Breaking News LIVE 10 October 2024 : सूर्यास्त… रतन टाटा अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

| Updated on: Oct 10, 2024 | 7:43 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 10 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Breaking News LIVE 10 October 2024 : सूर्यास्त... रतन टाटा अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली
Follow us on

Ratan Tata Passed Away Live Update: टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतावर नव्हे तर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांना प्रकृती खालावल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळत आहे. तसेच रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून मान्यवरांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 10 Oct 2024 06:54 PM (IST)

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा मार्ग तूर्तास मोकळा

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा राज्य सरकारचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेविरोधातील याचिका चार आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. राज्य सरकारने 26 जानेवारी 2024 रोजी अधिसूचना जारी केली आहे. या अधिसचूनेत मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नका. तसेच मराठ्यांना दिलेलं कुणबी प्रमाणपत्र स्थगित करा, अशी प्रमुख मागणी मंगेश ससाणे यांच्याकडून याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

  • 10 Oct 2024 06:09 PM (IST)

    लियाकत शेख यांचा शरद पवार गटात प्रवेश

    लियाकत शेख यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला आहे. याआधी ते भाजपमध्ये अल्पसंख्याक ठाणे, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष होते. मागच्या ४० वर्षांपासून ते भाजपमध्ये कार्यरत होते . त्यांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित प्रवेश केला.


  • 10 Oct 2024 05:58 PM (IST)

    पुण्यातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत ८०० यात्रेकरू रवाना

    पुण्यातून मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत ८०० यात्रेकरू रवाना झाले आहेत. भारत गौरव पर्यटन रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली आहे. शासकीय दुखवटा जाहीर झाल्याने साध्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अजित पवारांनी चित्रफितीच्या माध्यमातून यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या.

  • 10 Oct 2024 05:38 PM (IST)

    वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

    रतन टाटा अनंतात विलीन झाले आहेत. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात रतन टाटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अनेक नेत्यांनी अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर वरळी स्मशानभूमीत सर्वसामन्यांनी प्रचंड गर्दी केली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योग क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

  • 10 Oct 2024 05:09 PM (IST)

    वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार होणार

    रतन टाटांवर थोड्याच वेळात अंत्यविधी होणार आहे. वरळी स्मशानभूमीत रतन टाटांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. शासकीय इतमामात टाटांवर अंत्यविधी केले जाणार आहेत. रतन टाटांच्या पार्थिवाला पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. वरळी स्मशानभूमीबाहेर सर्वसामान्य नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.

  • 10 Oct 2024 05:05 PM (IST)

    पुण्यातून बोगस डॉक्टराला बेड्या, गुन्हा दाखल

    पुण्यात बोगस डॉक्टरकीचं सर्टिफिकेट काढून दवाखाना चालवणाऱ्या डॉक्टरला बेड्या घातल्या आहेत. पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांनी या बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. मूळव्याध उपचार केंद्र सुरु असलेल्या बोगस डॉक्टरच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. पोलिसांनी या तक्रारीनंतर धाड टाकून कारवाई केली. हा बोगस डॉक्टर ND, BEMS या पदव्या असल्याचं दाखवून व्यवसाय करत होता. सदर व्यक्ती ही बंगाली असल्याचं समोर आलं आहे.

  • 10 Oct 2024 04:56 PM (IST)

    रतन टाटा यांच्या पार्थिवावर लवकरच शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

    रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर पोहोचले आहेत. रतन टाटा यांच्या पार्थिवावर लवकरच शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 10 Oct 2024 04:49 PM (IST)

    रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रामदास आठवले वरळीतील स्मशानभूमीत पोहोचले

    उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले.

  • 10 Oct 2024 04:39 PM (IST)

    रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी अमित शाह पोहोचले

    उद्योगपती रतन टाटा यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक ज्येष्ठ उद्योगपती वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले.

  • 10 Oct 2024 04:39 PM (IST)

    रतन टाटा यांना राज्य सन्मानाने अखेरचा निरोप

    रतन टाटा यांचे पार्थिव वरळीच्या स्मशानभूमीत आणण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 10 Oct 2024 04:26 PM (IST)

    सुदर्शन पटनायक यांनी कलाकृती बनवून रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली

    वाळूशिल्प कलाकार सुदर्शन पटनायक यांनी उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पुरी समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे शिल्प तयार केले आहे.

