देशात नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची जोरदार चर्चा सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास आता सीबीआयकडे सोपवला आहे. टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम ठेवत बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. बांगलादेश विरूद्धच्या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलचा दावा आणखी मजबूत केला. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन मधील दोन लाचखोर पोलीसांन निलंबित करण्यात आलं. सिलेंडरमध्ये अवैधरित्यागॅस भरताना पकडल्यानंतर कारवाई न करता लाच घेऊन आरोपीला सोडून दिले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पावसाळ्यात देशाच्या विविध भागांत येणाऱ्या पुराचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. दरवर्षी मान्सूनमुळे विविध नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने बिहार, आसाम आणि इतर पूर्वेकडील राज्यांतील अनेक भाग पाण्याखाली जातात. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ड्रग्ज प्रकरणी आत्तापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतलं आहे. पुण्यातील एफसी रोडवर असलेल्या लिक्वीड लीजर लाउंजवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. या ५ जणांमध्ये हॉटेलचा मालक सुद्धा ताब्यात आहे. या व्यतिरिक्त याठिकाणी असलेले एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. या हॉटेलचे ३ पार्टनर सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. संतोष कामठे, रवी माहेश्र्वरी, मानस मलिक, योगेंद्र आणि शर्मा असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
पुण्यात एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होतेय का, असा प्रश्न एका व्हायरल व्हीडिओमुळे उपस्थित केला जात आहे. शनिवारी रात्री सुरु असलेल्या पार्टीत अल्पवयीन मुलांना दारु दिल्याचंही म्हटलं जात आहे. तर यावरुन आता राजकारण रंगताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणाला मंत्री शंभुराज देसाई यांचं अभय असल्याचं आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले. तर धंगेकरांच्या आरोपाला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलंय. प्रत्येक घटनेनंतर मंत्र्यावर आरोप चुकीचे, आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असं पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (SP) पक्षाचे राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील हे प्रामाणिक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते होते. प्रशांत पाटील यांनी पक्ष तळागाळात पोहोचवण्याचं काम केलं. पक्षासाठी रात्रंदिवस झटणारा कार्यकता पक्षातून गेला त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसलाय. सच्चा कार्यकर्त्याच्या निधनाने पक्षाची हानी झालीय, असं सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.
आपण 2022 पासून त्या कार्यालयात बसत आहे, आपण बळवंत वानखडेंसोबत बसलो तर काय अडचण आहे, मी रुम शेयर करायला तयार आहे, बळवंत स्वतःच्या डोक्याने काम करतील असे भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने काल रात्री NEET परीक्षेतील गैरव्यवहाराचे प्रकरण सीबीआयला तपास करण्यासाठी दिले होते, त्यानंतर सीबीआयने FIR दाखल केला आहे.
जळगावात जिल्हा रुग्णालयात मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले आहे. जळगावात पाण्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
जळगावात पाण्याच्या टँकरच्या धडकेत मृत्यू झालेल्या महिलेला नुकसान भरपाई मिळावी, म्हणून नागरिकांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ट्रँकर चालकावर कठोरात कठोर कारवाई आणि नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा घेतला. जिल्हा रुग्णालयात महिलेच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे. जळगावातील कुसुंबा येथे टँकरच्या धडकेत जखमी महिलेचा आज मृत्यू झाला आहे. याच घटनेत महिलेच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे.
इगतपुरी शहर आणि परिसरात पावसाची जोरदार पावसाची हजेरी… विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. रस्ते जलमय झालेत. गेल्या तीन दिवसांपासून आभाळ दाटून येत होते. मात्र पाऊस पडत नव्हता. सुरू झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली
अक्कलकोट तालुक्यातील सलगरमधील कारहुनवीच्या उत्सवाला हजारोची गर्दी झालीय. वारीतील रिंगण सोहळ्याप्रमाणे बैलाचा रिंगण सोहळा रंगला. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे हनुमान देवाची मोठी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश मधील हजारो भाविक येतात.वटपोर्णिमेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ही यात्रा भरते. या यात्रेचे वैशिष्ठ्य म्हणजे, यात्रेदिवशी भल्या पहाटे उठून बळीराजा आपल्या बैलाची यथासांग पूजा करतो. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात याला कारहुवनीचा सण म्हणतात.
डोंबिवलीतील खोणी पलावा फेज 2 परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिल्डींग मध्ये प्रवेश करण्यावरून सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला. सुरक्षा रक्षकांसह त्यांच्या चार ते पाच साथीदाराणी अभिषेक जोशी नावाच्या तरुणाला बेदम मारहाण केली. जोशी कुटुंब दहशतीच्या वातावरणात आहे. पत्नीने व्हिडियो व्हायरल करून मदतीची मागणी केली आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलिसांचा तपास सुरू आहे.
सुरक्षा व्यवस्थेसाठीची साधने पडली धूळ खात. मंदिराच्या व्हीआयपी प्रवेशद्वारात बसविण्यात आलेले DFM बंद अवस्थेत
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी. मागण्या मान्य न झाल्यास धनगर समाजाकडून तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा
सकाळच्या भोंग्याला पुरून उरणारा भाजपचा वाघ दमदार आमदार हिंदू धर्मासाठी लढणारे आमदार नितेश राणे अशा आशयाचे बॅनर. भाजप नेते नितेश राणे यांच्या समर्थकाने लावण्यात आले बॅनर
वसईत जेसीबी चालकाचा मृत्यू झाला होता. मुख्यमंत्र्यांनी 35 लाख रूपयांचा चेक दिला आहे आणि त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देखील देण्यात आली आहे.
नीट प्रकरणात अधिकारी बदलून काही होणार नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनामा घेतला पाहिजे. एक देश, एक निवडणूक म्हणतात, पण एक परीक्षा घेऊ शकत नाहीत, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टोला लगावला आहे.
मनोज जरांगेंनी आरक्षणाची पॉलिसी समजून घ्यावी. त्यांनी आमच्यात बुद्धीभेद करू नये. मराठा समाज मागासलेपण सिद्ध करू शकला नाही. कोर्टात मागासलेपण सिद्ध झालं नाही, त्यावर कुणी बोलत नाही, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
“काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकी देणारे पत्र काढण्यात आलं होतं. ते पत्र पब्लिश करणाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे. दुसऱ्या व्यक्तीशी असलेल्या वैमनस्य दूर करण्यासाठी तशा प्रकारचं, दलित समाजाला धमकी देणार ते पत्र होतं. हे पत्र काढणारा अनुसूचित जातीचाच आहे. त्यामागे काय कारण आहे, हे शोधून काढलं जातंय,” अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.
नीटच्या परीक्षेमध्ये सातत्याने घोळ होत आहेत. मी एसआयटीची मागणी केली आहे. संसदेत पहिला शेतकरी प्रश्न, नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय यावरच सविस्तर चर्चा आम्हाला हवी आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
VJNT आणि ओबीसींचं आरक्षण एकच आहे. मनोज जरांगेंना मंडल आयोगाबाबत काहीच माहीत नाही. मराठा आणि कुणबी एक नाहीत. मनोज जरांगे काहीही बोलतात, असं ओबीसी आरक्षणासाठी लढणारे आंदोलक लक्ष्मण हाके म्हणाले.
ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर काल सायंकाळपासून उपचार सुरू केले आहेत. दोघांचीही प्रकृती सुरुवातील नाजूक होती. आता प्रकृती स्थिर आहे. नऊ दिवस केलेल्या उपोषणामुळे लक्ष्मण हाके यांच्या किडनीवर सूज आली आहे. आम्ही सूज कमी करण्यासाठी उपचार सुरू केला आहे.
पुण्यात शरद पवारांचे बॅनर लागले आहे. ससंवादातून सुशासन, आपल्याला सरकार बदलायचे आहे. शरद पवारांच्या फोटो आणि सहीसह असे बॅनर पुण्यात लागले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा घेरले आहे. ते म्हणाले, सरकारच्या पहिल्या दहा दिवसांतच यूजीसी नेट परीक्षा रद्द झाली, नीट परीक्षा पेपर फुटल्याने रद्द झाली आणि आता नीटची पदव्युत्तर परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आली. ‘देशाचे भविष्य हे देशाच्या वर्गखोल्यांमध्ये आकार घेत आहे’ असे कायम बोलले जाते, मात्र याच देशाच्या भविष्यासोबत केंद्र सरकार अक्षरशः खेळत आहे अशी गंभीर आरोप त्यांनी केला.
मालाडमध्ये आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटांच्या तुकड्याप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले. मालाड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा एका कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीचा आहे.
अमरावती जिल्ह्याधिकारी कार्यालयातील खासदार कक्ष सिल… काँग्रेसने ताब्यात घेतलेला कक्ष प्रशासनाकडून सिल… खासदार कक्षाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचे पुत्र अभिजीत ढोबळे हे मोहोळ मतदार संघातील 141 गावातून मोहोळ वंदन परिक्रमा यात्रा काढणार… अभिजीत पाटील हे मोहोळ वंदन परिक्रमा यात्रेतून मोहोळ मतदार संघातील नागरिकांच्या समस्या घेणार जाणून…. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध गावातून दहा दिवस निघणार परिक्रमा यात्रा
मराठा आणि कुणबी एकच, पुरावे द्यायला आम्ही तयार… मराठी – कुणबी एक नसेल तर सरकारने तसे पुरावे द्यावेत… कुणबी शेकी करतो, तसा मराठाही शेती करतो… 1994 दिलेलं आरक्षण रद्द करा, त्याची चौकशी करा… असं देखील जरांगे पाटील म्हणाले…
मराठा आणि कुणबी एकच, अशी पहिल्यापासून भूमिका… मराठवाड्यातील मराठी समाज कुणबी… असं देखील जरांगे पाटील म्हणाले.
