विष्णू चाटे याला दोन दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची १४ दिवस कोठडी मागितली होती.
स्वबळावर लढवण्याचा निर्णय म्हणजे हा उशीरा सुचलेला शहाणपणा असून हे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशा शब्दात भाजपाचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे गटाच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर टोला लगावला आहे.
बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी ७ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे
धाराशिव येथील जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी केली जात आहे. देशमुख कुटुंबियातील संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख, बहीण प्रियंका चौधरी व भाची अबोली सोळंके मोर्चा सहभागी झाले आहेत. राजमाता जिजाऊ चौक, लेडीज क्लब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शिवाजी महाराज चौक बस स्थानक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचा समारोप केला जाणारआहे. धाराशिव शहरातून जवळपास दोन किलोमीटर मोर्चाचा मार्ग असणारआहे.
बोरिवली (प.) येथे अपघातांची मालिका सुरूच आहे. नवीन वर्षात अतिशय दुःखद घटनांना सामोरे जावे लागत आहे. सलग दुसऱ्यांदा डॉन बॉस्को, एल.टी. रोड येथे बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे एका दुचाकीस्वार आणि चारचाकीस्वारांचा अपघात झाला. बसची धडक लागल्यावर दुचाकीस्वार एका बाजूला पडल्यामुळे मोठी हानी टळली, सुदैवाने दुचाकीस्वाराला इजा झाली नाही.
राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी आज देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्याच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली. जयकुमार रावल हे दोन दिवसापासून पुणे दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट घेतली. जयकुमार रावल आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई यांचे कौटुंबिक संबंध असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
मुलांसाठी मोर्चात सहभागी व्हावे लागते. भाऊ तर गेला त्याला लास्टला पाणी सुद्धा दिलं नाही. त्याने मला मरता मरता वाचवला आहे फक्त या चिमुकल्यासाठी मी बाहेर पडते. मुख्यमंत्री साहेब कळकळीची विनंती आहे लवकरात लवकर आरोपींना पकडा आणि त्यांना फाशी द्या, अशी मागणी संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांनी केली. मी त्याच्यासाठी काहीच करू शकले नाही तोच माझा आधार होता तोच माझा देव होता, तोच माझा आनंद होता, आमचा आनंद गेला, आता जगण्याची पण इच्छा नाही फक्त चिमुकल्यांसाठी तळमळ वाटते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
संजय राऊत आज सकाळी काहीतरी ठरवतील, तर उद्या दुसरंच काहीतरी ठरवतील. ही महाविकास आघाडी स्वार्थापोटी झाली आहे. हे त्यांच्या आता लक्षात आलं आहे. तिथं काय होणार नाही. महानगरपालिकाच्या निवडणुकामध्ये मुंबईपासून नागपूरपर्यंत जसा विधानसभेचा निकाल लागलाय, तसाच महापालिकांचा निकाल लागेल. महाविकास आघाडीत सुरुवातीपासूनच अविश्वास होता. महाविकासआघाडीच्या लोकांमध्ये मरगळ आहे ते निवडणुका ताकतीने लढवू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
मराठ्याच्या शौर्याला वंदन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच पानिपत शौर्यभूमीला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पानीपतच्या वीर भूमीत दाखल होणार आहेत. १४ जानेवारीला पानिपत मध्ये झालेल्या अब्दाली आणि मराठ्यांच्या युद्धाला २६४ वर्ष पूर्ण होत आहेत.
परवानगीशिवाय आरेच्या जंगलातील झाड तोडू नकाः सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश दिले आहेत. २०१९ ला मेट्रो कार शेड साठी वृक्ष तोड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्वतः दखल घेत या प्रकरणात आदेश पारित केले होते. त्यानंतर या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात नव्यानं सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
माझ्या वडिलावर जो अन्याय झाला त्यांना न्याय मिळालाच पाहिजे, आधीच्या घटना घडल्या त्यांना सुद्धा या अन्यायातून मुक्त होऊन न्याय मिळाला पाहिजे, असे वक्तव्य वैभवी देशमुख यांनी केले आहे.
नवी मुबंई महानगरपालिकेकडून मकर संक्रांती सणात पतंग उडवतांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. मकर संक्रांतीच्या सणानिमित्त मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात, त्यामुळे याला ‘पतंगांचा सण’ असेही म्हटले जाते. मकर संक्रांत सणाच्या अगदी आधी,नायलॉन किंवा कोणत्याही सिंथेटिक पदार्थापासून बनविलेल्या आणि / किंवा सिंथेटिक पदार्थाने लेपीत असलेल्या अविघटनशील (नॉन-बायोडिग्रेडेबल) मांजा किंवा धागे वापरण्यास देशात बंदी आहे, याची आठवण मनपाने करून दिली आहे.