  • 10 Oct 2024 04:15 PM (IST)

    मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर होणार अंत्यसंस्कार

    मुंबईतील एनसीपीए मैदानावर अंतिम दर्शन घेतल्यानंतर रतन टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात येत आहे. काही वेळाने मुंबईतील वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

  • 10 Oct 2024 04:10 PM (IST)

    रतन टाटा यांचे योगदान भारत सदैव लक्षात ठेवेल: मधुर भांडारकर

    रतन टाटा यांच्या निधनावर चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  त्यांचे योगदान मोठे आहे, त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. त्यांचे योगदान भारत सदैव लक्षात ठेवेल.

  • 10 Oct 2024 04:04 PM (IST)

    रतन टाटा यांचा शेवटचा प्रवास सुरू, काही वेळातच अंत्यसंस्कार होणार

    रतन टाटा यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या अंतिम प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यांच्या पार्थिवावर लवकरच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  • 10 Oct 2024 04:02 PM (IST)

    आमिर खानने घेतलं रतन टाटा यांचं अखेरचं दर्शन

    रतन टाटा यांच्या अंतिम दर्शनासाठी आमिर खान पत्नी किरण रावसोबत पोहोचला. आमिर खान म्हणाला की, आजचा दिवस संपूर्ण देशासाठी दुःखद आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान अमूल्य आहे.

  • 10 Oct 2024 03:53 PM (IST)

    टाटाच्या अंत्य यात्रेला सुरुवात…

    टाटा यांच्या अंत्ययात्रेसा सुरुवात झाली असून त्यांच्यावर वरळी येथील विद्युतदाहीनीत अंत्यसंस्कार होणार आहेत. एनसीपीएतून त्यांचे पार्थिव वरळी येथे निघणार आहे.

     

  • 10 Oct 2024 03:23 PM (IST)

    रतन टाटा यांना भारत रत्न द्या, राज ठाकरे यांची मागणी

    रतन टाटांना भारत रत्न द्यावा अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली आहे.एखादी व्यक्ती हयात असतानाच असे पुरस्कार दिले जावेत असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

  • 10 Oct 2024 02:57 PM (IST)

    अंबानी कुटुंबाने रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली

    अंबानी कुटुंबाने रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि श्लोका अंबानी उपस्थित होते.

  • 10 Oct 2024 02:50 PM (IST)

    या पुस्तकाने रतन टाटा यांना केले हळवे

    ‘द आर्ट ऑफ रेसिंग इन द रेन’ हे पुस्तक वाचण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. मी पाचवेळा हे पुस्तक वाचलं. माझे डोळे पाणावले असं त्यांनी सांगितले होते.

  • 10 Oct 2024 02:40 PM (IST)

    एक युग संपलं – बिग बी

    ‘एक युग संपलंय’, अशी श्रद्धांजली बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वाहिली. त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

  • 10 Oct 2024 02:32 PM (IST)

    रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी अमित शाह दाखल

    रतन टाटा यांच्या अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी रतन टाटा यांना केंद्र सरकारतर्फे श्रद्धांजली वाहिली.

  • 10 Oct 2024 02:30 PM (IST)

    रतन टाटा यांना मंत्रिमंडळाची श्रद्धांजली

    ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. उद्यमशीलता हा देखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला, असे शिंदे म्हणाले.

  • 10 Oct 2024 02:20 PM (IST)

    रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर

    आता राज्य मंत्रिमंडळात रतन टाटा यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. रतन टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 10 Oct 2024 02:10 PM (IST)

    उद्योग पुरस्काराचे नाव आता रतन टाटा यांच्या नावे

    राज्य शासनाच्या उद्योग पुरस्काराचे नाव आता रतन टाटा उद्योग पुरस्कार असे नाव देण्यात आले आहे. याविषयीची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. तसेच नरीमन पाईंट येथील उद्योग भवनाला त्यांचे नाव देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

  • 10 Oct 2024 02:00 PM (IST)

