Maharashtra Breaking News LIVE 13 October 2024: शोकाकूल वातावरणात बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी

| Updated on: Oct 13, 2024 | 10:11 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 13 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 13 October 2024: शोकाकूल वातावरणात बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी
Follow us on

Baba Siddique Shot dead Live Update : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर वांद्रे येथील खेरवाडी जंक्शनच्या परिसरात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्यानंतर पोलीस आणि गृहखात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सध्या बाबा सिद्दीकी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आला आहे. या शवविच्छेदनानंतर बाबा सिद्दीकी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सध्या वांद्रे परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मोठी बॅनरबाजीही करण्यात आली आहे.

 

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 13 Oct 2024 10:11 PM (IST)

    बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी

    बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर बडा कब्रस्तान येथे दफनविधी केला जातोय. बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 13 Oct 2024 08:05 PM (IST)

    बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काही वेळात सुरू होईल

    मुंबई : बाबा सिद्दीकी यांची अंत्ययात्रा काही वेळात सुरू होईल. पण त्यापूर्वी जनाजाची नमाज पार पडेल. त्याकरिता त्यांचे पार्थिव इमारतीच्या बाहेर काढण्यात आलं आहे आणि पाऊस देखील पडत आहेत.


  • 13 Oct 2024 04:53 PM (IST)

    आरोपी गुरुनैल सिंग याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

    मोठी बातमी समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी गुरुनैल सिंग याला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • 13 Oct 2024 04:38 PM (IST)

    अशा घटना चिंता वाढवणाऱ्या, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणावरुन किरण रिजीजू यांची प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यात त्यांचा मृत्यू झाला. सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर राज्यासह देशभरात एकच खळबळ उडाली आहे. अनेक आजी माजी नेत्यांनी सिद्दकी यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजीजू यांनीही प्रतिक्रिया दिली. “जी घटना घडली त्याच सर्वांनी खंडन करायला हवं. अशा घटना चिंता वाढवणाऱ्या”, असं किरण रिजीजू म्हणाले.

  • 13 Oct 2024 04:33 PM (IST)

    मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाची हत्या, परस्पर भांडणातून घटना

    मालाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. मालाड पूर्व येथील मनसे पदाधिकाऱ्याच्या मुलाची परस्पर भांडणातून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश दत्ता माईन असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

  • 13 Oct 2024 04:30 PM (IST)

    सदाभाऊ खोत यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

    माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरीत शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. पवारांनी काँग्रेस पक्षासह अनेक संघटना संपवल्या. मात्र पवारांना महाराष्ट्रातून यांना एकच माणूस संपवता येत नाहीये त्याचं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्यांना संपवता येत नाही म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटले आहेत, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

    सदाभाऊ खोत यांचा पवारांवर हल्लाबोल

    • माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शरद पवार यांच्यावर सडकून टीका
    • साखर कारखानदारी कोणाच्या ताब्यात बारामतीच्या वळू बैलाच्या ताब्यात
    • शरद पवार म्हणजे अलीबाबा, शरद पवार एवढा पापी या जगात कोणी नाही
    • शरद पवारांना मानावा लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवल आहे
    • शरद पवार यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं
    • यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस
    • महाराष्ट्रात जो गोंधळ सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरू आहे
    • शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या
    • या पवारांनी या महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संपवला
    • पण या महाराष्ट्रातून शरद पवार यांना एकच माणूस संपवता येत नाहीये
    • त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना संपवता येत नाही म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटले आहेत
    • येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही
  • 13 Oct 2024 03:57 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे याच्यांवर टीका

    मला काल म्हणाले आनंदी दिघे असते तर शिंदेंना गोळी मारली असती अरे चोरांच्या टोळीने गोळीची भाषा करायची नसते. दिघे साहेब असते तर मला शाबासकी दिली असती वा बेटा बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललाय आणि ते असते तर बाळासाहेबांचे हिंदुत्व ज्यांनी सोडलं त्यांना हंटरनी फोडलं असतं दिघे साहेब ताबडतोब इलाज करतात त्यांचा ताबडतोब इलाज केला असता, असा टोला शिंदे यांनी लगावला.

