दत्ता कानवटे, जालना, २ सप्टेंबर २०२३ : उद्धव ठाकरे हे अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. मराठा आंदोलनासाठी गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू होते. काल आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. आंदोलकांचे गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे. उपोषणर्त्याची प्रकृती खराब झाली. त्यानंतर आंदोलक आणि पोलिसांत वाद झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जमध्ये ६४ जण जखमी झाले. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याने आज संभाजीराजे आणि आमदार रोहित पवार यांनी जखमींची भेट रुग्णालयात भेट घेतली. त्यानंतर आता उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे हे दाखल झाले आहेत.
आंदोलनकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी चर्चा केली. आंदोलकाने उद्धव ठाकरे यांना एक गोळी दाखवली. या डुप्लिकेट गोळ्या पोलिसांनी मारल्याचा आरोप आंदोलकाने केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, मराठा समाजाच्या मागणी काही नव्याने आल्या नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये समाजाचा आदर ठेवून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी लाठीचार्ज झाला नव्हता. लढा सुरू असताना आझाद मैदानावर उपोषण केलं गेलं होतं. मुख्यमंत्री या नात्याने व्हिडीओ कान्फरन्सिंगने चर्चा केली होती.
राज्यभरातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोललो. त्यानंतर तुमच्या भेटीला आलो. केंद्र सरकारने गणपतीच्या दिवसात संसदेचे अधिवेशन ठेवले आहे. मराठा समाजाला न्याय द्या. धनगर, ओबीसी समाजाला न्याय द्या. एक फूल आणि दोन हाप सरकारचं काम शून्य आहे. काम काही नाही. पण, सरकार आपल्या दारी. सरकारमध्ये असताना आम्ही तुम्हाला भेटत होतो. आता कोणीही नाही, तरी माणुसकीच्या नात्याने तुम्हाला भेटायला आलो आहे, असंही ठाकरे म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जालन्यात घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागावा यासाठी महाविकास आघाडी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन चव्हाण यांनी दिलं. संजय राऊत, राजेश टोपे हेसुद्दा आंदोलनस्थळी होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मराठा आरक्षणाची लोकांची मागणी आहे. आता अन्त पाहू नका, असंही चव्हाण यांनी म्हंटलं.