सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा. ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. त्याच खोलीबाहेर तुम्हाला अमित शाहने उभं केलं होतं, असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज अँटॉप हिल येथे जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात थेट लढत आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हा हल्लाबोल केला.
मी मुलाखत दिली होती. त्यात बाळासाहेबांच्या खोलीत बसून बोलणं झालं होतं असं म्हटलं होतं. मी देवदेवतांची शपथ घेऊन बोललो. यांनी 2014 ला आणि 2019 आपला विश्वास घात केला. आदित्य ठाकरेंना मी तयार करतो. त्यानंतर आपण त्याला मुख्यमंत्री करू असं मला फडणवीस म्हणाले होते. मी म्हटलं अहो असं करू नका. आधी त्याला आमदार करू. मी त्यांना म्हटलं अहो असं नको. त्यावर फडणवीस म्हणाले मी वरती जाणार आहे. म्हणजे केंद्रात जाणार आहे. त्यामुळे आदित्यला तयार करून मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हटल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले असल्याचं आज म्हणत आहेत. अहो देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. म्हणाले, कोणत्या तरी खोलीत घेऊन गेले. देवेंद्रजी ती कुठली तरी खोली नव्हती. ती बाळासाहेबांची खोली होती. ज्या खोलीबाहेर अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाहेर थांबायला सांगितलं होतं, असा हल्लाबोल त्यांनी केला.
आजची सभा प्रचारासाठी नाही, तर विजयासाठी आहे. लढत कुणामध्ये होणार हे सांगायचं तर ज्याने आपल्या आईवर वार केले त्याच्याशी आहे. जो आपल्या आईचा होऊ शकला नाही, तो तुमचा काय होणार? त्याने आता काहीही देऊ द्या. श्रीखंड देईल, दूध देईल, त्याने काहीही देऊ द्या. आपलं सरकार आल्यावर ईडी, सीबीआय आपलंच आहे, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांना नाव न घेता दिला.