  • 13 Oct 2024 03:50 PM (IST)

    शिवाजी पाटील यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन

    कोल्हापूर येथील चंदगडमध्ये आज भाजपच्या शिवाजी पाटील यांच्याकडून जय जवान जय किसान महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले. मेळाव्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत ,केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक उपस्थित आहेत.जय जवान जय किसान महामेळाव्याच्या माध्यमातून शिवाजी पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं.

  • 13 Oct 2024 03:40 PM (IST)

    हे गतिमान सरकार -मुख्यमंत्री शिंदे

    हे गतिमान सरकार आहे. पूर्वीच्या सरकारने बंद केलेले प्रकल्प, स्पीड ब्रेकर आम्ही काढून टाकले आहे. गुणवत्तापूर्ण काम करा. लोकांचे पैसे खड्ड्यात जाऊ देऊ नका. मुंबईप्रमाणे कॉलिटीच्या नावाने पैसे काढले असं करू नका. आता 25 वर्ष खड्डे दिसणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

     

  • 13 Oct 2024 03:26 PM (IST)

    मी तर अल्पवयीन

    माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात कोर्टात आरोपीने वयाबाबत कोर्टासमोर मोठा खुलासा केला. त्याच्या मते तो केवळ 17 वर्षांचा असून त्याला अल्पवयीन म्हणून या प्रकरणात ग्राह्य धरावं. नेमक वय काय हे स्पष्ट होण्यासाठी कोर्टाने आरोपीचे आधार कार्ड मागितले.

  • 13 Oct 2024 03:20 PM (IST)

    परतीच्या पावसाने झोडपले

    रत्नागिरी- दक्षिण रत्नागिरीला परतीच्या पावसाचा फटका बसला. लांजा राजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. अवकाळी पावसाचा हवामान खात्याने पुढील दोन दिवस अंदाज वर्तवला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून लांजा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. परतीच्या पावसाचा भात शेतीला मोठा फटका बसला. पुढील दोन दिवस कोकण किनारपट्टी वरती अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 13 Oct 2024 03:10 PM (IST)

    आरोग्य तपासणीनंतर आरोपींना कोर्टात हजर करणार

    माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांचं मेडीकल करण्यात येत आहे. त्यानंतर आरोपींना किला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

  • 13 Oct 2024 03:00 PM (IST)

    मनोज जरांगे यांच्यासोबत आयुष्यभर मैत्री

    आज जातीचे पेटारे झाले आहेत आणि या पेटाऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कैद झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक पत्रावर जय भवानी जय शिवाजी लिहायचे. मनोज जरांगे आणि आमची मैत्री आयुष्यभर टिकणार आहे, असे राजरत्न आंबेडकर म्हणाले.

  • 13 Oct 2024 02:55 PM (IST)

    धुळ्यात एकाच दिवशी १०१ कामांचे उद्घाटन

    आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरात विकासकामांच्या बाबतीत रेकॉर्ड ब्रेक केला. आमदारांनी शनिवारी तब्बल एकशे एक कामांचा शुभारंभ केला. निवडणूक आचारसंहितेपूर्वी त्यांनी हे काम केले.

  • 13 Oct 2024 02:38 PM (IST)

    वाघूर धरणाचे दरवाजे उघडले

    भुसावळ शहर व परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून परतीचा पाऊस सुरू आहे. यामुळे वाघूर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दहा दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडण्यात आले.

  • 13 Oct 2024 02:23 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण

    छत्रपती संभाजीनगर मधील जामगाव येथे मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावर झाले. यावेळी त्यांच्यासोबत राजरत्न आंबेडकर तसेच कृष्णा पाटील डोनगावकर उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा गंगापूर सहकारी साखर कारखाना परिसरात हा पुतळा उभारण्यात आला आहे.

  • 13 Oct 2024 02:08 PM (IST)

    लोकल घसरली, पश्चिम रेल्वे विस्कळीत

    मुंबई सेंट्रलमध्ये लोकल घसरली. ही लोकल रिकमी होती. परंतु त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

  • 13 Oct 2024 02:06 PM (IST)

    बंजारा समाजासाठी काँग्रेसने सर्वच केले

    बंजारा समाजाबाबत बोलले. पोहरादेवीला. त्यांनी एक विधान केलं. बंजारा समाजासाठी काँग्रेसने आणि यापूर्वीच्या सरकारने काहीच संधी दिली नाही. या राज्याचे ११ वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री, तीन वर्ष सुधाकरराव मुख्यमंत्री होते. मनोहर नाईक मंत्रिमंडळात होते. काँग्रेसने या समाजाला राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली.

