नाशिक | 16 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते अद्वैत हिरे यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला. नाशिकमध्ये अद्वैत हिरे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे. अद्वैत हिरे यांच्यामुळे शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे. याच अद्वैत हिरे यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. मात्र, राजकीय दबाव तंत्रामुळे ही कारवाई करण्यात आली. मालेगावातून हिरे लढू नयेत यासाठीच त्यांच्या मागे कारवाईचा ससेमिरा लावला असा आरोप ठाकरे गटानं केलाय. काही महिन्यांपूर्वीच अद्वैत हिरेंना गैरव्यवहाराच्या आरोपामध्ये अटक झाली. मात्र, या अटकेवरून सरकारवर सुडाच्या राजकारणाचा आरोप होतोय.
ज्या प्रकरणात अद्वैत हिरे यांना अटक झाली ते प्रकरण आठ वर्ष जुने आहे. नाशिक जिल्हा सहकारी बँकेचं कर्जासंदर्भातले काही आरोप त्यांच्यावर आहेत. खरं म्हणजे हे आरोप ते भाजपमध्ये असतानाही झाले होते. पण, ते शिवसेनेत आले आणि मालेगाव विधानसभा लढण्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रचंड मोठी सभा घेतली. त्यामुळे मतदारसंघ ढवळून निघाला. तिथे त्यांना पराभवाची भीती वाटत आहे अशा मंत्री महोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वैत हिरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध गेल्या साधारण वर्षभरामध्ये चाळीसच्या आसपास गुन्हे दाखल केले अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हिरे यांनी अगदी आत्ता या क्षणाला जरी म्हटलं की मी भाजप सोबत जाणार आहे. तर त्यांना क्लीन चीट मिळू शकते. ते निर्दोष होऊ शकतात. जर मोहित कंबोजला तुम्ही शंभर कोटीच्या फ्रौड प्रकरणामध्ये जिकडे कोर्टाने क्लोझर रिपोर्ट फेटाळला आहे तरीही तुम्ही मोहित कंबोजला अजिबात हात लावत नाही असा सवाल करून सरकारची कोंडी केलीय.
ज्यांच्यावर हा आरोप करण्यात आला ते शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी आपला देश, नियम, कायदा, घटनेवर चालतो. घटनेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. दादा भुसे असु दे. आणखी कोण पण असू दे. कायद्याच्या चौकटीत जे काम करेल असे म्हटले आहे.
2013 मध्ये अद्वैत हिरे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी रेणुका यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी सात कोटी सेहेचाळीस लाखांचं कर्ज घेतलं. तेव्हा सूत गिरणीच्या अध्यक्ष पदावर स्मिता हिरे होत्या. मात्र, कागदपत्रांची तपासणी न करताच कर्ज वाटप झाल्याचा आरोप आहे. शिवाय कर्ज हे सूत गिरणीसाठी वापरलंच गेलं नाही आणि त्याचे हप्तेही भरले नसल्याचा आरोप करत हिरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याचप्रकरणी हिरे यांना अटक करण्यात आली.
शिवसेना फुटीनंतर अद्वैत हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्याआधी ते भाजपमध्ये होते. अद्वैत हिरे हे धुळे लोकसभेतून ठाकरे गटाचे उमेदवार असण्याची चर्चा आहे. शिंदे गटाचे मंत्री यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटातल्या आतापर्यंत ज्या नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलाय. त्यात आता अद्वैत हिरे यांचंही नाव सामील झालंय.
ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची मालमत्ता प्रकरणात ACB चौकशी सुरू आहे. आमदार राजन साळवी यांचे घर, हॉटेल, मालमत्ते संदर्भात ACB चौकशी सुरू आहे. आमदार नितीन देशमुख यांनाही बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपात चौकशीची नोटीस गेली. कथित कोविड घोटाळ्यात माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ED चौकशी सुरू आहे. आमदार रवींद्र वायकर यांची कथित हॉटेल घोटाळ्याच्या आरोपात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी झाली. कथित कोविड आरोपात सूरज चव्हाणांची ED चौकशी झाली. कथित खिचडी घोटाळ्यात ठाकरे गटाचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार अमोल कीर्तिकर यांची चौकशी झाली. आणि आता गैरव्यवहाराच्या आरोपात ठाकरे गटाच्या अद्वैत हिरे यांना अटक झाली.