कुणी आंदोलन केलं म्हणून नोंदी थांबवणार का? मराठवाड्यातला मराठा समाज कुणबी, असं कायदा सांगतो… सरकारी नोंदी कोणाला नाकारता येत नाहीत… गावागावांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत… असं जरांगे पाटील म्हणाले आहेत.
पुणे – नाशिक महामार्गावर दुचाकी आणि कारचा अपघात झाला आहे. आमदार दिलीप मोहितेंच्या पुतण्याच्या कारने दोघांना चिरडलं… अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी… आमदाराच्या पुतण्यावर गुन्हा दाखल…
ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शरद पवारांच्या भेटीला आले आहेत. विजयानंतर ते शरद पवारांची भेट घेत आहेत.
दादर परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. ढगाळ वातावरण असल्याने गारवा निर्माण झाला आहे. पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आरोपांची शाहनिशा करण्याचे ठरविले आहे. शिवसेनेच्या उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती समोर येत आहे. या अहवालातून त्यांनी केलेल्या आरोपासंबंधीचा खुलासा समोर येईल.
मावळात कृषी विभागाकडून, कृषी संजीवनी पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. मावळच्या विविध गावामध्ये कृषी विभागाकडून कृषी संजीवनी पंधरवडाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 17 जून ते 1 जुलै 2024 या कालावधी मध्ये कृषी विभागाच्या वतीने विविध विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आयोजन करण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याची लगबग गेले काही दिवस आळंदी मध्ये पाहायला मिळत आहे.या तयारी मधील एक मुख्य भाग म्हणजे पालखी रथा बरोबर जाताना माऊलींच्या आरती चे सामान, चांदीचे दागिने, वस्त्र याचे व्यवस्थापन.ते व्यवस्थापन पूर्ण झाले आहे. पालखी बरोबर मंदिर समितीचे जवळपास 300 लोक असतात. त्यांच्या साठी अगदी सुई पासून तंबू, जेवण आणि संपूर्ण साहित्याची तयारी करण्यात आली आहे.
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार जनसंपर्क कार्यालयाचे कुलूप तोडून प्रवेश करणे काँग्रेसला भोवले.खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेसच्या 15 ते 20 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काल खासदार कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी खासदार बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी खासदार कार्यालयाचे कुलुप तोडले होते.
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे धुळीच्या प्रदूषणावर महापालिकेकडून उपाय योजना केल्या जाणार आहेत. अनेक वर्षांपासून शिवाजी पार्क येथील धुळीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. आयआयटी कडून मातीचे परीक्षण केले जात असून माती स्थिर राहण्यासाठी देखील उपाय योजना केल्या जाणार आहेत.
स्प्रिंकरलर वापरून पार्क येथे फवारणी केल्याने धुळीच प्रमाण कमी होण्याचा अंदाज होता परंतु कायमस्वरूपाची फवारणी शक्य नसल्याने दुसरे उपाय शोधले जात आहेत. परिसरातील नागरिकांना मातीमुळे होणारा त्रास, यासाठी समिती नेमण्यात आली होती ही समिती आपला अहवाल लवकरच आयाआयटीला सुपूर्द करणार आहे.
मुंबईत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, मुख्य मार्गाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पश्चिम रेल्वेच्या गोरेगावला जाणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याचा फटका रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसू शकतो.
खासदार संदिपान भुमरे हे विधानसभा निवडणुकीपर्यंत मंत्रीपदावर राहण्याची शक्यता आहे. रोजगार हमी योजना, फलोत्पादन आणि संभाजीनगर पालकमंत्री पदी कायम राहण्याची शक्यता. विधिमंडळाचा सदस्य नसतानाही सहा महिन्यापर्यंत मंत्रिपदावर राहण्याची आहे तरतूद. खासदार झाले तरी संदिपान भुमरे यांच्याकडे दोन्ही मंत्री पद कायम राहण्याची शक्यता.
विठ्ठल मंदिर समिती आणि मंदिर प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.10 प्रमुख पालख्यांना महापूजेचा मान देण्याचा निर्णय नाही अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तर 10 प्रमुख पालख्यांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान मिळणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं.