महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यात बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येमुळे एकच खळबळ उडाली. यानंतर काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे परभणीतील घटनेवेळी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने मृत्यूमुखी पडलेले आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबापैकी एकाला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार आहे. तर दुसरीकडे देशभरात ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही (HMVP) मुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांनी घाबरु नये, असे आवाहन केले आहे.
भारती विद्यापीठ हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाच्या नातेवाईकांकडून तोडफोड केली आहे. ८५ वर्षीय रुग्णाच्या मृत्युला हॉस्पिटल प्रशासनाला जबाबदार धरत नातेवाईकांनी तोडफोड केली. नातेवाईकांनी डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकालाही शिवीगाळ केली. नातेवाईकांविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने खून प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. खून प्रकरणी पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कवठेमहांकाळच्या अग्रण धुळगाव येथे 2017 मध्ये घडलेल्या खून प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तमाशा दरम्यान दंगा केल्याची तक्रार केल्यामुळे अशोक भोसले या तरुणाची हत्या करण्यात आली होती.
महाकुंभ 2025 साठी वैष्णव आखाड्याचे पेशवाई आज प्रयागराजला पोहोचले. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी दरम्यान हा महाकुंभ चालणार आहे.
संभलच्या जिल्हा न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाने 25 फेब्रुवारीपर्यंत सुनावणीला स्थगिती दिली आहे. संभलच्या रॉयल जामा मशिदीच्या व्यवस्था समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. हायकोर्टाने सर्व पक्षकारांना चार आठवड्यांच्या आत उत्तर देण्यास सांगितले आहे.
भाजपच्या पंडित सेलचे अनेक नेते ‘आप’मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. ते आपच्या सनातन सेवा समितीत सामील होणार आहेत. 18,000 रुपये मानधन देऊन पुरोहितांनी आपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. सनातन सेवा समितीच्या मंचावर जगद्गुरू आणि धर्मगुरूही उपस्थित राहणार आहेत.
कोरोनात हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात HMPV व्हायरसचा रुग्ण सापडल्यामुळे मालेगाव सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर गेले असून कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज झाले आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदाराने साहित्याचे ‘डम्पिंग’ केले आहे. या मैदानावर आरएमसी प्लांट, लोखंडी पाईप,पत्र्याचे शेड्स आदी उभारल्याने मुलांना खेळण्यास मैदान मिळेनासे झाले आहे याचा निषेध करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी अभिनव पद्धतीने ठाणे महानगर पालिकेच्या नगर अभियंत्यांच्या दालना बाहेर फुटबॉल खेळून याचा निषेध केला आहे.
नागरिकांना कोणत्याही प्रकारचे जातीचे प्रमाणपत्र, इतर दाखले, रेशन कार्ड मिळत नसल्याने मालेगावा तहसील कार्यालयाबाहेर उंबरदे गावातील लोकांनी शोले स्टाईल आंदोलन केले आहे.
मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री शेखावत यांनी जारी केला आदेश.
महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये, महसूल विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे आज होणार सादरीकरण.
दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे सादरीकरण होणार असून येत्या शंभर दिवसांत प्राधान्याने करण्याची कामं याबाबत सविस्तर सूचना देणार. महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली – एक देश एक निवडणूक बाबत अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त संसदीय समितीची बैठक सुरू झाली आहे.
खासदार बासुरी स्वराज, प्रियंका गांधी, सुप्रिया सुळे, अनिल देसाई बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
अजमेर शरीफ दर्गा वरून परतीच्या प्रवासा दरम्यान पालघर मधील तरुणांच्या अर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार ट्रकला मागून धडकल्याने हा अपघात झाला असून त्यामध्ये कारचा चक्काचूर झाला. या अपघातात तीन तरुणांचा जागीच मृत्यू ,तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अजमेर शरीफ दर्गा वरून पालघरला येत असताना गुजरात राज्यातील भरूच अंकलेश्वर भागात कारचा भीषण अपघात झाल्याचे समजते.
जळगाव इथल्या एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला आज सकाळी सातच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग इतकी प्रचंड आहे की अग्निशमन दलाच्या 15 बंब संपले तरीही आग नियंत्रणात आणता आलेलं नाही. सकाळी ७ वाजताच्या सुमारास शोरूममध्ये दुसऱ्या माळ्यावर असलेल्या साहित्य ठेवलेल्या गोदामला अचानक आग लागली.
बीड- पीएसआय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला असून पोलीस मुख्यालय परिसरातील ही घटना आहे. अनंत इंगळे असं कर्मचाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. 2012 च्या बॅच भरतीचा कर्मचारी असून नुकतीच खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत ते उत्तीर्ण झाले होते.
कोल्हापुरातील विशाळगडावरील संचारबंदी पाच महिन्यांनंतर उठवण्यात आली आहे. विशाळगड आणि पायथ्याचं जनजीवन पुर्ववत व्हायला सुरुवात झाली आहे. आजपासून सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत पर्यटक आणि भाविकांना गडावर जाता येणार आहे. संचारबंदी उठवल्याने विशाळगडावरील स्थानिकांसह गडाच्या पायथ्याला असलेल्या व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.
वसई विरार महापालिका हद्दीतील करदात्यांना पालिकेकडून मोठा दिलासा मिळाला आहे. थकीत मालमत्ता कर भरण्यासाठी वसई विरार महापालिकेची ‘अभय योजना 2024-25’ सुरू झाली आहे. अभय योजने अंतर्गत कालावधीत मालमत्ता कर करदात्यांनी भरला तर 50 टक्के सूट मिळणार आहे. 6 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत अभय योजना सुरू राहणार आहे. या कालावधीत थकीत मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना तसेच मोबाईल मोनोधारक कंपन्यांना याचा लाभ घेता येईल.
धाराशिव- तुळजाभवानी देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील शिळांना तडे गेले आहेत. मुख्य गाभाऱ्यातील चार शिळांना तडे गेल्याची माहिती समोर येत आहे. गाभाऱ्याच्या संवर्धनावेळी धक्कादायक बाब समोर आली. तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्यामुळे धक्कादायक बाब समोर आली.
नवी दिल्ली- अखेर काँग्रेस पक्षाला नवं कार्यालय मिळणार आहे. तब्बल 45 वर्षांनंतर दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदल झाला आहे. अकबर रोडवरून नवं कार्यालय कोटला रोडवर स्थलांतरित होणार आहे. काँग्रेस मुख्यालय 9 A कोटला रोड हा काँग्रेस मुख्यालयाचा नवा पत्ता आहे. नव्या कार्यालयाला इंदिरा गांधी भवन असं नाव दिलं आहे. येत्या 15 जानेवारीला सोनिया गांधी राहुल गांधी यांनी मलिकार्जुन खरगे यांच्या हस्तेमुख्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
“खंडणीच्या बाबतीच धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर बैठक झाली. मी धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाही. मी अडाणी माणूस आहे, थोडं समजून घ्या” असा आरोप सुरेश धस यांनी केला.
“वसुलीच्या गँगलाही मोक्का लावायला हवा. वाल्मिक कराडच्या सर्व गँग मोक्कामध्ये टाकल्या पाहिजेत. डिफेंडर गाडी वाल्मिक कराडने दमबाजी करुन घेतली. लोकांसोबत राहण्याऐवजी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही पैसे बुडवणाऱ्याच्या बाजूने उभे राहिले. वाल्मिक कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे” असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.
केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतली सर्व राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत HPMV व्हायरसच्या वाढत्या केसेसवर झाली चर्चा. राज्य सरकारची याबाबत कशी तयारी आहे याचाही बैठकीत घेण्यात आला आढावा. नागरिकांनी घाबरून न जाण्याच आवाहन राज्यांच्या आरोग्य विभागाने करावं सोबतच या अजाराबाबतची जनजागृती करण्याचे देखील राज्यांना निर्देश.
मोफत रेवडी वाटप करण्यासाठी राज्यांकडे पैसे आहेत पण न्यायाधीशांचे वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासाठी राज्यांकडे पैसे नाहीत असं कोर्टाने म्हटलं आहे. जे लोक काहीच करत नाहीत, त्यांच्यासाठी राज्य सरकारकडे पूर्ण पैसा आहे. पण जेव्हा न्यायाधीशांच्या पगाराचा प्रश्न येतो तेव्हा ते आर्थिक संकटाचे कारण पुढे करतात असं कोर्टाने म्हटलं आहे.
पुणे : पुण्याच्या रिंग रोड साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची लवकरच आढावा बैठक होणार आहे. बैठकीत भूमिपूजन कधी होणार हे निश्चित होणार आहे. पुणे शहराभोवती साकारण्यात येणाऱ्या रिंग रोडसाठी पश्चिम भागात ९६ टक्के जमीन संपादित झाली आहे. लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल. रिंग रोडचे लवकरच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
भाजप आमदार सुरेश धस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. मुंबईतील अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही भेट होत आहे. या भेटीदरम्यान सुरेश धस मराठवाड्यातील बुडालेल्या मल्टीस्टेटबद्दल चर्चा करणार आहेत. तसेच धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख प्रकरणावरुनही ते संवाद साधणार असल्याचे बोललं जात आहे.
जालना : यंदा शासनाने डिजिटल क्रॉप सर्वेक्षण मोबाईल ॲपद्वारे रब्बी हंगामापासून ई पीक पाहणी उपलब्ध करून दिली आहे. यानुसार जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची माहिती या ॲपद्वारे भरून अपलोड करावी, असं आवाहन जिल्हा कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केले. येत्या 15 जानेवारीपर्यंत ही मुदत देण्यात आली असून वेळेच्या आत आपल्या पिकाची माहिती भरण्याचही कृषी अधिकाऱ्यांनी म्हटले. अन्यथा भविष्यात पीक विमा, कृषी विभागाचे योजना,नैसर्गिक आपत्ती अनुदान यासारख्या विविध योजनांपासून वंचित रहावे लागेल.
जालना : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, मुलांचे शिक्षण याबरोबरच मागील वर्षी पाऊस पडेपर्यंत दुष्काळाचे वातावरण होतं. यामुळे जालना जिल्ह्यात मागील दोन वर्षात जवळपास 186 शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. यामध्ये सर्वाधिक 16 आत्महत्या सप्टेंबर 2024 मध्ये झाल्या आहे. आतापर्यंत 123 प्रकरणे निकाली काढण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त व्यक्तींच्या नातेवाईकांना सरकारकडून आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली. मात्र जुलै 2024 नंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या नातेवाईकांना मात्र मदत करण्यात आलेली नाही
कल्याण दुर्गाडी किल्ल्याच्या जागेवर राज्य शासनाचा मालकी हक्क असल्याच्या आदेशाला कल्याण जिल्हा न्यायालयाने स्थगिती दिली. मुस्लिम संघटनेच्या याचिकेनंतर हिंदू संघटनांना आपले म्हणणे मांडण्यासाठी ९ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली. हिंदू संघटनांनी निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करत शासनावर दबाव येऊ शकतो, असे मत व्यक्त केले.
बालगंधर्व रंगमंदिरातील ‘एसी’ बसविण्याचे काम सोमवारपासून (दि.६) सुरू झाले आहे. त्यामुळे रविवारपर्यंतचे कार्यक्रम रद्द केले आहेत. खरंतर गेल्यावर्षीच बालगंधर्व रंगमंदिरात देखभाल दुरुस्तीचे काम झाले होते. रंगमंचावरील एसी यंत्रणा चालत नसल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी कलाकारांकडून झाली. परिणामी नवीन एसी बसवावा लागत आहे. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर बंद करण्यात आले.
पुणे : जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसीलदार कार्यालयांत येत्या काही दिवसांत १०० टक्के ई ऑफिस प्रणाली वापरण्यात येणार आहे. त्यामुळे कोणती फाईल कोणत्या टेबलवर आहे, याचे ‘ट्रॅकिंग’ नागरिकांना समजणार आहे. त्यामुळे नागरिकांना कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार येण्याची आवश्यक्ता भासणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांनी दिली.