खेड/ रत्नागिरीः गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये ज्या राजकीय उलथापालथी झाल्या त्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला
आहे.ही बंडखोरी केवळ शिवसेनमध्ये झाली असली तरी ती शिवसेनेशी संबंधित राहिली नाही तर साऱ्या देशातील लोकशाहीसंबधित राहिली आहे. गद्दार आमदारांच्या या बंडखोरीमुळे लोकशाही जिवंत राहणार की नाही असा सवाल पूर्ण देशाला पडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे सर्वश्रेष्ठ संविधान दिले त्या संविधानालाच संपवण्याचे काम या देशात केले जात आहे. त्यामुळे या गद्दारांना आता कोकणातून संपवण्याची शपत घेऊया आणि या गद्दारांना मातीत घालू असं आवाहन ठाकरे गटाचे नेते आमदार भास्करराव जाधव यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमुळे लोकशाहीवर घाला घातला गेला आहे त्यामुळे लोकशाही राहणार की नाही असा सवाल आता उपस्थित झाला आहे असा हल्लाबोलही त्यांनी शिवसेना आणि भाजपवर केला आहे.
आताचे सरकार आल्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत सगळ्या सभांमधून सांगत सुटले आहेत की, ही कामं शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात झाली आहेत.
मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील कामं खरच त्यांच्या काळातील आहेत का हे एकदा त्यांनी खरं सांगावे असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.
रत्नागिरी आणि कोकणात राबवली गेलेली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सिंधु-रत्न योजना, मेडिकल कॉलेज, महिला आरोग्य केंद्र या सगळ्या योजना या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये मंजूर झाल्या आहेत. त्यामुळे यांनी विनाकारण वल्गना करु नये असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनांसाठी एक पैसा तर दिला नाहीच पण यांनी आता खोटं बोल पण रेटून बोल असा धडका लावला असल्याची टीका ही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
आमदार भास्करराव जाधव यांनी रामदार कदम यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. त्यांना मंत्रिपद दिल्यावर त्यांनी मतदार संघात किती कामं केली आहेत.ते त्यांनी जाहीर करावे असं जाहीर आव्हानही त्यांना करण्यात आले आहे.
रामदास कदम यांनी आपल्या मतदार संघापेक्षा मुलाला निवडून आणण्यासाठी दापोली विभागात कामं केली मात्र आपला मतदार संघ विकासापासून वंचित ठेवला असा टोला त्यांनी त्याना लगावला आहे.
त्यामुळे ज्या पद्धतीने ते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत त्यामुळे आता त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच्या मुलाचा पराभव करण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याशिवाय आणि त्यांच्या मुलाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही असं जाहीर आवाहनही भास्करराव जाधव यांनी केले आहे.
यावेळी भास्करराव जाधव आणि उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रामदास कदम यांच्यावर झपाटलेला चित्रपटातील तात्या विंचू असा टोला लगावत त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे.