मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या भोवती फिरत आहे. त्यामुळे अमुक होणार तमूक होणार अशा वावड्या उठल्या आहेत. तसं पाहिलं तर राजकारणात कोणच कोणाचा कायमचा शत्रू अगर मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात मोठी उलथापालथ होणं काही नवीन राहीलं नाही. पण अजित पवार यांनी समोर येत असलेल्या बातम्या आणि इतर पक्षांच्या नेते मंडळींनी केलेली भाकीतं यावर स्पष्टपणे भूमिका मांडली. तसेच अशी कोणतीच राजकीय घडामोड घडणार याबाबत स्पष्ट सांगितलं. तसेच अफवा उडवाणाऱ्या नेत्यांचे त्यांनी कानही टोचले. उद्धव ठाकरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबतही त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.
“आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यात उद्धव ठाकरे पण आहेत. उद्धव ठाकरे यांना काहीजण प्रश्न विचारतात. त्यांनी काहीतरी उत्तर देताना सांगितलं. मी एकटा लढीन. वास्तविक आम्ही दोघं तिकडनं एकत्र आलो होतो. मी त्यांना स्पष्ट सांगितलं यामध्ये काही तथ्य नाही. “, असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं.
“काही जण पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारतात. काही जण इतरांना प्रश्न विचारतात. शिंदे गटाच्या नेते तर सांगतात आम्ही बाहेर पडणार वगैरे. आम्ही असं करणार, आम्हा यांना घेणार नाही. कोण चाललंय तर तुम्ही म्हणता घेणार नाही आणि काय ते..काही जण ट्वीटवरून बोलतात. मंत्र्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण माझं स्पष्ट म्हणणं आहे. आता या गोष्टी पूर्णपणे थांबवा”, असं अजित पवार यांनी पुढे सांगितलं.
“कारण नसताना गैरसमज करून घेऊ नका. 40-50 अशा कोणत्याही सह्या झालेल्या नाहीत. आम्ही परिवार म्हणूनच काम करतोय. उद्याही परिवार म्हणूनच काम करत राहणार. गैरसमज करून पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. “, असं अजित पवार यांनी पुढे सांगितलं.
“आपल्या सर्वांना माहिती आहे की महाविकास आघाडीची सभा असताना आम्ही सर्वजण नागपूरला गेलो होतो. तेथून परत येताना मी उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केली तुम्ही विमान घेऊन आला आहात तर त्यात जागा आहे का? ते म्हणाले चला बरोबर..त्यानंतर मी त्यांच्यासोबत आलो.” असंही अजित पवार यांनी सांगितलं.
“पनवेलच्या कार्यक्रमात श्री सदस्यांवर संकट ओढावलं तेव्हा मी त्यांच्यासोबत रुग्णालयात गेलो. पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात गेल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले मी इथनं निघतो. ते निघाले आणि विरोधी पक्षनेता या नात्याने मी बाकीच्या ठिकाणी भेटी दिल्या. “, असंही अजित पवार यांनी सांगितलं.