:वैजापूरच्या तलवाडा शिवारात आयनर वस्तीवर एका 4 वर्षीय चिमुकलीवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने तेथून पोबारा केल्याने ही चिमुकली बचावली. या हल्ल्यात ती जखमी झाली आहे.
अवैध मार्गाने आलेला मद्यासाठा पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. एका लक्झरी बसमधून मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची दारू पुण्यात आणली गेली होती. निगडीतील खासगी बस टर्मिनलवर या दारूचा साठा जप्त करण्यात आला.
सीआयडीचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शहर पोलीस ठाण्यात पथक दाखल झाले आहे. आज काही जणांची चौकशी सीआयडी करणार आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले परभणीत पोहचले आहे. आंबेडकरी चळवळीतील नेते स्वर्गीय विजय वाकोडे यांच्या घरी ते आले आहेत. वाकोडे कुटुंबियांची सांत्वन करण्यासाठी ते आले आहेत.
:छत्रपती संभाजीनगर मध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे कारण एका दिवसासाठी तब्बल 65 हजार लोकांनी दारू पिण्याचे लायसन्स काढले आहे.
भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या आधी अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची भेट घेतली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासोबत बैठक घेतली. मुंबई पोलीस आयुक्त आणि विशेष आयुक्तांचीही या बैठकीला उपस्थिती होती.
प्रयागराज, उत्तर प्रदेशमधील निरंजनी आखाड्याने १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या महाकुंभ मेळ्याच्या आधी संगम येथे धार्मिक ध्वज लावला.
#WATCH | Prayagraj, UP: Niranjani Akhara installs a religious flag at Sangam ahead of the Maha Kumbh Mela, scheduled to be held from 13th January to 26th February 2025. pic.twitter.com/JVFtVtIRiW
— ANI (@ANI) December 30, 2024
राहुल गांधी आणि त्यांच्या बहिणीला केरळमध्ये अतिरेकी मतदान करतात, असं विधान नितेश राणे यांनी केलं होतं. यावर अतुल लोंढे यांनी पलटवार केला आहे. देशातील एका राज्याला पाकिस्तान म्हणणं हे दुर्दैवी विधान आहे. नितेश राणेंना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
विधानसभेत घोषणा करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले, ‘आम्ही मनमोहन सिंग यांचा पुतळा हैदराबादमध्ये बसवण्याचा निर्णय घेतला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे मोठे नुकसान आहे.
लोणावळा, पुणे- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे पर्यटकांना बंदी घालण्यात आली. दरवर्षी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यात मोठी गर्दी होते. पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळ्यातील लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी 31 डिसेंबर 2024 आणि एक जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिलेत.
नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठी घोषणा केली. दिल्लीत आम आदमी पार्टीचं पुन्हा सरकार आल्यास पुजारी आणि पुरोहितांनाही दरमहा 18 हजार रुपये मानधन दिले जाणार. अरविंद केजरीवाल स्वत: मंगळवारपासून कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरातून नोंदणी मोहीम सुरू करणार आहेत. भाजपनेही महिला सन्मान योजनेची नोंदणी मोहीम थांबवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पुजारी सन्मान योजनेची नोंदणी मोहीम थांबवून दाखवावी, असं केजरीवाल यांनी भाजपला आवाहन केलं.
“३१ डिसेंबर रोजी ३००० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात असतील. तर ७०० वाहतूक पोलीस तैनात असतील. सीसीटीव्ही कॅमेराचं लाइव्ह मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठी कर्मचारी तैनात असणार आहेत. एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होते. त्याठिकाणी नजर ठेवण्यात येणार आहे. ४० ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्या संदर्भात अर्ज दाखल होते,” अशी माहिती पुणे पोलीस आयुक्तांनी दिली.
पुणे- ३१ डिसेंबरच्या नियोजनाविषयी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली. “गर्दीच्या ठिकाणी योग्य बंदोबस्त आहे. २३ ड्रंक एंड ड्राइव मोहीम राबवण्यात येणार आहेत. अधिकृत ठिकाणांना परवानगी देण्यात आली आहे. पहाटे ५ पर्यंत दारू दुकानांना परवानगी आहे. ड्रग्ज आणि अल्पवयीनांना दारू न देण्याच्या सूचना देण्यात आल्यात आहेत. या सगळ्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार,” असं ते म्हणाले.
बुलढाणा- सिंदखेड राजा इथल्या सकल मराठा समाजाच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी संतोष देशमुख यांचं कुटुंब पोहोचलं. “लवकरच आरोपीला अटक झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. लोकांना आवाहन करतो की मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी व्हा. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,” असं कुटुंबीय म्हणाले.
सिंदखेडा राजा येथील सकल मराठा समाजाच्या मोर्चात संतोष देशमुख यांचं कुटुंब सहभागी. “लवकर आरोपींना अटक झाली पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. लोकांना सांगतेय की, मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी व्हा. आरोपींना अटक झाली पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाडक्या बहिणीला न्याय द्यावा, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी” अशी मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने केली.
