मुंबई | 29 ऑक्टोंबर 2023 : मनोज जरांगे पाटील हे आज ते करायला मैदानात उतरले आहेत जे मोठ मोठ्या नेत्यांना जमलं नाही. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आम्ही आजही ठामपणे सांगतो की मराठा समाजाला फक्त एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतील. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पब डिस्को इंडस्ट्रीमधून बाहेर पडावे आणि मग बोलावे. आदित्य ठाकरे यांनी सत्तेत असताना कामे केली नाही आणि आज आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिक्षण सम्राट असलेल्या विरोधकांनी त्यांच्या शाळा, कॉलेजमध्ये मराठा समाजाला 20% आरक्षण देणार का? याचे पहिले उत्तर द्यावे अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते आणि माजी आमदार किरण पावसकर यांनी केली.
काहीही झाले तरी सध्याचे सरकार कसे वाईट आहे हेच विरोधक म्हणत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला न्याय आमचं सरकार देते आणि गुजरातला प्रकल्प जातात असे पसरवले जाते. राज्यातले पप्पू आदित्य ठाकरे लोकांमध्ये अशी अफवा पसरवतात. सुप्रिया ताईं यांनीही सांगावे की मुंबईतील Air India ही बिल्डिंग मिळवण्यासाठी कोण प्रयत्न करत आहे? AIR India ची इमारत मुख्यालय दिल्लीला कोणी नेले ते सुद्धा संसदरत्न ताईंनी सांगावे. जेव्हा जेव्हा विरोधक काहीही बोलतात तेव्हा राज्याचा विकास सुरू आहे असं समजावे, असा टोला त्यांनी लगावला.
जिथे रोजगार बंद झाले तिथे उद्धव ठाकरे यांचे युनियन होते. महानंदा डेअरी अनिल परब मंत्री असताना सुद्धा अवस्था काय झाली होती. शिंदे सरकार आल्यानंतर राज्यात रोजगार निर्माण झाले. पण, राज्यातली महत्त्वाच्या व्यक्ती परदेशात कोण कोण फिरायला जात..? असा सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात पत्रक काढले. उद्धव ठाकरे जे आता काय म्हणत आहेत ते स्वतः मुख्यमंत्री असताना का नाही बोलला अशा शब्दात पावसकर यांनी ठकारे यांचा एकेरी उल्लेख केला. उद्धव ठाकरे असो किंवा आतापर्यंत काँग्रेसचे जे मराठा मुख्यमंत्री आणि मंत्री झाले त्यांनी मराठा समाजासाठी काहीच केले नाही म्हणून आज मराठा समाजाला आरक्षण न्यायासाठी रस्त्यावर उतराव लागले, असे ते म्हणाले.
16 आमदार अपात्र होतील की नाही याचा निकाल सुनावणीमध्ये लागेल. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमानुसार कामकाज होत आहे. तुमच्या ४० आमदारांनी स्वतः सांगितले की, आम्हाला तुमचे नेतृत्व मान्य नाही. हे ४० आमदार जेव्हा सभागृहात त्यांची सत्यता मांडतील तेव्हा आपण विधानसभेत नालायक ठरू अशी भीती त्यांना वाटत होती. उद्धव ठाकरे यांच्याकडे उत्तर द्यायला नव्हते म्हणून ते मागच्या दराने पळून गेले, अशी जळजळीत टीकाही त्यांनी केली