ढकलत आहेत. सरकारबद्दल मराठी समाजात रोष आहे. 29 ऑगस्टला अंतिम निर्णय घेणार”, अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली आहे.

  • 14 Aug 2024 11:40 AM (IST)

    सरकारचा खुर्चीत जीव, आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही- जरांगे पाटील

    “सरकारचा खुर्चीत जीव आहे. आता यांना खुर्चीतच ठेवणार नाही. सरकार आचारसंहितेची वाट पाहतेय. सरकारच सत्तेत राहणार नाही. सरकारला 29 तारखेपर्यंतचा वेळ देतोय,” असं जरांगे पाटील म्हणाले.

  • 14 Aug 2024 11:30 AM (IST)

    देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत- जरांगे पाटील

    “निवडणुकीसाठी कागदपत्र काढून ठेवा. आरक्षण द्यायचं नाही म्हणून सरकार बहाणे करत आहे. देवेंद्र फडणवीस एकटे पडले आहेत,” असं मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

  • 14 Aug 2024 11:20 AM (IST)

    अयोध्या- रामनगरीत चोरांचा सुळसुळाट; 3800 दिवे, 36 प्रोजेक्टर दिवे चोरीला

    अयोध्या- रामनगरीत चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. रामपथावरच्या झाडांवर लावलेले बांबूचे तब्बल 3800 दिवे आणि भक्ती मार्गावरचे 36 प्रोजेक्टर दिवे चोरीला गेले आहेत. चोरीला गेलेले साहित्य 50 लाखांचे असून याप्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरणाने हे दिवे बसवले होते.

  • 14 Aug 2024 11:10 AM (IST)

    लाडकी बहीण योजनेसंदर्भात रवी राणा यांच्या वक्तव्यावरून महिला काँग्रेस आक्रमक

    अमरावती- लाडकी बहीण योजनेसंदर्भात अमरावती बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर अमरावतीमध्ये महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या राजकमल चौकामध्ये आमदार रवी राणा यांच्याविरोधात जोरदार घोषणा देत महिला काँग्रेसकडून काळ्या फिती बांधून निषेध आंदोलन करण्यात येत आहे.

  • 14 Aug 2024 10:58 AM (IST)

    Maharashtra News : निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील – संजय राऊत

    “लाडक्या बहिणींना पैसै मिळालेच पाहिजेत. आमचं सरकार आल्यावर या योजनेचे पैसे वाढवू. याआधी फुटलेले लाडके आमदार, लाडके खासदार यांच्यापलीकडे यांना काही दिसत नव्हते. आमदारांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी दिले आता नगरसेवकांना 5 कोटी देत आहेत. यांना निवडणुका वेळेत घ्याव्याच लागतील” असं संजय राऊत म्हणाले.

  • 14 Aug 2024 10:57 AM (IST)

    India-Maldives deal : भारत-मालदीवमध्ये महत्त्वाचा करार

    मालदीव सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनसाठी हा निर्णय म्हणजे झटका आहे. मालदीवने त्यांच्या 28 बेटांची व्यवस्था भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • 14 Aug 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News : अजित पवार काकांच्या सल्ल्याने चालत होते, तो पर्यंत बर चाललेलं – संजय राऊत

    “अजित पवारांना ही उपरती कशी झाली माहित नाही. पण त्यांनी एक एजन्सी नेमली आहे. सल्ला देण्यासाठी आतापर्यंत ते त्यांच्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालत होते. तो पर्यंत त्यांचं बर चाललेलं. आता त्यांनी एजन्सी नेमली आहे. एजन्सी नेमण्याची पद्धत भाजपाने आणली. एजन्सी नेमली म्हणजे राजकारण कळत नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 14 Aug 2024 10:28 AM (IST)

    Maharashtra News : मुख्यमंत्री लोचट मजनु – संजय राऊत

    “महाराष्ट्रात सावत्र कुणी नाही. सावत्र कुणी असेल तर दिल्लीत मोदी आणि शाह. ते महाराष्ट्राला सावत्र वागणूक देतायत. मुख्यमंत्री लोचट मजनु. दिल्लीच्या दारातला लोचट मुख्यमंत्री. इतका लोचट मुख्यमंत्री पाहिला नाही. ते दिल्लीचे पोपट म्हणून बोलतायत. सत्ता जाईल त्यादिवशी दिल्ली पायाशी उभं करणार नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 14 Aug 2024 09:52 AM (IST)

    Maharashtra News: नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

    नाशिक शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य… पाऊस थांबल्यानंतरही पलिकेने काम सुरु न केल्याचा आरोप… रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना त्रास

  • 14 Aug 2024 09:42 AM (IST)

    Maharashtra News: केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक

    केंद्रीय निवडणूक आयोगाची आज गृह मंत्रालयासोबत बैठक… आगामी महाराष्ट्र,हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड या राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक… बैठकीत सुरक्षा बाबत होणार चर्चा… झारखंड मधील नक्षलग्रस्त भाग आणि जम्मू-काश्मीरमधील सुरक्षेबाबतही होणार महत्त्वपूर्ण चर्चा…