हुपरी गावामध्ये 144 कलम पोलिसांनी लागू केले आहे. गावातील बेकायदेशीर मशिद व मदरासा पाडण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आम्ही तपास यंत्रणेवर विश्वास ठेवला आहे. राज्यभर मोर्चे निघत आहे सर्वांचं एकच म्हणणं आहे देशमुख कुटुंबाला नव्हे तर सर्व गावाला समाजाला न्याय मिळाला पाहिजे. जे संघटित गुन्हेगारीचे जाळ आहे हे मुळासकट नष्ट झालं पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे, असे मत धनंजय देशमुख यांनी मांडले.
संजय राऊत यांनी राज्यात एकला चलो रेचा नारा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ‘मी मोदींना देव मानतो’, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“सगळ्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची तयारी आहे. महाविकास आघाडीने एकत्र बसून निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटत” असं माणिकराव ठाकरे म्हणाले. मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व पालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची खासदार संजय राऊत यांनी घोषणा केली. त्यावर माणिकराव ठाकरे बोलत होते.
“राज्यातील राजकारण गढूळ असू नये ही भूमिका आहे. आम्ही आणि भाजप आता मित्र राहिलो नाही. भाजपकडून आज व्यक्तीगत आणि सूडाच राजकारण करण्यात आलं. फडणवीसांकडून अपेक्षा होती. पण त्यांना काही लोकांनी घेरलं” असं संजय राऊत म्हणाले.
“महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही कायम संस्कृती पाळली. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. आम्ही भाजपाचे सर्वात जुने आणि विश्वासार्ह मित्र होतो” असं संजय राऊत म्हणाले.
टोरस ब्रँड प्रकरणात पोलिसांचा अजूनही छापेमारी सुरू आहे. गेले तीन दिवस छापेमारी सुरू असून मुंबईतील सर्व दुकानांचा मुद्देमाल पोलीस आता ताब्यात घेत आहेत.
परवा केलेल्या छापेमारी मध्ये पोलिसांना या दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने तसेच ५ कोटी रुपये देखील मिळाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबईत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून या बांधकामाविरोधातील कारवाईला आता वेग येण्याची चिन्हे आहेत. अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या २०० टक्के दंड आकारणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी निर्देश दिले आहेत.
गोकुळ दूध संघाकडून म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हशीचा दूधाचा खरेदी तर आता 52 रुपये 80 पैशावरून 54 रुपये 80 पैशांवर जाणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निर्णयाचा जिल्ह्यासह, बाहेरील म्हैस दूध उत्पादकांना होणार फायदा.
मुंबईमध्ये गोकुळच्या म्हशीच्या दुधाची मागणी वाढली आहे. मागणीप्रमाणे दूध संकलन व्हावं यासाठी गोकुळ कडून म्हैस दूध उत्पादकांना प्रोत्साहन पर दरवाढ
12 जानेवारीला शिर्डीत भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडणार आहे. भाजपचे सर्व मंत्री, आमदार , खासदार या अधिवेशनाला उपस्थित राहतील. तसेच राज्यभरातील जवळपास 15 हजार पदाधिकारीही हजेरी लावणार आहेत, अमित शाहा, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे मार्गदर्शन करणार आहेत.
धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिवकर आज रस्त्यावर उतरणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आज धडकणार आहे.
धाराशिवमध्ये आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी प्रकरणात न्यायाची मागणी करण्यासाठी धाराशिवकर आज रस्त्यावर उतरणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा आज धडकणार असून संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील,खासदार बजरंग सोनावणे , आमदार सुरेष धसतसंच संदीप क्षीरसागर, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार, ज्योति मेटे आणि दीपक केदारसह जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी या मोर्चात उपस्थित राहणार आहेत. बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. यामुळे वाल्मिक कराड अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. ६ डिसेंबर रोजी मस्साजोगला जातना सुदर्शन घुलेने वाल्मिक कराडला फोन केला होता, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान पंढरपूर मधील श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या चरणी 6 लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं होतं. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाने जयदीपला आपटेला जामीन मंजूर केला आहे. यासह राज्यातील, तसेच देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, तसेच क्रीडा , मनोरंजन, क्राईमच्या बातम्या वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.