  • 13 Oct 2024 02:02 PM (IST)

    आम्ही एक आहोत- नाना पटोले

    आम्ही एक आहोत. आम्ही मुख्यमंत्री एकमताने ठरवू. हे जाहीरपणे सांगतो. महाराष्ट्र वाचवायचा आहे. महाराष्ट्र धोक्यात आहे. मोदी आणि शाह यांचा विचार अंमलात आणणार आहोत. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची आमच्यासाठी महत्त्वाची नाही. खोकेवाल्यांसाठी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.

  • 13 Oct 2024 01:55 PM (IST)

    ठाकरे जे बोलतील तीच आमची भूमिका- शरद पवार

    ठाकरे जे बोलतील तीच आमची भूमिका असल्याचे शरद पवार यांनी नुकताच म्हटले आहे.

  • 13 Oct 2024 01:53 PM (IST)

    जनतेचा सरकारवर विश्वास राहिला नाहीये- उद्धव ठाकरे

    नुकताच उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, जनतेचा सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये.

  • 13 Oct 2024 01:45 PM (IST)

    शरद पवार यांचे अत्यंत मोठे विधान

    मला त्याबाबतची पुरेशी माहिती नाही. गंभीर गुन्हा आहे. अशावेळी तपासयंत्रणेवर परिणाम होईल असं भाष्य आम्ही करणार नाही, असे बाबा सिद्दीकी यांच्यावरील गोळीबारानंतर शरद पवार यांनी म्हटले.

  • 13 Oct 2024 01:33 PM (IST)

    राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आमदार फारूक यांच्याकडून निषेध

    राज्यातील कायदा सुव्यवस्था प्रश्न बिकट. माजी मंत्र्याचा गोळीबार करून खून होत असल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरले आहेत. नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, असे एमआयएमचे आमदार फारुक शाह यांची मागणी.

  • 13 Oct 2024 01:02 PM (IST)

    राज ठाकरे यांचे अत्यंत मोठे विधान

    समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा गड किल्ल्यांवर खर्च करा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 13 Oct 2024 12:51 PM (IST)

    अजितदादांना जेलऐवजी भाजपात टाकलं – राज ठाकरे

    मोदी म्हणाले जेलमध्ये टाकू पण अजितदादांना भाजपात टाकले, राज ठाकरे यांची जोरदार टीका

  • 13 Oct 2024 12:40 PM (IST)

    बाबा सिद्दिकी हत्या, काँग्रेसची टीका

    बाबा सिद्धिकींच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महत्त्वाच्या व्यक्तीची भर रस्त्यात हत्या होत असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

  • 13 Oct 2024 12:40 PM (IST)

    मला एक खून माफ करावा – राज ठाकरे

    भारताच्या राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे मला खून माफ करा.ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला त्यांचा मला खून करायचे आहे असे मिश्कील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे.

  • 13 Oct 2024 12:27 PM (IST)

    बाबा सिद्दिकी हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी याच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वीकारली. सोशल मीडियावर पोस्ट करत ही जबाबदारी या गँगने घेतली.

  • 13 Oct 2024 12:10 PM (IST)

    अंबादास दानवे यांची सरकारवर टीका

    बाबा सिद्दिकी हे मुंबईतील एक ज्येष्ठ नेते आहेत.. परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर गोळ्या घातल्या गेल्या आणि आता सर्व तपासांती अशी माहिती येत आहे की दोन दोन महिने आधी आरोपी तिथे येऊन बसतात. बाबा सिद्दिकी यांना वाय प्लस सुरक्षा असताना देखील गोळ्या घालणं म्हणजे त्यांच्या सुरक्षा विषयी शंका उपस्थित करणार आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना गोळ्या घालणं हे त्यापेक्षाही महाभयानक आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

  • 13 Oct 2024 11:52 AM (IST)

    पुण्यातील धायरी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या

    पुण्यातील धायरी परिसरात तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. किरकोळ वादातून चार ते पाच मित्रांनीच दारूच्या नशेत मित्राची हत्या केली. किरकोळ वादातून दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. आदित्य घोरपडे (वय 19) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

  • 13 Oct 2024 11:40 AM (IST)

    गृहमंत्री बेपर्वा असल्याचं दिसून येतंय- अंबादास दानवे

    “बाबा सिद्दिकींना ठार मारलं जातंय. गुप्तचर यंत्रणा काय काम करते? गृहमंत्री बेपर्वा असल्याचं दिसून येतंय. पोलिसांचे हात बांधलेले आहेत. चाळीस आमदारांना फुकटची सुरक्षा दिली जातेय. कुत्रं विचारत नाही त्यांना सुरक्षा दिली जाते. छगन भुजबळ जे बोलले ते योग्य आहे,” अशा शब्दांत अंबादास दानवेंनी टीका केली.

  • 13 Oct 2024 11:30 AM (IST)

    बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

    “बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर गृहमंत्री तातडीने रुग्णालयात गेले होते. आरोपींवर कारवाई होईल यात शंका नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. जे झालं ते दुर्दैवी आहे. या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी होईल,” असं मुरलीधर मोहोळ म्हणाले.

  • 13 Oct 2024 11:20 AM (IST)

    अशा घटना घडल्यावर राजकारण केलं जातं हे दुर्देव- अजित पवार

    “अशा घटना घडल्यावर राजकारण केलं जातं हे दुर्देव आहे. त्यातून माझ्यासारख्याने काही निर्णयाप्रती येणं योग्य नाही. पोलिसांना काही अंदाज आलाय. पोलीस म्हणतायत काही वेळ द्या. दोघांना अटक केली आहे. गृहमंत्री बारकाईने तपास करण्याचे आदेश दिले आहेत,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

  • 13 Oct 2024 11:10 AM (IST)

    सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणातील तपासासाठी पाच ठिकाणी पोलिसांचे पथक गेले आहेत- अजित पवार

    “बाबा सिद्दिकी हे सर्वांशी मिळून मिसळून राहायचे. मधल्या काळात ते राष्ट्रवादीत आले. ते आमचे स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रात फिरणार होते. आमच्या चर्चा झाल्या होत्या. पण काल त्यांच्यावर भ्याड हल्ला झाला. आम्ही त्याचा निषेध करत आहोत. पोलीस तपास करत आहेत. पाच ठिकाणी पोलिसांचे पथक गेले आहे. या घटनेने आम्ही अतिशय शोकाकूल अवस्थेत आहोत. अर्ध्या पाऊण तासात पोस्टमार्टेम होईल. पार्थिव त्यांच्या घरी जाईल. तिथे काही तास ठेवून लोकांच्या दर्शनासाठी ठेवलं जाईल. नंतर ८ वाजता बडा कब्रस्तानमध्ये मरीन लाईनला दफन होईल. शासकीय इतमानाने अंत्यसंस्कार होईल,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

  • 13 Oct 2024 11:02 AM (IST)

    Maharashtra News: बाबा सिद्दीकी स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रीत फिरणार होते – अजित पवार

    बाबा सिद्दीकी स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रीत फिरणार होते… काल बाबा सिद्दीकींवर भ्याड हल्ला झाला…अर्धा ते पाऊण तासात शवविच्छेदन पूर्ण होईल… असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे.

  • 13 Oct 2024 10:40 AM (IST)

    Maharashtra News: मुंबई राज्यात कायदा – सुव्यवस्था राहिली नाही – विजय वडेट्टीवार

    मुंबई राज्यात कायदा – सुव्यवस्था राहिली नाही… कालची घटना वेदना देणारी… गृहमंत्री कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरले… महाराष्ट्रात पोलिसांचे 2 ग्रुप दिसतात… असं वक्तव्य देखील विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

  • 13 Oct 2024 10:28 AM (IST)

    Maharashtra News: महिला, व्यापारी राजकीय नेते सुरक्षित नाहीत – संजय राऊत

    महिला, व्यापारी राजकीय नेते सुरक्षित नाहीत… राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. राज्याच्या गृहमंत्र्याची काही जबाबदारी आहे की नाही? हत्यांचं सत्र राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलं आहे… असं वक्तव्य देखील संजय राऊत यांनी केलं आहे.

  • 13 Oct 2024 10:14 AM (IST)

    Maharashtra News: परतीच्या पावसाने मका पिकाचे सर्वाधिक नुकसान

    मुक्ताईनगर तालुक्यात परतीच्या पावसाने मका पिकाचे सर्वाधिक नुकसान… काढणीला आलेला मका व शेतात ठेवलेला मका पूर्णपणे पावसात भिजला… बळीराजा अस्मानी संकटाने संकटात सापडला… पंचनामे करून मदतीची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे…

  • 13 Oct 2024 09:57 AM (IST)

    अजित पवार कूपर रूग्णालयात जाणार

    बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला. यात बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. कूपर रूग्णालयात बाबा सिद्दिकी यांचं पोस्ट मार्टम केलं जाणार आहे. या ठिकाणी अजित पवार गटाचे नेते उपस्थित आहेत. स्वत: अजित पवार देखील कूपर रूग्णालयात जाणार आहेत.

  • 13 Oct 2024 09:45 AM (IST)

    बाबा सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त

    बाबा सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यांच्या घराबाहेरचा रस्ता बंद करण्यात आला आहे. मुंबई पोलिस आणि आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेड लावले असून कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. बाबा सिद्दीकी हे वरिष्ठ नेते होते, माजी मंत्री होते. त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • 13 Oct 2024 09:30 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील घाटांमध्ये स्पॉटलाईट लावले

    पुण्यातील बोपदेव घाट लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पुण्यातील घाट आणि टेकड्या परिसरात पोलिसांकडून स्पॉटलाईट आणि चेक पोस्ट लावण्यात आलं. विशेष करून ज्या परिसरात रात्रीच्या वेळेस तरुण-तरुणी बसतात त्या ठीकणी मोठ्या लाईट लावण्यात आल्या आहेत. बोपदेव घाट, कात्रज घाट, लोणावळा घाट अशा ठिकाणी या स्पॉटलाईट लावण्यात आल्या आहेत.

  • 13 Oct 2024 09:15 AM (IST)

    सलमानच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. सध्या सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट घराबाहेर सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत.

  • 13 Oct 2024 08:33 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : आरोपींची कसून चौकशी सुरु

    बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपी करनैल सिंह आणि धर्मराज कश्यपची पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी केली. देवेन भारती आणि दया नायक यांचं रात्रीपासूनच तपासावर विशेष लक्ष आहे. सकाळी दहा वाजता आरोपींचं मेडिकल चेकअप करून त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

  • 13 Oct 2024 08:13 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : झिशान सिद्दीकींच्या घराबाहेर कडकोट बंदोबस्त

    Baba Siddique Shot Dead Live Update : झिशान सिद्दीकीच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांचे आर.सी.पी दलही तैनात करण्यात आले आहे. बाबा सिद्दीकी यांच्या घराबाहेर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले आहेत. सध्या कोणालाही आत प्रवेश दिला जात नाही. बाबा सिद्दीकी हे ज्येष्ठ नेते होते, माजी मंत्री होते, त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने येथे येऊ शकतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  • 13 Oct 2024 08:11 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दींच्या हत्याचा तपास दया नायक यांच्याकडून सुरु

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकी हत्येचा तपास मुंबई गुन्हे शाखेचे पथक करत आहे. दया नायक हे गुन्हे शाखा युनिट 9 चे प्रभारी आहेत. सध्या पोलिसांनी काल रात्री दोन आरोपींना अटक केली आहे, एक आरोपी अद्याप फरार असून, पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेत आहे.

  • 13 Oct 2024 08:09 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या तिघांपैकी दोघांना अटक

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.

  • 13 Oct 2024 08:03 AM (IST)

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू

    Baba Siddique Shot Dead Live Update : बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. बाबा सिद्दीकी हे त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयाजवळ असताना त्यांच्यावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागली. तर एक गोळी ही त्यांच्या सहकाऱ्याच्या पायाला लागली. या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता.