मुंबई : राज्यातील उजनी, बारवी, राधानगरी, भंडारदरा, कोयना (Koyna), तुळशी धरणं भरली आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. त्यामुळं नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बदलापूरचं (Badlapur) बारवी धरण अखेर शंभर टक्के भरलं. धरणाच्या अकरा दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. बारवी धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा होतो. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरण महिनाभर लवकर भरलं. कोयना धरण पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीमध्ये सोडण्यात आला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा (alert warning) देण्यात येत आला आहे.
कोल्हापूरचे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचालित दरवाजे पुन्हा उघडले. सध्या धरणाच्या एकूण 4 दरवाजांमधून सात हजार क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. शहर परिसरात पाऊस थांबला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत ही संथ गतीने वाढ होतेय. पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 8 इंचावर आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीतील वाढ कायम आहे. पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते. नदीची पाणीपातळी 41 फूट 6 इंचावर पोहोचली. शहर आणि परिसरात पावसाची उघडीप सुरू आहे. धरण क्षेत्रात मात्र पावसाची रिपरिप सुरूच आहे.
उजनी धरणाच्या आठ दरवाज्यातून भीमा नदीच्या पात्रात पाच हजार क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यास सुरुवात झाली आहे. आज पाच वाजून 30 मिनिटांनी हा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. महाराष्ट्रात पाणी साठ्यात सर्वात मोठे धरण म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. या उजनी धरणावरील साखळी धरणात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने अनेक धरण शंभर टक्के भरले असून, ओसंडून वाहत आहेत. या धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग हा भीमा नदीच्या मार्फत उजनी धरणात येतो. त्याच कारणाने उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. उजनी धरण 100% च्या नजीक पोहोचले आहे. सध्या दौंडवरून येणारा पाण्याचा विसर्ग हा 28 हजारांपेक्षा जास्त असल्याने उजनीतून सोडण्यात येणारे पाणी हे टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण प्रशासनाने दिली आहे. उजनी धरणात सध्या 115.26 टीएमसी पाणीसाठा असून उजनी धरण सध्या 96.27 टक्के भरले आहे.
अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान असलेले भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. सुरुवातीला पावसाचा जोर नसल्याने यावर्षी धरण भरेल की नाही याची चिंता होती. मात्र गेल्या दहा पंधरा दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने अकरा टीएमसी क्षमता असलेले धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रीत ठेवण्यासाठी चार हजार क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहिवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केलय.
तुळशी धरण परिसरात आठवडाभरापासून पावसाची संततधार कायम आहे. गुरुवारी तुळशी धरणातून पाणी सोडण्यात आले. धरणात सध्या 93 टक्के इतका पाणीसाठा आहे. धरणात येणारे पाणी अन् पाऊस पाहून पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग सुरू आहे. धरणाच्या तीन वक्र दरवाजातून 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तुळशी नदी काठच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात धरणक्षेत्रात 112 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तुळशी धरण हा परिसर पावसाचे आगार म्हणून ओळखला जातो. या परिसरात गतसाली एका दिवसांत 895 मिलीमीटर इतका रेकॉर्ड ब्रेक पाऊस पडल्याची नोंद आहे. गेल्या सलग सहा वर्षात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून यावर्षी सुद्धा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.