अमरावतीतून मोठी बातमी समोर आली आहे. नांदगाव पेठमधील एमआयडीसीतील गोल्डन फायबर कंपनीतील 100 हून अधिक महिलांना विषबाधा झाली आहे. पिण्याच्या पाण्यातून या महिलांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या महिलांवर जिल्हा सामन्यात रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत भाजपच्या दोन गटात सभागृहातच तुफान राडा झाला. ही घटना आठवडाभरापूर्वीची असून आज त्या राड्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार चैनसुख संचेती यांच्या गटाचे संजय काजळे हे बिनविरोध निवडून आल्यानंतर मलकापूरचे भाजपा नेते शिवा तायडे यांच्या गटाने त्यांच्यावर हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून दोन्ही गट सभागृहातच भिडले. यावेळी पोलिसांसमक्षच हा राडा झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. याचा व्हीडिओ आज व्हायरल झालाय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. शिर्डीत भाजपच्या राजस्तरीय अधिवशेनाचं आयोजन करण्यात आलं आहे. या अधिवेशनानिमित्ताने भाजपचे प्रमुख नेते शिर्डीत उपस्थित आहेत. त्यानिमित्ताने अनेक नेत्यांनी साईबाबांचं दर्शन घेतले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साई दरबारी आले आहेत. भाजपच्या महाअधिवेशनात पदाधिका-यांना मार्गदर्शन केल्यानंतर साई दर्शनासाठी ते शिर्डीत आले आहे.
रामदास कदम छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते, त्यांनी काय घोळ केले आणि किती घोळ केले, हे सर्व मला माहीत आहे. किती जातीयवाद केला हे ही मला माहित आहे. जातीयवादाचा उगम महाराष्ट्रात रामदास कदम यांच्यापासून झाला आहे, अशी टीका माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली.
खासदार सुप्रिया सुळे परभणीत दाखल झाल्या आहेत. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांच्यांसोबत स्थानिक नेते उपस्थित आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिशिंगणापूर येथे दाखल झाले आहे. अमित शाह पहिल्यांदाच शनिशिंगणापुरात शनी देवाचे दर्शन घेणार आहे. अमित शाह शनिशिंगणापुरात शनी देवाला तैलाभिषेक करून करणार महापूजा करणार आहे.
श्री तुळजाभवानी मातेची आज शाकंबरी नवरात्र महोत्सवातील सहाव्या माळे दिवशी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा करण्यात आली.
नाशिक रोड रेल्वे स्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून पोलिसाने वेटरला रिव्हॉल्वर दाखविल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
शिर्डीत गृहमंत्री अमित शाह यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या श्रीरामपूर येथील आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर बोलेरो गाडीचा अपघात झाला. वाडीवऱ्हे फाट्याजवळ मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो पलटी झाली. या अपघातात एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केलंय.
बीड: शस्त्र परवाना रद्द प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची 100 जणांना नोटीस पाठविली आहे. शस्त्र तात्काळ जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबित झाल्यानंतर ही शस्त्रे सापडल्यास फौजदारी गुन्हे दाखल करणार. वाल्मिक कराड याचाही शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. वाल्मीक कराड सीआयडी कोठडीत असल्याने नोटीस पोहोचली नाही. कोठडीबाहेर आल्यानंतर वाल्मिकला नोटीस दिली जाणार.
फळांचा राजा असलेल्या आंब्याचा सिझन पुढील एक-दीड महिन्यात सुरू होणार. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी आज पुण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड बाजारात दाखल झाली आहे. कोकणातून आलेल्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असून याची विधिवत पूजा करण्यात आली असून यंदा चांगला भाव मिळेल; अशी अपेक्षा येथील फळ व्यापा-याने व्यक्त केली.
शिवसेनेचे माजीमंत्री विजय शिवतारे मस्साजोग येथे दाखल झाले आहेत. शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री विजय शिवतारे देशमुख कुटुंबीयांची भेट घेत आहेत. तपासाच्या अनुषंगाने विजय शिवतारे हे देशमुख कुटुंबीयांशी चर्चा करणार आहेत. देशमुख कुटुंबीयांशी चर्चा झाल्यानंतर चर्चेचा संपूर्ण तपशील विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईच्या वायू गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी जुन्या डिझेल वाहनांना टप्प्याटप्प्याने हटवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मांडला आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरजही न्यायालयाने अधोरेखित केली आहे. न्यायालयाने मुंबईतील वायू प्रदूषणाच्या अन्य स्रोतांवरही लक्ष केंद्रित केले आहे, जसे की बांधकाम स्थळे, अवजड उद्योग, आणि बेकरींमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘भट्टी’ (लाकूड आणि कोळशावर चालणाऱ्या ओव्हन) या मुद्द्यांवरही चर्चा केली आहे. या क्षेत्रांवर प्रभावी नियमन आणि कठोर देखरेख आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
तुमच्या टाळूची सगळी केसं गेली तरी तुम्हाला अजून अक्कलदाढ आली नाही का? रामदास कदम उद्धव साहेबांवर अरेरावीची भाषा करताय, तुम्हाला दात आलेत का? असे रामदास कदमांच्या टीकेला ठाकरे गटाच्या शरद कोळींचे प्रत्युत्तर दिले.
