बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख सहभागी होणार आहे. यासह या मोर्चात सर्वपक्षीय नेतेही सहभागी होणार आहेत. पुण्यातील लाल महल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. या मोर्चात मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार सतेज पाटील, आमदार रोहित पवार, आमदार रोहित पाटील सहभागी होणार आहेत. यासोबतच आज दिवसभरातील राजकीय, सामाजिक आणि इतर घडामोडींसाठी हा ब्लॉग दिवसभर फॉलो करा.
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा आज करण्यात आलीय. १५ ते १९ जानेवारी २०२५ या दरम्यान हा महोत्सव छत्रपती संभाजीनगरमधील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर प्रोझोन मॉल येथे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न होणार आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि विविध भाषांमधील 60 चित्रपट दाखवले जाणार आहे.
मिरा भाईंदर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबारातील शूटर अद्याप फरारच आहे. मात्र मुख्य सूत्रधाराला गुन्हे शाखेने अटक केली आहे. मिरारोडमध्ये गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास एका अज्ञात इसमाकडून गोळीबार करण्यात आला. यामध्ये शम्स अन्सारी उर्फ सोनू यांची हत्या झाली होती. मुख्य सूत्रधार आरोपी युसूफ आलम आणि सैफ अली खान आलं यांना अटक करण्यात आली.युसूफ आलम याला बदलापूरमधून ताब्यात घेण्यात आले. तर त्याचा भाऊ सैफ याला नालासोपारामधून अटक केली गेली. मयत शम्स अन्सारी उर्फ सोनू याला एक आठवड्यापूर्वी धमकी देण्यात आली होती. दोन्ही अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पनवेलमधून मोठी बातमी समोर आली आहे. रसायनी फार्मा कंपनी कैरेमधील कंपनीला मोठी आग लागली आहे. आगीचे कारण स्पष्ट नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग मोठी असल्याने भीतीचे वातावरण आहे. बाजूला आणखी कंपन्या असल्याने आग पसरल्यास मोठी घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे. सदर कंपनीत उन कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आणि औषधी कंपनीचे रॉ मटेरियल बनवले जातात.
शिर्डीत शिक्षणासंदर्भात काही अडचणी असतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निश्चित मदत करतील. मात्र आलेल्या भाविकांना मोफत प्रसाद वाटप करु नये याउलट भिकारी असे संबोधन करने हे सुजय विखे पाटील यांचे विधान दुर्दैवी आहे. कारण त्या अन्नदान क्षेत्रात सर्वसामान्य सगळेच प्रसाद घेत असतात, असे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी म्हटले आहे.
नाशिक पालकमंत्रीपद स्वीकारण्यास मंत्री नरहरी झिरवाळ यांनी नकार दिला आहे. आपणास आदिवासी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हवे आहे. त्यामुळे गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, ठाणे यासाठी आपण मागणी केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्हा रुग्णालयात महिलेने जीवन संपवले आहे. रुग्णालयात असलेल्या झाडाला गळफास घेत तिने आत्महत्या केली. कविता अहीवळे असे या महिलेचे नाव आहे.
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबेले यांनी जुन्या पेन्शनची मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे आंदोलन करण्यात येणार आहे.
सांगली जिल्ह्याच्या जीएसटी संकलनात सलग तिसऱ्या वर्षी 1 हजार 84 कोटीचा टप्पा पार झाला आहे. यंदा आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यातच 1084 कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. गतवर्षीपेक्षा 16 टक्क्यांनी जास्त महसूल गोळा झाला आहे.
सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणात पुण्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून त्यात भाजपाचे आमदार सुरेश धस देखील दाखल झाले आहेत.
आज आम्ही देखील सदस्य नोंदणी मोहीम राबवली असून आतापर्यत पाच हजार सदस्य नोंदणी झाली आहे. संध्याकाळपर्यंत 1लाख टप्पा सदस्य पार पडेल. याचा आगामी निवडणुकीत भाजपाला फायदा होईल असे आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे.
जळगावातील वीज बिलांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो छापला गेल्याचे उघड झाले असून या प्रकरणात चुकून झाले असेल तर ठीक, मात्र जर हेतुपरस्पर घडत असेल तर संबधीतांवर शासन म्हणून कारवाई करू असे भाजप प्रदेश प्रभारी आमदार रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महिलांसाठी मोफत कर्करोग निदान शिबिराचं आयोजन आयोजन करण्यात आलं आहे. बारामतीच्या उपजिल्हा रुग्णालयात शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी अजित पवार म्हणाले, “महाराष्टात फिरत असताना कॅन्सरचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त दिसून आलं. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. महिला लाजतात, तपासणी करत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी असा शिबिराची गरज आहे.”
ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. हजारो समर्थकांसह हिलाल माळी हे ठाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यात हिलाल माळी यांचा प्रवेश होणार आहे. हिलाल माळी यांचं धुळे शहर सह ग्रामीण मतदारसंघांमध्ये मोठं काम आहे. शिवसेनेच्या अनेक मोठ्या आंदोलनात हिलाल माळी यांचा सहभाग होता. धुळे ग्रामीणमध्ये हिलाल माळी यांच्या शिवसेनेच्या प्रवेशामुळे मोठं बळ मिळालं होतं.
“भाजप हा देशाचा पक्ष आहे. भाजपला जगातला सर्वांत मोठा पक्ष बनवण्याचं अमित शाहांचं टारगेट होतं. भाजपवर कोणत्याही परिवाराचा अधिकार नाही. भाजपचे एकरा कोटी सदस्य नोंदवले गेले आहेत,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मुंडेंचे कार्यकर्ते मला धमक्यांसाठी फोन करतात. फोन करणाऱ्या मुंडेंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील चौकशीसाठी राज्याबाहेरून अधिकारी आणा. एसआयटी, सीआयडी चौकशी म्हणजे धूळफेक आहे. चौकशीसाठी नेमलेली माणसं वाल्मिक कराडला नमस्कार करणारी आहेत,” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय. नरेंद्र सांगळे नावाच्या व्यक्तीकडून धमकी मिळाली आहे. सांगळेकडून माझ्यासंदर्भात ट्विटमध्ये खालच्या शब्दांत उल्लेख करण्यात आला. मला दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 फोन कॉल येत आहेत. 118 आमदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सुनील फड नावाच्या व्यक्तीकडून अश्लील शब्दांत कमेंट करण्यात आले,” असा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय.
पवार कुटुंब एकत्रवर ज्येष्ठ नेते मंडळी निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया मंत्री इंद्रनील नाईक यांनी दिली.
संतोष देशमुख यांचा अमानुष छळ करून मारलं. त्यामुळे जो कोणी आरोपी असतील. त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजेत अशी मागणी वसमत विधानसभेचे अजित पवार गटाचे आमदार राजू नवघरे यांनी केली.
धनंजय मुंडे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अवजड मालवाहू कंटेनर घाटात पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या तीन तासापासून वाहतूक कोंडी झाली आहे.जव्हार फाटा ते लतिफ वाडी पर्यंत वाहतूक कोंडी दिसत आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ही घोषणा विधानसभा निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांनी केली. आम्ही कसे तारक आहोत, संरक्षक ,प्रेमी आहोत म्हणून ढोल पिटले. पण अद्याप अभिजात भाषेचा GR आला नाही. मग हा राजकीय जुमला होता का? असा निशाणा संजय राऊत यांनी मोदी सरकावर साधला.
तीन पक्षांचे मिळून सरकार आहे, त्यामुळे तीनही पक्षाचे नेते एकत्रित मिळून जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील. मला वाटतं पुढील दोन दिवसात पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
दोन ,दोन हजारात विकले गेले भाडखाऊ साले, तुम्ही मला एक मत देऊ शकत नाही, तुम्हाला फक्त दारू, मटण पाहिजे, अशी खालच्या पातळीवरील टीका बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली. गायकवाड मतदारांवर भडकले.
भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याने संतोष देशमुखांची हत्या झाली. आका आजही मंत्रिमंडळात आहेत. बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे, अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग असणार आहे. या मोर्चाच्या सुरक्षेतेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे. संतोष देशमुख हत्यातील मारेकऱ्यांना कठोरातील कठोर कारवाई व्हावी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे. मागील पाच महिन्याखाली सुरू झालेल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून देशभरातून श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी केली आहे.
नाशिक : – तृतीयपंथी व्यक्तींनी ओळखपत्र व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या तृतीयपंथीना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा व्यक्तींनी ओळखपत्र व प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रान्सजेंडर पर्सन या पोर्टलवर आणि शासनाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ऑनलाइन नोंदणी करून प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवण्याचे समाज कल्याण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. तृतीयपंथी व्यक्तींच्या विविध समस्या व निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे.
पुण्यात पुन्हा थंडी वाढली. पुण्यात पारा १० अंशांच्या खाली गेला आहे. राज्यात दोन दिवसांपासून थंडी पुन्हा सुरू झाली असून, नागरिक गारठू लागले आहेत. राज्यातील काही ठिकाणी १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद होत आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तसेच मध्य महाराष्ट्रात थंडी अधिक जाणवत आहे. राज्याच्या किमान तापमानातील चढ- उतार कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला. पुणेकर थंडीने चांगलेच गारठले आहेत.