मुंबई : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच लाईव्ह येत जनतेशी संवाद साधला आहे. दसऱ्याच्या जाहीर मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावर दोन्ही गटाकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळेल असा दावा ठणकावून केला जात होता. मात्र, शनिवारी सायंकाळी निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्हं गोठवल्याचे जाहीर करत नवीन नाव आणि चिन्हं मिळवण्याकरिता तीन पर्याय द्यायला सांगितले होते. त्यानुसार आज उद्धव ठाकरे यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधत असतांना त्रिशूल, उगवता सूर्य, मशाल या तीन नावांची मागणी केली आहे. तर नावं मिळवण्यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नावांसाठी तीन पर्याय दिले आहे.
शिवसेनेत उभी पडल्या नंतर दोन्ही गटाकडून शिवसेना आमचीच असा दावा केला जात होता. त्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष आणि चिन्ह महत्वाचे असल्याने निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाने धाव घेतली होती.
40 डोक्यांच्या रावणाने हे सगळं केले असून यामागे कोण आहेत ? हे सर्वांना माहिती असून त्यांना हेतु त्यांनी शिवसेना संपत नाही म्हणून शिवसेना फोडून साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ठाकरे यांनी म्हंटले आहे.
शिवसेनेचा जन्म आणि चिन्ह कसे मिळाले याचा इतिहास सांगत असतांना उद्धव ठाकरे यांनी धनुष्यबाणाची बाळासाहेब दररोज पूजा करायचे ती आजही करत असल्याचे सांगितले आहे.
शिवसेना नावावर, चिन्हावर तुमचा काय अधिकार, जे माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिले आहे असे सांगून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे.
नवीन पक्ष काढा, भाजप बरोबर जा, पण बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नाव वापरू नका असा इशारा शिंदे गटाला दिला आहे. मी डगमगलो नाही तुम्हीही डगमगू नका असे शिवसैनिकांना आश्वासित उद्धव ठाकरेंनी केले आहे.