    रतन टाटा यांनी स्वतः ताट उचललं होतं- विष्णू नेवाळे

    पिंपरी- चिंचवडमधील प्लांट ला भेट दिली होती. यावेळी टाटा प्लांट मधील कामगारांसोबत वेगळ्या आठवणी रतन टाटा सोबत आहेत त्यांनी कामगारांसोबत जेवण केलं, स्वतः ताट उचललं होत हे सर्व पाहून कामगारांमध्ये त्यांच्याबद्दल आणखीनच आदर वाढला होता, रतन टाटा सोबत जेवण केलेल्या कामगार ज्यांनी 28 वर्ष टाटा मोटर्स मध्ये काम केलं त्या विष्णू नेवाळे यांनी आठवण जागवली.

  • 10 Oct 2024 01:57 PM (IST)

    Ratan Tata : खासदार श्रीकांत शिंदे आयोजित रासरंग दांडिया गरबा कार्यक्रम रद्द.

    उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनामुळे डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे आयोजित रासरंग दांडिया रास, गरबा कार्यक्रम रद्द.तर दुसरीकडे शिवसेनेचा दसरा मेळावा साठी अंबरनाथ आणि डोंबिवली मध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आज सायंकाळी 5 वाजता मेळावा घेणार असल्याची शिवसेना पदाधिकाऱ्यांची माहिती

  • 10 Oct 2024 01:39 PM (IST)

    शरद पवार यांनी घेतले रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन

    नुकताच शरद पवार यांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचे दर्शन हे घेतले आहे.

  • 10 Oct 2024 01:32 PM (IST)

    केंद्र सरकारतर्फे अमित शाह वाहणार रतन टाटा यांच्यावर श्रद्धाजंली

    रतन टाटा यांच्यावर श्रद्धाजंली वाहण्यात येणार असून अमित अमित शाह हे रतन टाटा यांच्यावर श्रद्धाजंली वाहतील.

  • 10 Oct 2024 01:20 PM (IST)

    उद्योगपती रतन टाटा यांचे निधन म्हणजे भारत देशावर झालेला एक आघात आहे

    टाटा हे नाव जगात औद्योगिक क्षेत्रात एक सिम्बॉल मिळवलेले तसेच उद्योग क्षेत्रात विश्वास मिळवलेले नाव आहे उद्योग क्षेत्राचे जनक टाटा यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्योगपती रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली……

  • 10 Oct 2024 12:57 PM (IST)

    Why is Ratan Tata an inspiration? काय म्हणतात रतन टाटा

    तुम्ही वेगाने चालत असला तर एकटे चला. पण लांबपर्यंत जायाचे असेल तर इतरांना सोबत घ्या. तुमच्या जीवनात सत्ता आणि धन हे कधी दोन सिद्धांत प्रमुख ठेऊ नका, असे रतन टाटा नेहमी म्हणत होते.

  • 10 Oct 2024 12:47 PM (IST)

    केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची रतन टाटांना श्रद्धांजली

    केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्याच आणि रतन टाटा यांच भावनिक नातं होतं. प्रत्येक मराठी माणसाला ते आपले वाटायचे. त्यांच्या जाण्यामुळे उद्योग विश्वाचे नव्हे तर देशाचेही मोठे नुकसान झाल आहे.

  • 10 Oct 2024 12:32 PM (IST)

    रतन टाटा यांच्यावर पारसी प्रथेनुसार अंत्यसंस्कार

    रतन टाटा यांचे पार्थिव दुपारी ४ वाजेपर्यंत एनसीपीए येथे ठेवण्यात येणार असून, त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी वरळी येथील पारसी स्मशानभूमीत आणले जाईल. जिथे पारसी प्रथेनुसार त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

  • 10 Oct 2024 12:21 PM (IST)

    अंबादास दानवे यांची रतन टाटा यांना श्रद्धांजली

    विऱोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, खरं म्हणजे या देशावर नितांत प्रेम करणारे, या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारे उद्योगपती रतन टाटा होते. त्यांच्या जाण्यामुळे देशाचे खूप मोठा नुकसान होणार आहे.

  • 10 Oct 2024 12:03 PM (IST)

    विवेक फणसाळकर वरळीच्या स्मशानभूमीत

    रतन टाटा यांच्यावर वरळीच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर वरळीच्या स्मशानभूमीत पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी आढावा घेतला.

