सातारा | 4 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू राम हे शाकाहारी नव्हते, तर मांसाहारी होते, असं विधान केलं आहे. या विधानाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. भाजपने आव्हाड यांच्या या विधानाचा निषेध नोंदवत राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळे आव्हाड यांची चांगलीच गोची झाली आहे. आव्हाड यांनी या विधानावर दिलगीरीही व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतरही निषेधाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता या वादात थेट खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. प्रभू श्रीराम आणि कोणत्याही युग पुरुषाबद्दल कोणीही विधान करू नये. अशा युग पुरुषांबद्दल चुकीची विधाने करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. कारण नसताना राजकरण करत मतभेद निर्माण केले जात आहेत. याला विकृती म्हणतात, अशी टीका करतानाच संत किंवा युगपुरुष हे कधी मांसाहारी होते का? असा सवाल करणं ही शोकांतिका आहे, असं उदयनराजे भोसले म्हणाले.
तुम्ही येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येला जाणार आहात का? तुम्हाला निमंत्रण आलंय का? असा सवाल उदयनराजे भोसले यांना करण्यात आला. त्यावर मंदिरात जाण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची गरज नसते. मी अंतकरणाने तिथेच आहे, असं उदयनराजे यांनी स्पष्ट केलं.
तुम्ही साताऱ्यातून लोकसभेला उभे राहणार आहात का? असा सवाल उदयनराजे यांना करण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देणं त्यांनी टाळलं. बघू, असं मोघम उत्तर देत उदयनराजे यांनी भाष्य करणं टाळलं. त्यामुळे उदयनराजे साताऱ्यातून लढणार की नाही? अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न आधीच सुटायला हवा होता. व्हीपी सिंग यांच्या काळात मी असतो तर आरक्षणाचा प्रश्न त्याचवेळी सुटला असता. आरक्षणाचा प्रश्न न सुटायला त्या वेळचे राजकीय लोकच कारणीभूत होते, असा दावा उदयनराजे यांनी केला आहे. मात्र, या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी अधिक बोलणं टाळलं.