“महादेव ॲप बिटकॉन घोटाळा. खूप मोठी ही गंभीर बाब आहे. त्या प्रकरणात मी स्वतः लक्ष घालत आहे. त्यात दोन प्रकारचे गोंधळ दिसत आहेत. एकात सर्व सामान्य माणूस फसतोय. अन् दुसऱ्या बाजूला राजकारणी, माफिया, गुंड, भ्रष्टाचारी, ड्रग माफिया ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी मनी लॉड्रीग करीत आहेत. त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून आहे” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.
जळगावच्या पारोळा तालुक्यातील करमाडच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. सैन्यात सेवा बजावत असताना 40 वर्षीय नवनीत हिंमत पाटील या जवानाचा भोपाळ येथे मृत्यू झाला होता. सैनिकाला अखेरचा निरोप देत असताना अनेकांचे मन गहिवरून आले. भव्य तिरंगा रॅली अन् घरापासून ते स्मशानभूमीचा परिसर फूल व रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता.
समृद्धी महामार्गावरील धक्कादायक घटना. एकाच वेळी 50 ते 60 वाहन पंक्चर. वाशिम जिल्ह्यातील वनोजा गावाजवळ रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली घटना. नागपूरकडे जाणाऱ्या लेनवर एक पत्रा पडल्यानं त्याच्यावरून जाणारं प्रत्येक वाहन झालं पंक्चर. पंक्चर वाहनांना मिळाली नाही कोणतीही मदत. समृद्धी महामार्गावरून रात्रीचा प्रवास करणे ठरतंय धोकादायक.
काळमवाडी धरणाच्या गळतीची पाहणी करण्यासाठी खासदार शाहू छत्रपती धरण स्थळी दाखल झाले आहेत. काळमवाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून गंभीर बनला आहे. धरण गळती दुरुस्तीचे काम पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. धरण गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी खासदार शाहू छत्रपती यांच्याकडून आज पाहणी करण्यात येणार आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्हा प्रकरणात वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या हवाल्यानुसार, 24 तासाच्या आत वाल्मिक कराड हे पोलिसांना शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाल्मीक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर वाल्मीक कराड हे महाराष्ट्रभर चर्चेत आले होते. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातही तक्रारदार फिर्यादी कडून वाल्मीक कराड यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड अटक होणार का याची चर्चा सुरू आहे.
रत्नागिरी- सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले आहेत. सध्या संपूर्ण कोकण पर्यटकांनी हाऊस फुल्ल झाल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व हाॅटेल लाॅजचे बुकिंग फुल्ल झाले आहे. नवीन वर्षाच्या स्वागताचे बेत आखण्यात आले आहेत. विविध हाॅटेल रिसाॅर्टवर पार्ट्यांचे नियोजन करण्यात आले आहेत. समुद्रकिनाऱ्यांना पर्यटकांची विशेष पसंती मिळत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचे प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. डिजे आणि पार्टीमधून थिरकण्याचा पर्यटकांचा मुड पाहायला मिळत आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती संकटात आली आहे. हवामान बदलामुळे हाता तोंडाला आलेली द्राक्ष बाग वाया जात आहे. द्राक्षांचे घड कुजणे, रोगाचा प्रादुर्भाव या संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी फवारण्या करून बागा वाचवत आहेत.
ब्रेक : नव्या वर्षात मंत्रालयाची सुरक्षा हायटेक होणार आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत जाण्यासाठी फ्लॅप बॅरियर अनिवार्य करण्यात येणार आहेत. मुख्य इमारतीत १२ फ्लॅप बॅरियरचं इंस्टाॅलेशन काम वेगाने सुरू आहे. तर एनेक्स इमारतीत १२ बॅरियर लावण्यात येणार आहेत. या फ्लॅप बॅरियरवर चेहरा स्कॅन झाल्यानंतरच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. एयरपोर्ट इथे जशी सुरक्षा व्यवस्था असते, त्या धर्तीवर मंत्रालयातील सुरक्षा अपग्रेड करण्यात आली आहे. येत्या १ जानेवारीपासून सगळे फ्लॅप बॅरियर कार्यान्वित होणार आहेत. सुरक्षेच्या कारणास्थव मंत्रालयात फ्लॅप बॅरियर लावण्यात आले आहेत.
बीड : आमदार सुरेश धस आज एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. बीडमध्ये त्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे. या पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड आज पोलिसांना शरण येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 तासाच्या आत वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाल्मिक कराड यांच्यावर पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा दाखल केल्यानंतर वाल्मिक कराड हे महाराष्ट्रभर चर्चेत आले होते. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मीक कराड खंडणी प्रकरण हे सध्या सीआयडी कडून तपास केला जात आहे यासाठी सीआयडीच्या नऊ पथकांमार्फत तब्बल दीडशे अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास आणि शोध सुरू आहे. तसेच दुसऱ्या बाजूला बीड पोलिसांकडूनही या प्रकरणांचा तपास सुरू आहे या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 100 जणांचा जबाब घेतल्याचे बोललं जात आहे.