  • 10 Oct 2024 11:56 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यातील भाजपचे मोठे नेते मनसेच्या संपर्कात

    विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी जळगाव जिल्ह्यातील भाजपचे अनेक मोठे नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्कात असल्याची जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांची माहिती. जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय भूकंप करणार असल्याचा जिल्हाध्यक्ष ॲड जमील देशपांडे यांचा दावा.

  • 10 Oct 2024 11:37 AM (IST)

    Ratan Tata Family Tree : रतन टाटा यांच्या कुटुंबात कोण-कोण? अशी आहे त्यांची Family Tree

    रतन टाटा यांचं कुटुंब प्रसिद्धीच्या झोतापासून नेहमीच लांब राहिलय. त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहितीय. रतन टाटा अविवाहीत होते. रतन टाटा यांचे वडिल, आजोबा, पणजोबा कोण होते? त्यांच्या कुटुंबात आता किती सदस्य आहेत, जाणून घ्या Family Tree बद्दल. वाचा सविस्तर…

  • 10 Oct 2024 11:25 AM (IST)

    रतन टाटा यांचं पार्थिव NCPA मध्ये किती वाजेपर्यंत असेल?

    रतन टाटा यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी मुंबईतील NCPA येथे ठेवण्यात आलं आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत पार्थिव येथे असेल. समाजाच्या विविध क्षेत्रातील सर्वच मंडळी पार्थिवाच्या दर्शनासाठी येत आहेत.

  • 10 Oct 2024 11:13 AM (IST)

    Ratan Tata Death : ‘सगळी प्रॉपर्टी बॉम्बने उडवा, पण…’, ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय बोललेले रतन टाटा?

    मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी ताज हॉटेलला टार्गेट केलं होतं. त्यावेळी रतन टाटा तिथे पोहोचलेले. त्यावेळी रतन टाटांचा सुरक्षा रक्षकांसोबत काय संवाद झालेला? वाचा सविस्तर….

  • 10 Oct 2024 10:40 AM (IST)

    अजित पवार यांनी रतन टाटा यांना वाहिली आदरांजली

    महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुंबईतील एनसीपीए लॉनमध्ये रतन टाटा यांना अखेरची आदरांजली वाहिली.

  • 10 Oct 2024 10:30 AM (IST)

    युवकांना मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत मासिक स्टायपेंड

    राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत ही योजना राबविली जात आहे. या उपक्रमांर्तगत ‘https://rojgar.mahaswayam.gov.in/’ संकेतस्थळाद्वारे रोजगार इच्छुकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांशी जोडण्यात येणार आहे.

    बारावी, आयटीआय, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेले विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने असणार आहे. प्रशिक्षणासाठी १८ ते ३५ वयोगट असावा, शिक्षण विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

  • 10 Oct 2024 10:20 AM (IST)

    बच्चू कडू यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण

    “रतन टाटा हे असे एक उद्योगपती होते ज्यांनी आपल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा हा भारताच्या विकासासाठी दिला. सामाजिक क्षेत्रासाठी दिला. टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी उद्योग क्षेत्राला वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. मी प्रहार आणि माझ्या शेतकरी बांधवाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली.

  • 10 Oct 2024 10:10 AM (IST)

    आजपासून मध्यरात्रीपर्यंत तरुणाई थिरकणार 

    नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मध्यरात्रीपर्यंत दांडियाला परवानगी देण्यात आली आहे. नवरात्रौत्सवामध्ये मध्यरात्रीपर्यंत रास-दांडिया-गरबा खेळण्यासाठी तीन दिवसांची परवानगी देण्यात आली आहे. दहाच्या वाजताच्या ठोक्याला बंद होणारा डीजे आता रात्री बारा वाजता बंद होणार आहे. अन्य दिवस रात्री 10 वाजेपर्यंत चालणाऱ्या दांडिया गरबाला शेवटचे तीन दिवस बारा वाजेपर्यंत परवानगी आहे.

