अहमदनगर, ८ सप्टेंबर २०२३ : उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. संगमनेरच्या वरडझरी, खुर्द आणि तळेगावला भेट दिली. याशिवाय राहतातील केलवड आणि राऊतवस्ती या गावांना उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी सरकारविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. काकडी गावातील सरपंच , सदस्यांनी विमानतळाकडे साडेसात कोटी थकले असल्याचं सांगितलं. सरकारने चांगलं असेल तर चांगलं सांगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पावसाळी वातावरण आहे. दुबार पेरणी वाया गेली. शासन नियमाने पंचनामे करून उपयोग नाही. सरसकट मदत मिळावी, अशी मागणी कोपरीतील काकडी गावातील शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना केली.
उद्धव ठाकरे – या हंगामात तुम्ही काय पेरलं?
शेतकरी – सोयाबीन पेरलं
उद्धव ठाकरे – बोगस बियाणं काही आलं का?
शेतकरी – बोगस बियाणं थोडं आलं.
उद्धव ठाकरे – पिण्याच्या पाण्याचं काय आहे?
शेतकरी – टँकर येत नाही साहेब.
उद्धव ठाकरे – शेताला पाणी देण्यासाठी वीज अखंडीत मिळते का?
शेतकरी – नाही नाही. फक्त आठ सात वीज मिळते. तेही रात्री १२ वाजता कृषीपंपासाठी वीज येते. सकाळी सहा वाजता निघून जाते. रात्री शेतकरी झोपलेला असतो. विंचू, सापाच्या भीतीमुळे शेतात जाण्याची शेतकरी हिंमत करत नाही. पाणी शेताला देता येत नाही.
उद्धव ठाकरे – वीज नसते. मग, बिल येत नसतील. या सरकारचा कारभार असा आहे. वीज नियमित येत नाही. पण, बीलं नियमित देते. तुमच्याकडे पिकं गेले. त्याचे पंचनामे सुरू झाले का?
शेतकरी – नाही. मागचीच नुकसान भरपाई अजून दिलेलं नाही. २४ तास विजेचे बिल घेते आणि वीज फक्त आठ तास देतात.
शेतकरी – उद्योगपतींना कोट्यवधींचा विमा देतात. शेतकऱ्यांची चेष्टा चालवली आहे. एक रुपयांचा विमा देतो म्हणून सांगतात. एका एकराला १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. विम्याचे साडेतीन हजार रुपये देतात. पंचनाम्याचं नाटक करू नये. शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपये एकरी नुकसानभरपाई द्यावी.
उद्धव ठाकरे – अद्याप पंचनामे झाले नाही.
शेतकरी – मागच्या वेळी पंचनामे केले होते. एक रुपयासुद्धा मिळाला नाही. एकरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. साहेब सांगा आमच्या खात्यावर पैसे आले का.
उद्धव ठाकरे – तुमचे पालकमंत्री कोण, ते येतात काय इकडं?
शेतकरी – राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री आहेत. ते इकडे आले नाहीत. सरकार आपल्या दारी कार्यक्रमासाठी लोकं भरून नेले. मुख्यमंत्री आले. खोकेवाल्या सरकारचं करायचं काय…. अशा घोषणा शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर केल्या.