  • 14 Aug 2024 09:30 AM (IST)

    Maharashtra News: राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिव स्वराज्य यात्रा आज धाराशिव जिल्ह्यात

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कालच्या विधानानंतर आज सुप्रिया सुळे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष… सुप्रिया सुळे आज घेणार तुळजाभवानीचे दर्शन त्यानंतर सभेला संबोधित करणार… शिवस्वराज्य यात्रेच्या सभा आज तुळजापूर तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे पार पडणार… सुप्रिया सुळे थांबलेल्या हॉटेलला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय

  • 14 Aug 2024 09:13 AM (IST)

    Maharashtra News: रवी राणा यांच्या विरोधात महिला काँग्रेस आक्रमक..

    अमरावतीत आमदार रवी राणा यांच्या विरोधात महिला काँग्रेस आक्रमक… आज अमरावतीत राजकमल चौकात महिला काँग्रेसच्या वतीने राणांच निषेध आंदोलन… राणा यांनी केलं होतं लाडकी बहीण योजना संदर्भात वक्तव्य…

  • 14 Aug 2024 09:03 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यातील झिका विषाणूचा धोका झाला कमी, नवीन रुग्णांची सख्या घटली

    पुणे शहरात झिका विषाणूचा धोका झाला कमी

    गेल्या काही दिवसापासून झिकाच्या नवीन रुग्णांची संख्या घटली

    शहरात 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट दरम्यान एकही नव्या रुग्णांची नोंद नाही

    सध्या पुणे शहरात झिका विषाणूचे एकूण 75 रुग्ण

    पण नव्या रुग्णांची नोंद नसल्याने दिलासा

  • 14 Aug 2024 08:54 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार, केंद्रीय पुरातत्व विभागाची नवी योजना

    पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा दत्तक देण्यात येणार

    केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना

    पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक वारसा स्थळ आता दत्तक घेता येणार

    पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाची “ऍडॉप्ट अ हेरिटेज” योजना

    वारसा स्थळांची नियमित देखभाल, संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी वारसा स्थळे संस्थेला दत्तक देण्याची केंद्राची योजना

    पुणे जिल्ह्यातील ही पाच वारसा स्थळ दत्तक घेता येणार

    1 शनिवारवाडा
    2 आगाखान पॅलेस
    3 पाताळेश्वर लेणी
    4 लोहगड
    5 कार्ला लेणी आणि भाजे लेणी

  • 14 Aug 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra News Live : पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अखेर लेझरवर बंदी, पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय

    पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अखेर लेझरवर बंदी

    पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय

    विसर्जन मिरवणुकीत लेझर बिम लाईट लावल्यास मंडळांवर करण्यात येणार कारवाई

    पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

    पुणे पोलीस आयुक्तांनी घेतली गणेश मंडळांसोबत आयुक्तालयात बैठक

    बैठकीत खालील मुद्द्यांवर झाली चर्चा
    १. ढोल ताशा पथकांच्या वादनाची वेळ निश्चित करण्यात येणार

    २. ढोल ताशा पथकातील वादकांची संख्या निश्चित करण्यात येणार

    ३. लक्ष्मी रस्त्यासह केळकर आणि कुमठेकर रस्त्यावर वर्षानुवर्ष मिरवणूक काढणाऱ्या मंडळांनाच परवानगी

  • 14 Aug 2024 08:51 AM (IST)

    Maharashtra News Live : नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे

    – नाशिक मनपा आयुक्त पदाचा पदभार आता जिल्हाधिकाऱ्यांकडे
    – जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रभारी पदभार सुपूर्द
    – नाशिक मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे वैद्यकीय रजेवर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार
    – डॉ. करंजकर रजेवर असल्यामुळे अनेक कामकाज खोळंबल्याने पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
    – मनपा आयुक्त वैद्यकीय रजेवरून परत येईपर्यंत कार्यभार स्वीकारण्यासाठी शासनाचे पत्र

  • 14 Aug 2024 08:50 AM (IST)

    Maharashtra News Live : पुणे जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेसाठी 9 लाखांहून अधिक अर्ज

    पुणे जिल्ह्याचा लाडकी बहीण योजनेसाठी 9 लाख 73 हजार अर्ज

    पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातून लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद

    यापैकी 9 लाख 34 अर्जांना मंजुरी देण्यात आली असून तर 39 हजार अर्जांची छाननी सुरू

    ज्या अर्जांमध्ये त्रुटी आहेत, त्यांची पूर्तता क़रण्याच्या सूचना अर्जदारांना दिल्या आहेत. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर या अर्जांना मंजुरी दिली जाणार आहे

    पुणे जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाची माहिती

    17 ऑगस्ट रोजी मिळणार महिलांना पहिला हप्ता