  • 10 Oct 2024 09:57 AM (IST)

    संजय राऊत यांची रतन टाटांना श्रद्धांजली

    रतन टाटा हे उद्योग जगतातील मोठं नाव आहे. कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदत केली. मुंबई शहरासाठी रतन टाटांचं योगदान मोठं आहे. टाटा गेले यावर विश्वासच बसत नाही.

  • 10 Oct 2024 09:50 AM (IST)

    राज ठाकरे यांची रतन टाटांसाठी भावनिक पोस्ट

    राज ठाकरे यांनी रतन टाटा यांच्याबाबतच एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी या जगात कोणाचीच तुलना होऊ शकत नाही. पण समर्थ रामदास स्वामींनी महाराजांचं वर्णन जसं अचूक केलं आहे तसं इतर कुठे आढळत नाही. त्यात त्यांनी महाराजांना ‘श्रीमंत योगी’ म्हणलं आहे, रतन टाटांबद्दल विचार करताना, ‘श्रीमंत योगी’ ही उपमा तंतोतंत पटते. श्रीमंत असून देखील त्यांनी आपल्या श्रीमंतीचा तमाशा कधी मांडला नाही. असा माणूस पुढच्या पिढयांना पहायला न मिळणं ही अधिक दुःखाची बाब, असं म्हणत राज ठाकरेंनी रतन टाटांना श्रद्धांजली अर्पण केली.

  • 10 Oct 2024 09:42 AM (IST)

    रतन टाटा यांच्या कुलाब्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त

    रतन टाटा यांचं निधन झालं. त्यानंतर आता त्यांच्या कुलाब्यातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी काहीच वेळात सुरुवात होईल.

  • 10 Oct 2024 09:30 AM (IST)

    शांतनू नायडू याची रतन टाटांसाठी भावनिक पोस्ट

    रतन टाटा यांचा तरूण जिवलग मित्र शांतनू नायडू याने खास पोस्ट लिहिली आहे. माझं लाईटहाऊस मला सोडून गेलं, अशा शब्दात शांतनू नायडूने त्याच्या भावना व्यक्त केल्यात.

  • 10 Oct 2024 09:20 AM (IST)

    राज ठाकरेंकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली

    रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास १५६ वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि ‘टाटा’ ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं. रतन टाटांना माझी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली, अशी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे.
  • 10 Oct 2024 09:10 AM (IST)

    बच्चू कडू यांची रतन टाटांना श्रद्धांजली

    रतन टाटा असे एक उद्योगपती होते ज्यांनी आपल्या कमाईचा 25 टक्के हिस्सा हा भारताच्या विकासासाठी दिला.सामाजीक क्षेत्रासाठी दिला. टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली.रतन टाटा यांनी जेव्हा टाटा समूहाचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांनी उद्योग क्षेत्राला वेगळी कलाटणी देण्याचं काम केलं. मी प्रहार आणि माझ्या शेतकरी बांधवाकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असं बच्चू कडू म्हणाले.

  • 10 Oct 2024 08:11 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वाहिली श्रद्धांजली

    Ratan Tata Passed Away Live Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे. आपल्या योगदानाने उद्योग, समाजसेवा आणि मानवतेसाठी नवीन आदर्श रतन टाटा यांनी लोकांपुढे ठेवला. देश संकटात असताना अनेक प्रसंगावर त्यांनी देशासाठी दिलेल्या निस्वार्थ योगदानाची परतफेड कधीच होऊ शकणार नाही, असे ते म्हणाले.

  • 10 Oct 2024 08:06 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X (ट्विटर) वरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. ‘श्री रतन टाटा हे एक दूरदर्शी बिझनेस लीडर, दयाळू आणि विलक्षण माणूस होते. भारतातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यांना त्यांनी स्थिर नेतृत्व दिले. नम्रता, दयाळूपणा आणि आपल्या समाजाला अधिक चांगले बनवण्याच्या अतूट बांधिलकीमुळे ते लोकप्रिय ठरले, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला.

  • 10 Oct 2024 07:47 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

    Ratan Tata Passed Away Live Update : रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

  • 10 Oct 2024 07:44 AM (IST)

    Ratan Tata Passed Away Live Update : उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

    Ratan Tata Passed Away Live Update : प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते.

    मात्र बुधवारी संध्याकाळी रतन टाटा यांची प्रकृती जास्त खालावली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.