वाशिम : अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला. ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या बारा कन्यांनी भासू दिली नाही. (Twelve Daughters perform last rites of father in Washim)
वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळेंना 12 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.
सखाराम काळे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1934 रोजी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे सधन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. आपले चुलत बंधू नामदेवराव काळे यांच्या सोबतीने ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावातच मिळावे, या ध्येयाने ते प्रेरीत होते. आज आप्पास्वामी शिक्षण संस्थेचा होत असलेला लौकीक सखाराम आणि नामदेवराव काळे यांच्या योग्य नियोजनाचे फलितच.
सखाराम काळे गेल्या काही दिवसांपासून वयोमानापरत्वे आजारी होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या बारा मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.
बीड शहरातील काशिनाथ नगर येथे वास्तव्यास असणाऱ्या सुंदरबाई नाईकवाडे यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात चार मुलं आणि दोन मुली आहेत. मात्र सासरी असताना कधीच माहेरची आठवण येऊ न दिल्याने या सुनांनी आपल्या लाडक्या सासूला खांदा देऊन अखेरचा निरोप दिला होता.
संबंधित बातम्या :
आईसारखं सांभाळलेल्या सासूचं निधन, चार सुनांनी स्वतः खांदा दिला
(Twelve Daughters perform last rites of father in Washim)