निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर : एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ( Supreme Court ) सुरू आहे. तर यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सध्या सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादाच्या दरम्यान बोलली जात आहे. अशी सर्व परिस्थिती असतांना उद्धव ठाकरे गटाचे नेते यांनी शरद कोळी खळबळजनक विधान केले आहे. शरद कोळी ( Sharad Koli ) यांनी केलेल्या विधानावरुन नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयात आमच्या बाजूने निर्णय लागला नाही तर रस्त्यावर रक्तपात होईल असे धक्कादायक विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी यांनी चंद्रपुरात केले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते शरद कोळी म्हणाले, आमचा आणि जनतेचा कायद्यावरील विश्वास उडाला आहे. कायदा मोदी-शाह, शिंदे-फडणवीस यांनी विकत घेतला आहे अशी घणाघाती टीका केली आहे.
सत्तेवर बसलेली माकडं आहेत आणि ती विकली गेली आहेत असे सांगत न्याय मिळाला नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल, रक्तपात झाला तरी चालेल अशी टोकाची भूमिका शरद कोळी यांनी मांडली.
आमचा विश्वासघात झाला असून धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष आम्हालाच मिळाले पाहिजे सोबतच एकनाथ शिंदे यांच्यावर योग्य कारवाई झाली पाहिजे असेही शरद कोळी यांनी मागणी केली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. याच दरम्यान शरद कोळी हे खळबळजनक विधान केल्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. न्याय आमच्याच बाजूने लागेल असे म्हणत शरद कोळी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर हल्लाबोल केला आहे.
चंद्रपूर येथे बोलत असतांना शरद कोळी यांनी केलेले विधान बघता नवा वाद उभा राहील अशी स्थिती आहे. थेट न्यायालयावर शरद कोळी यांनी शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे वाद उभा राहू शकतो. तर दुसरीकडे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह देखील आम्हालाच मिळावे अशी मागणीही केली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावरुन उद्धव ठाकरे यांच्या विविध नेत्यांनी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. त्यामध्ये आता शरद कोळी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगाववर शंका उपस्थित केली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांचे खळबळजनक विधानावरुन उलट सुलट चर्चा होऊ लागली आहे.