खेड/रत्नागिरीः रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये गोळीबार मैदानावर झालेल्या सभेमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी बोलताना शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह चोरल्याचा आरोप करत शिंदे गटाच्या हिम्मतीवरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी बोलताना एकनाथ शिंदे यांना तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरला मधल्या काळात चिन्हंही गोठवण्यात आले. तरीही आम्ही अंधेरीच्या पोटनिवडणुकीत आम्ही आमचा गड राखला असल्याचे सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका करताना एकनाथ शिंदे यांच्यावरच फक्त टीका न करता निवडणूक आयोगावरही जोरदार हल्लाबोल चढविला.
निवडणूक आयोगावर बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या डोळ्याला जर मोतिबिंदू झाला नसेल तर त्यांनी एकदा येऊन पाहावं खेडमधील सभा आणि त्यानंतर ठरवावं की, शिवसेना नेमकी कुणाची आहे असा टोला त्यांनी निवडणूक आयोगाला लगावला आहे.
एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांनी शिवसेना भाजपच्या मदतीने कशी संपवायची आहे त्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.
त्यांना भगवे तेज संपवायचे आहे म्हणूनच त्यांनी हे नाटक केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी मी हवा की नको हे जनता ठरवणार आहे निवडणूक आयोग नाही असा घणाघात त्यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
यावेळी त्यांनी चोरांना तुम्ही आशीर्वाद देणार का? मिंधेच्या हातात धनुष्यबाण आणि मिंधेचा चेहरा पडलेला आहे. त्यामुळे मेरा खानदान चोर है हे कधीच पुसले जाणार नाही अशा शब्दातही एकनाथ शिंदे यांना सुनावण्यात आले आहे.
आपण महाराष्ट्राची सेवा केली आहे. त्यामुळे कोकण आपला प्राण असल्याचे सांगत त्यांनी सत्ता गेली तेव्हाही 1997 मध्ये कोकणाची साथ मिळाल्यानंतर शिवसेनाप्रमुख नतमस्तक झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ज्या शिवसेनेच्या चिन्हासाठी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयीन लढा दिला ते कपिल सिब्बलही आता प्रचंज बैचेन आहेत.
कारण शेवटी ते जे बोलले होते की, संविधाना, स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्यात कोणतंही योगदान नाही ते सत्तेवर बसून हे सगळ करत आहेत.स्वातंत्र्यावर बोलताना त्यांनी गोमूत्र शिंपडून स्वातंत्र्य मिळाले नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही धनुष्यबाण घेऊन या मी मशाल घेऊन येतो.त्यानंतर जनता जे ठरवेल ते मला मान्य असणार आहे.
मी हवा की नको हे तुम्ही ठरवणार आहात ते निवडणूक आयोग ठरवणार नाही असा टोलाही त्यांनी निवडणूक लगावला आहे.
त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत स्वातंत्र्य लढ्यात ज्या पक्षांशी संबंध नाही त्या पक्षाला गाडून टाकायचा आहे हा निश्चय करा कारण 2024 नंतर आपल्या देशात लोकशाही शिल्लक राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच बोलताना म्हणाले की, उद्या शिमगा माझ्या सभेनंतर काही शिमगा करतील कारण त्यांना कायमच शिमगा करायची सवय असल्याचे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या नियोजित सभेवरुन त्यांना टोला लगावला आहे.