रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावरून शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यपाल यांची उचलबांगडी होत नाही तोपर्यंत थांबणार नाही. इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असंही उदयनराजे यांनी म्हंटले आहे. सातत्याने शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात असल्याने उदयनराजे यांनी स्पष्टच शब्दात रायगडावरुन राजकारण्यांची कान उघडणी केली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह त्यांनी भाजपलाही चांगलंच सुनावलं आहे. सर्वच पक्षांनी सोईनुसार महाराजांच्या नावाचा वापर केला आहे. यापुढे हे चालणार नाही म्हणत सर्वच राजकारण्यांची लाज काढली आहे. उदयनराजे यांनी सर्वधर्म समभाव हा शिवाजी महाराजांनी अमलात आणला होता, तो फक्त नावालाच राहिल्याने उदयनराजे यांनी त्यावरून हल्लाबोल केला आहे. वेगवेगळी विधाने करून देशाचे तुकडे होतील, देश महासत्ता होणार नाही असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहे त्यावर बोलत असतांना उदयनराजे यांनी राज्यात जातीय विषमता पसरत असल्याचे देखील म्हंटले आहे.
राजकारण्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा नावाचा वापर सोईनुसार केला असून सोईप्रमाणे इतिहास सांगितला जातो,चित्रपट, लेखक अशा सर्वच ठिकाणी इतिहासाची मोडतोड केली जात असल्याचेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
उदयनराजे यांनी राजकारण्यांनी वेळोवेळी जातीय विषमता निर्माण केली आहे, याशिवाय राज्यपाल इथे असते तर टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.
राज्यपाल यांची जो पर्यन्त उचलबांगडी होत नाही तोपर्यन्त माझी मागणी कायम राहील, याशिवाय आझाद मैदानावर आंदोलन करणार असल्याचेही उदयनराजे यांनी म्हंटले आहे.