दिनेश दुखंडे, मुंबई : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं लोकसभा (Loksabha) सदस्यत्व रद्द करण्याची सर्वात मोठी कारवाई झाल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. देशभरातील विरोधक या मुद्द्यावरून एकवटण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींवरील कारवाईवरून संताप व्यक्त केला आहे. हे सरळ सरळ लोकशाहीचं हत्याकांड आहे. सरकार यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे आता फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.
चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहूल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचं हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत.. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे.. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय.
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही राहुल गांधींवरील कारवाईवरून तीव्र प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्यावरील ही कारवाई अपेक्षितच होती. लोकशाहीच्या मूल्यांसाठी आम्ही काँग्रेससोबत नक्कीच असू. राहुल गांधी यांच्याबाबत ज्या तत्परतेने निर्णय झाला, तशी तत्परता आमच्या बाबत दाखवायला हवी होती, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे. एवढच नाही तर सुरत सत्र न्यायालयातील ज्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांची खासदारकी धोक्यात आली, त्यावरून अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. शिक्षेपूर्वी सूरत न्यायालयातील न्यायमूर्ती बदलले गेल्याचं सावंत म्हणाले.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेचा माध्यमांशी बोलताना धिक्कार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणीत अशी भूमिका बसत नाही असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
अशा घटना व सर्व प्रकार जनता बघत आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन जायचे असते या देशाच्या पंरपरेला तिलांजली देण्याचे काम झाल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.