कोल्हापूरच्या विशाळगडावरील दर्ग्यात आज उरूसाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. उरूसाला परवानगी नसली तरी भाविकांना विशाळगडावरील दर्ग्यात जाऊन दर्शन घेता येणार आहे.
वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनाला भव्य सुरुवात झाली. वर्धापन दिनानिमित्त १२ ते १९ जानेवारी दरम्यान भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज क्रीडा पत्रकारांसोबत आय.पी.एस. अधिकारी याच्या क्रिकेट सामन्यापासून सुरुवात झाली आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांच्यासह मुंबईचे दिग्गज क्रिकेटपटू कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
भाजपचे आज शिर्डीत महाअधिवेशन होत आहे. केंद्रीय आणि राज्यातील नेतृत्व करणारे नेते उपस्थित आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. त्यामुळे जनतेचे आभार मानणार आहोत. सभासद नोंदणी देखील सुरू आहे, त्यात वाढ करायची आहे. नवीन चैतन्यातून आगामी निवडणुकींच्या दृष्टीने तयारी सुरू अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
संतोष देशमुख खूनप्रकरणात सरकार या लोकांना पाठीशी घालत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. सरकार कारवाई करताना दिसत नाही, असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले आहे.
महाविकास आघाडी, इंडिया आघाडी फुटली असे आम्ही म्हटलो नाही, असे संजय राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आम्ही युतीत असताना सुद्धा स्वतंत्र लढवल्याचे ते म्हणाले.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 33 दिवस पूर्ण होतात. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन देखील केले होते. मात्र पोलीस अधीक्षक नवनीत कांवल यांनी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले आहे. आता बैठकीत काय दिशा ठरेल हे पाहणे गरजेचे आहे.
परळीमध्ये औष्णिक केंद्राची राख वाहतूक करणाऱ्या टिप्परने सरपंचाला उडवले आहे. या अपघातात सौंदाण्याचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात, त्यांच्या दुचाकीचा चेंदामेंदा झाला. या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
पुणे : शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा असल्यामुळे दिवसभर दमट हवामान होते. अशा विचित्र हवामानामुळे विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. बदलत्या हवामानामुळे गेल्या २४ तासांत किमान तापमानात पुन्हा एक ते दोन अंशाने वाढ झाली आहे. शनिवारी (दि. ११) पहाटे हवेली परिसरात सर्वांत कमी १२.५, तर शिवाजीनगर परिसरात १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या 427 जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आज सिंदखेड राजा येथे राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात शासकीय पूजा पार पडली. केंद्रीय मंत्री प्रतापराव सपत्नीक या ठिकाणी उपस्थित होते. कामगार मंत्री आकाश फुंडकर, बुलढाण्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील त्याचबरोबर सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे हे यावेळी उपस्थित होते. दरम्यान आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने राज्यभरातून राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकही दाखल झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर आज सिंदखेड राजा येथे मोठा उत्साह पाहायला मिळणार आहे.
पुणे – राज्यात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास (एसईबीसी), इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत प्रमाणपत्र सादर न केल्याने प्रवेश रद्द झाल्यास त्यास उमेदवारच राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.
पुणे – जानेवारीच्या अखेरपर्यंत ससून सर्वोपचार रुग्णालयात रोबोटच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात होणार आहे. रोबोटिक शस्त्रक्रिया प्रणाली असलेले हे राज्यातील दुसरे रुग्णालय ठरेल. सध्या रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर या प्रणालीसाठी प्रशिक्षण घेत आहेत आणि एकदा ते कार्यान्वित झाल्यानंतर हर्निया, पित्ताशयाचे दगड, अपेंडिक्स आणि इतर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांशी संबंधित शस्त्रक्रिया करू शकतील.
वरिष्ठ डॉक्टरांना प्रथम रोबोटिक सिस्टीमचे प्रशिक्षण दिले जाईल. हे चार हातांचे मशिन आहे. रोबोटचे हे हात ३६० अंशांत फिरतात. त्यामुळे शस्त्रक्रियेत अधिक सुलभता येते, अशी माहिती बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटलचे डीन डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येला आज ३३ दिवस पूर्ण झाले आहेत. या घटनेतील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अद्याप कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढला जात आहे. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता मस्साजोग येथे ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यात पुन्हा एकदा आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. तर दुसरीकडे आज 10 वाजता शिवसेनेच्या वतीने माजी मंत्री विजय शिवतारे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवतारे आज मस्साजोगाच्या दौऱ्यावर असणार आहेत. तपासाच्या अनुषंगाने विजय शिवतारे संतोष देशमुख कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत.